32 C
Mumbai
Saturday, December 6, 2025
घरविशेषस्त्री शक्तीचा जागर: झाशीची राणी लक्ष्मीबाई

स्त्री शक्तीचा जागर: झाशीची राणी लक्ष्मीबाई

Google News Follow

Related

नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे स्त्री शक्तीच्या नऊ रूपांचा जागर. असंचं एक स्त्रीचे रूप म्हणजे वीरता. लढाईच्या मैदानातील शौर्य, कुशाग्र बुद्धी, राजनैतिक डाव अशा सर्वच आघाड्यांवर महिलांनी उत्तम कामगिरी केल्याचे दाखले इतिहासात सापडतात. असंच एक उदाहरण म्हणजे महान वीरांगना राणी लक्ष्मीबाई. महिलांच्या पराक्रमांची कहाणी सांगताना राणी लक्ष्मीबाई यांचे नाव घ्यावेच लागेल. देशाच्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंचे शौर्य अचंबित करणारं आहे. अवघ्या २८- २९ वर्षांच्या आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर मोठ- मोठ्या संकटांचा सामना राणी लक्ष्मीबाईंना करावा लागला. परंतु, कोणत्याही संकटापासून त्या कधी माघारी फिरल्या नाहीत.

राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म १९ नोव्हेंबर १८२८ रोजी वाराणसी मध्ये झाला. राणी लक्ष्मीबाई मूळच्या कोणत्याही राजघराण्यातील नव्हत्या. पण राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमधे वावरलेल्या, वाढलेल्या होत्या. त्यांचे बालपणीचे नाव ‘मणिकर्णिका’ होते. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणार्‍या राणी लक्ष्मीबाईंनी युद्धशास्त्रातील प्रत्येक विद्येत प्रावीण्य मिळविले होते. वयाच्या १२ व्या वर्षी त्यांचा विवाह झाशीचे राजे गंगाधर राव यांच्याशी झाला. लग्नानंतर मणिकर्णिका झाली लक्ष्मीबाई. विवाहानंतर त्यांनी आपली रोजची कसरत, घोडेस्वारी, तलवारबाजी नियमीत सुरू ठेवली. कनिष्ठ समजल्या जाणार्‍या सर्वसामान्य वर्गातील महिलांनाही त्यांनी घोडेस्वारी, तलवारबाजीत पारंगत केले. या गोष्टीचा फायदा ब्रिटिशांनी झांशीवर केलेल्या हल्ल्याच्या वेळी झाला.

पुढे त्यांना दामोदर नावाचा मुलगा झाला पण दुर्दैवाने तीन महिन्यांतच त्याचा अकाली मृत्यू झाला. वारस नसलेल्या महाराजांनी आपल्या चुलत भावाच्या मुलाला दत्तक घेऊन त्याचे नाव दामोदर ठेवले. याच्या दुसऱ्याचं दिवशी महाराजांचे निधन झाले. या काळात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पाय रोवले होते आणि गव्हर्नर जनरल डलहौसी यांनी नागपूर, तंजावर आणि सातारा सारखी मराठ्यांची संस्थानं खालसा केली होती. गंगाधररावांच्या निधनामुळे झाशी खालसा करण्याची आयती संधीच डलहौसींना मिळाली. डलहौसींनी दामोदरचे दत्तक विधान फेटाळून लावलं आणि झाशी खालसा करत असल्याचा जाहीरनामा काढला. झाशी संस्थान खालसा करण्याचा जाहीरनामा जेव्हा राणी लक्ष्मीबाईंना मिळाला, तेव्हा त्यांनी उद्गार काढले होते ‘मेरी झांसी नहीं दूंगी’. आजही राणी लक्ष्मी बाईंचे हे उद्गार लोकांच्या लक्षात आहेत.

झाशी संस्थान खालसा झाल्यानंतर लक्ष्मीबाईंनी आपले संस्थान टिकवण्याचा परोपरीने प्रयत्न करून पाहिला. झाशी खालसा झाल्यावर लक्ष्मीबाईंना किल्ला सोडून शहरातील राजवाड्यात राहायला यावे लागले. हा अपमानही त्यांनी शांतपणे सहन केला. अर्थात ही वादळापूर्वीची शांतता होती.

१८५७ चा उठाव हा पूर्ण हिंदुस्थानात झाला. त्याप्रमाणे ५ जून, १८५७ ला झाशीतही शिपायांचा उद्रेक झाला. केवळ ३५ शिपायांनी इंग्रजांना पळवून लावले. या परिस्थितीत इंग्रजांच्या परवानगीची वाट न पाहता राणी लक्ष्मीबाई किल्ल्यावर राहण्यास गेल्या. पुढे २२ जुलै, १८५७ ला ब्रिटिशांनी राणींना झाशीची अधिकार सूत्रे हाती घेण्यास सांगितले. राणी पुन्हा राज्यकर्त्या झाल्या होत्या, पण तो काळ होता संघर्षाचा. सूत्र हातात आली पण मनुष्यबळ नव्हते आणि खजिनाही रिकामाच होता. प्रजेच्या मनात असुरक्षितता, भविष्याबद्दल भीती होती. परंतु तरीही लक्ष्मीबाईंनी खंबीरपणाने परिस्थिती हाताळली. जुन्या विश्वासातील लोकांना परत बोलावून त्यांना काही अधिकाराची पदे दिली आणि लोकांच्या मनात विश्वास पुन्हा निर्माण केला.

दरम्यान २१ मार्च, १८५८ ला सकाळीच सर ह्यू रोज आपल्या फौजेसह झाशीजवळ आला. त्याने राणींस नि:शस्त्र भेटीस यावे किंवा युद्धास तयार राहावे असे कळविले. ब्रिटिशांनी केलेल्या विश्र्वासघातामुळे, अन्यायामुळे ‘भारतात विदेशी शासन नकोच’ अशा ठाम मताच्या राणींनी भेटीस जाण्याचे नाकारले. त्याच वेळी तात्या टोपे यांच्याशी संधान बांधून एका बाजूने इंग्रजांवर हल्ला करण्यास सुचविले.

ह्यू रोजने झाशीच्या किल्ल्यावर मारा करण्यासाठी आजुबाजूच्या टेकड्यांवर कब्जा मिळविला. युद्धाच्या ९ व्या दिवशी इंग्रजांनी पश्चिमेकडील तोफ बंद पाडून त्या बाजूच्या तटाला खिंडारे पाडली. ही खिंडारे बुजवण्यासाठी रातोरात काम केले गेले. त्या वेळी चुना, दगड, विटा यांची ने-आण करण्याचे काम स्त्रियांनी केले होते हे विशेष. शेवटी ब्रिटिशांना फितुरांनीच साथ दिली. झाशीमधील शंकर किल्ल्यावरील मोठ्या विहीरीतून संपूर्ण झाशीला पाणी पुरवठा व्हायचा, ती विहीर आणि जिथे दारुगोळा तयार व्हायचा, तो कारखाना ही दोन ठिकाणे इंग्रजांनी उद्ध्वस्त केली. अशा स्थितीत राणींची आशा पेशव्यांकडून येणार्‍या मदतीवर होती. त्याप्रमाणे ३१ मार्चला तात्या टोपेंचे सैन्य आले. परंतु इंग्रजांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही.

शांत, सुंदर शहराची होणारी वाताहत पाहून राणी संतापल्या आणि त्यांनी प्रत्यक्ष रणांगणात उतरण्याचा निर्णय अंमलात आणला. त्यांचे धैर्य, शौर्य, आवेश पाहून ह्यू रोजही थबकला. सतत ११ दिवस राणींनी ब्रिटिशांना झुलवत ठेवले. ह्यूज रोजनेही म्हटले की ‘राणी लक्ष्मीबाई सर्वोत्कृष्ट सैनिक आणि सर्वाधिक हिंमतवान व्यक्ती होती.’

हे ही वाचा..

ऑल्ट न्यूजचे मोहम्मद झुबेरविरोधात तक्रार दाखल

हिजबुल्ला मुख्यालयाचा कमांडर ठार

मुंबईतील वृद्धेची १.३० कोटीची फसवणूक

कांदिवलीतील आकुर्ली भुयारी मार्ग रुंदीकरणानंतर वाहतुकीसाठी खुला

या पराभवानंतर राणी पेशव्यांबरोबर ग्वाल्हेरला गेल्या. तेथेही स्वस्थ न बसता लक्ष्मीबाईंनी इंग्रजांना रोखण्यासाठी कशा प्रकारे मोर्चे बांधणी करावी याविषयी चर्चा केली. याच वेळी ब्रिटिश अधिकारी स्मिथ सैन्यासह ग्वाल्हेरच्या अगदी जवळ येऊन पोहोचला. लक्ष्मीबाईंनी रणांगणात धाव घेतली. इंग्रज अधिकारी स्मिथचे सैन्य मागे हटणारच होते, त्याच वेळी नव्या दमाची एक फौज बाजूच्या टेकडीवरून चालून आली. दोन्हीकडून आलेल्या सैन्यासमोर राणींचा निभाव लागला नाही. एका शूर राणीला रणांगणात वीरमरण आले. केवळ २७ वर्षांच्या या निर्भय, पराक्रमी, तेजस्वी, प्रत्यक्ष भवानीचे रूप असणार्‍या लक्ष्मीबाईंच्या वीरतेला नमन!

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा