उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे झालेल्या विध्वंसानंतर पुण्यातील २४ मित्रांचा एक गट बेपत्ता झाला आहे. १९९० च्या दहावीच्या बॅच मधील हे सर्व मित्र आहेत. हे सर्व ३५ वर्षांनी ‘चार धाम यात्रे’साठी पुन्हा एकत्र आले होते. मात्र, आता त्यांचा संपर्क होत नाहीये. यासह राज्यातील एकूण १४९ जण अडकल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यातील मंचर येथील अवसरी खुर्द गावातील अशोक भोर आणि त्यांचे २३ मित्र ३५ वर्षांनी चारधाम यात्रेसाठी एकत्र आले होते. मुंबई आणि इतर ठिकाणी राहणाऱ्या या गटातील सर्व लोकांनी १ ऑगस्ट रोजी आपला प्रवास सुरू केला. तर १२ ऑगस्ट रोजी दिल्लीहून विमानाने परतणार होते.
बेपत्ता असणारे अशोक भोर यांचा मुलगा आदित्य म्हणाला की, तो शेवटचा ४ ऑगस्ट रोजी त्याच्या वडिलांशी बोलला होता. त्याच्या वडिलांनी फोनवर सांगितले होते की ते गंगोत्रीपासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर आहेत. वाटेत झाड पडल्याने आणि लहान भूस्खलनामुळे ते अडकले असल्याचेही त्यांनी सांगितले. तेव्हापासून त्यांचा किंवा त्यांच्या गटातील इतर कोणत्याही सदस्याशी कोणताही संपर्क झालेला नाही, असे आदित्य म्हणाला.
उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगोत्रीपासून सुमारे १५-२० किमी अंतरावर असलेल्या धराली गावाजवळ ढगफुटीत किमान पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्याने सांगितले की, “उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटकांशी संपर्क साधणे आव्हानात्मक होते, परंतु आम्ही उत्तराखंड प्रशासनाच्या संपर्कात आहोत.”
महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांमध्ये मुंबईतील ७६, छत्रपती संभाजीनगरमधील १७, पुण्यातील १५, जळगावातील १३, नांदेडमधील ११, ठाण्यातील पाच, नाशिक आणि सोलापूरमधील प्रत्येकी चार, मालेगावमधील तीन आणि अहिल्यानगरमधील एक पर्यटक आहेत. यासह मुंबईतील सुमारे ६१ पर्यटक सुरक्षित आहेत आणि सध्या हनुमान आश्रमात आहेत. तथापि, १४९ पर्यटकांपैकी जवळपास ७५ पर्यटकांचे फोन अजूनही बंद आहेत, नेटवर्कबाहेर आहेत किंवा त्यांच्याशी संपर्क साधता येत नाही.
हे ही वाचा :
कॅन्सरसारख्या रोगांपासून संरक्षण देणारी सुंठ !
राहुल गांधी यांचा ‘ऑपरेशन सिंदूर’वर प्रश्न उपस्थित करणे दुर्दैवी
ही गोडी मेमरीच नव्हे तर इम्युनिटीही वाढवते…
पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, अवसरी खुर्द गावातील या गटाची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाला आधीच पाठवण्यात आली आहे. “आम्हाला माहिती मिळाली आहे की, सध्या उत्तराखंडमध्ये असलेले राज्यातील जवळजवळ सर्व पर्यटक सुरक्षित आहेत. परंतु प्रशासनाने अद्याप त्यांच्याशी संपर्क साधलेला नाही,” असे अधिकाऱ्याने सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी (६ ऑगस्ट) एका निवेदनात म्हटले आहे की, “राज्य सरकार उत्तराखंड प्रशासनाशी सतत संपर्कात आहे आणि अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी आणि त्यांना महाराष्ट्रात सुरक्षित परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.”







