30 C
Mumbai
Saturday, September 26, 2026
घरविशेषबापट बहू बडबडला!

बापट बहू बडबडला!

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

सुरुवातीला दादरची एक फार प्रसिद्ध गोष्ट आठवते. दादरच्या बाजारात खरेदी करायला गेलेल्या ग्राहकाला आणि तिथे बसलेल्या दुकानदाराला एक शब्द खूप चांगला ठाऊक असतो. तो शब्द म्हणजे बापट भाव. जर एखाद्या गिऱ्हाईकाने वस्तूची किंमत विचारली आणि दुकानदार म्हणाला ना, की याची किंमत बापट ६०० रुपये, तर तो ग्राहक लगेच समजतो की ही वस्तू ३०० रुपयात या दुकानदाराला द्यायची आहे. बापट म्हणजे निम्मा भाव. म्हणजे थेट निम्म्या किंमतीवर आणून ठेवायचे. आज अगदी तसंच काहीसं आपल्या विद्यानंद बापट नावाच्या महाशयांचं झालंय. डीजेबंदीच्या विरोधात बोलता बोलता स्वतःची पत आणि आपल्या विचारांची किंमत या बापटांनी थेट अर्ध्यावर, किंबहुना अगदी शून्यावर आणून ठेवली आहे.

पत्रकारांनी कोणताही प्रश्न विचारू दे, बापटांचं एकच दळण अविरत चालू असतं. प्रश्न भलताच विचारलेला असतो, पण उत्तर भलतेच निघते. तेच तेच चोथा झालेले विचार आणि तीच तीच बाष्कळ विधानं ऐकून ऐकून आता महाराष्ट्रातील जनतेच्या आणि पुणेकरांच्या कानठळ्या बसायला लागल्या आहेत. आता काही काळाने पुण्यातल्या पाट्या प्रसिद्ध असणाऱ्या या ऐतिहासिक भूमीत स्वतः पुणेकरच बापटांच्या बोलण्यावर कायमची बंदी घालावी का, असा गांभीर्याने विचार करायला लागले तर नवल वाटायला नको. या विद्यानंद बापटांना प्रसिद्धीची भूक एवढी अनावर झाली आहे की, मला प्रसिद्धी नको असा आव आणत हे महाशय लहान-मोठ्या प्रत्येक न्यूज चॅनलवर जाऊन मुलाखती देत बसलेत. पुण्यात जशा पाट्या लावल्या जातात, तशा मुलाखतींमध्ये आपल्या अकलेच्या पाट्या टाकून हे महाशय आपली प्रसिद्धीची खाज भागवत आहेत.

सुरुवातीला जेव्हा हे बापट भाऊ बोलायला लागले, तेव्हा लोकांना खरंच वाटलं होतं की अरे वा, एक सामान्य माणूस जनतेच्या त्रासावर बोलतोय. डीजे नको, फटाक्यांचा कर्कश आवाज नको, डॉल्बीचा नको तो त्रास नको. लोकांनी जवळपास ऐंशी टक्के पाठिंबा या बापटांना दिला होता. आम्हीसुद्धा अगदी सुरुवातीला त्या समर्थनात उभे होतो. वाटलं होतं की हा कुठलातरी प्रामाणिक समाजप्रबोधनाचा प्रयत्न चालला आहे. पण हळूहळू या महाशयांची मुक्ताफळे बाहेर यायला लागली आणि लोकांच्या डोक्यातली ट्यूब पेटली. हे जे काही शब्द बापटांच्या तोंडातून बाहेर पडत आहेत ना, हे शब्द मराठी माणसासाठी किंवा हिंदू समाजासाठी मुळीच नवीन नाहीत. ही वाक्यं फार ओळखीची वाटायला लागली. तीच ती ठोकळेबाज वाक्यं. इको-फ्रेंडली गणपती करा, पाणी वाचवा म्हणून होळी साजरी करू नका, वटसावित्री पूजनाची ही कशी अंधश्रद्धा आहे, श्रीराम हे कसे स्त्री-विरोधी आणि दलित-विरोधी होते, आणि थेट अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांवरही विषारी टिप्पणी. असे टार्गेटेड हल्ले करणारे शब्द कानावर सतत पडत आहेत. प्रत्येक हिंदू सण जवळ आला की अशा विशिष्ट विचारांची आळींबे समाजात अचानक उगवतात. हा बापट दुसरा तिसरा कोणी नसून डाव्या विचारसरणीच्या टोळीने समाजमनात पेरलेला एक प्लांटेड पपेट म्हणजे हातातील बाहुले वाटू लागला आहे.

बापट साहेब मोठ्या दिमाखात सांगत फिरतात की मी नास्तिक आहे. अहो बापटजी, तुम्हाला नास्तिक राहायचे असेल तर बिन्धास्त नास्तिक राहा, त्याला आमचा किंवा कोणाचाच विरोध असण्याचे काहीच कारण नाही. पण तुमचा हा नास्तिकपणा फक्त आणि फक्त हिंदूंच्याच सणांच्या वेळी का उफाळून वर येतो? इतर धर्मीयांच्या बाबतीत मग तुमची दातखिळी का बसते? जेव्हा यांना पत्रकारांनी श्रीकृष्णाबद्दल प्रश्न विचारला, तेव्हा हे महाशय अत्यंत फुशारकी मारून म्हणाले की माझा मीच श्रीकृष्ण आहे! आता विचार करा, एकीकडे स्वतःला नास्तिक म्हणायचे आणि दुसरीकडे स्वतःलाच भगवान श्रीकृष्ण घोषित करायचे. हे महाशय मूळचे रत्नागिरीतले. बहुतेक रत्नागिरीहून जगबुडी नदीतून वाहत वाहत हे पुण्यात आल्यामुळे यांच्या डोक्यावर असा काही विपरीत परिणाम झाला असावा, की मीच श्रीकृष्ण आहे असा भ्रम त्यांना जडलाय.

पत्रकारांनी काहीही प्रश्न विचारले की हे महाशय अचानक संस्कृत आणि अत्यंत शुद्ध मराठीत फुसका आव आणून बोलायला सुरुवात करतात. बरं, यांनी मांडलेल्या डीजे आणि ध्वनीप्रदूषणाच्या मूळ मुद्द्याला आमचा अजिबात विरोध नाही. पण यांच्या आत लपलेल्या या भयंकर ढोंगीपणाला आमचा तीव्र विरोध आहे. हिंदूंच्या सणाला विरोध करायचा आणि इतर धर्मीयांच्या बाबतीत मात्र तोंडात मूग गिळून गप्प बसायचे? तोंडाला कुलूप लावून गप्प बसायचे? हा दुट्टपीपणा कसा काय चालेल? अहो, नुकताच ईदचा जुलूस निघाला, त्यावेळी या बापटांनी काय आंधळेपणाचे सोंग घेतले होते की यांना अचानक मोतीबिंदू झाला होता? त्यावेळी यांना ते भोंगे, त्या मिरवणुका, तो आवाज बहुधा दिसलाच नसावा. कारण इतर धर्मीयांच्या बाबतीत बोलताना यांचे तुट शिवलं जातं. आणि हिंदू धर्माविरुद्ध बोलायला मात्र या तथाकथित नास्तिकांना अगदी मोकळे रान मिळते. या महाशयांना पुण्यातील मशिदींवरच्या भोंग्यांचा काहीही त्रास होत नाही. त्यावेळी हे अचानक पूर्णपणे बहिरे होतात. आणि जर एखाद्या पत्रकाराने त्याबाबत प्रश्न विचारलाच, तर तो सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, स्वच्छेने बंद झाले तर चांगले, असे सांगून पळ काढतात.

गणपती बाप्पाला काल्पनिक म्हणणारे बापटजी, श्री गणेश हे समस्त हिंदूंचे आराध्य दैवत आहेत, कोट्यवधी लोकांची श्रद्धा आहेत. त्यांना काल्पनिक देवाच्या मागे लागताय म्हणायचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? तुम्ही पुढे जाऊन सांगताय की सगळ्यांनी मिळून एकच सार्वजनिक मिरवणूक काढा. मग हाच सल्ला ईदच्या वेळी सगळ्यांनी मिळून एकच जुलूस काढा असा द्यायची ताकद किंवा हिंमत तुमच्यात आहे का? त्यावर हे महाशय एक शब्दही बोलणार नाहीत. मग तुम्ही जो डीजेचा मुद्दा मांडत आहात, त्यावेळी गल्लोगल्ली जाऊन हिंदू सणांविरुद्ध तोंडाच्या वाफा का सोडत आहात? जा ना मग याविषयी कोर्टात. की हिंदूंचे सण म्हणजे तुमच्यासारख्या नास्तिकांचे आणि डाव्यांचे सॉफ्ट टार्गेट बनले आहेत? तुम्ही जर खरोखरच नास्तिक असाल, तर सर्व धर्मांबद्दल उघडपणे बोला ना! अमक्या धर्माचे बंद करा, तमक्या धर्माचे बंद करा असे सांगा ना. की तुमची नास्तिकता फक्त हिंदू धर्मापुरतीच मर्यादित आहे? इतर धर्मांच्या बाबतीत बोलायची वेळ आली की तुमच्या मागून धूर निघतो.

डीजे आणि डॉल्बीबद्दल बापट बोलत होते, तिथपर्यंत ठीक होते, लोकांचा पाठिंबा होता. पण आता विद्यानंद बापटांचा हा पोटशूळ थेट गणपती आणि आपल्या पारंपरिक उत्सवांपर्यंत पोहोचला आहे. आता ते म्हणतात की डीजे तर नकोच, पण ढोल आणि ताशांवरही बंदी घाला म्हणे! म्हणजे आपल्या पूर्वजांपासून चालत आलेली, आपली संस्कृती, आपला अभिमान आणि तरुणांची ऊर्जा असलेली ढोल-ताशांची पारंपरिक वाद्येसुद्धा या बापटांना खुपू लागली आहेत. यावरून काय सिद्ध होते? बापटांना ध्वनीप्रदूषणाची काळजी अजिबात नाहीये, तर त्यांना हिंदू सणांमध्ये मुद्दाम खो घालायचा आहे. ढोल-ताशा ही आपली परंपरा आहे, ती कशी बंद करणार? बापटांना त्रास होतोय म्हणून संपूर्ण महाराष्ट्राने आपले सण आणि उत्सव साजरे करायचे बंद करायचे का? उद्या हे बापट उठून म्हणतील की रस्त्यावरून चालताना मला हॉर्नचा त्रास होतोय, त्यामुळे शहरातली सगळी वाहने बंद करा. किंवा उद्या म्हणतील की मंदिराच्या घंटेचा मला त्रास होतोय, देवळातल्या घंटा बंद करा! हे बोलायलासुद्धा हा नास्तिक कमी करणार नाही. काही बोलण्याचा तालमेळ आहे की तुमचे डोके पूर्णपणे फिरले आहे?

इतकेच नाही, तर या बापटांची मजल इथपर्यंत गेली आहे की ते आता म्हणतात, मानाच्या गणपतींनासुद्धा शहराच्या बाहेर घालवा. पुण्याची ओळख, महाराष्ट्राचा मानबिंदू आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या मानाच्या गणपतींना शहराबाहेर काढायची भाषा हे बापट करत आहेत. आणि सर्वात संतापजनक, धक्कादायक विधान काय? बापट म्हणतात की उत्सवाची दहशत आहे… जसे लष्कर-ए-तोयबा, तसे लष्कर-ए-उत्सव आणि लष्कर-ए-सण! विचार करा! ज्या गणेशोत्सवामध्ये लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळे नागरिक एकत्र येतात, त्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना, ढोल-ताशा पथकातल्या तरुण-तरुणींना हे महाशय थेट आतंकवादी म्हणत आहेत. लष्कर-ए-तोयबासारख्या रक्तरंजित दहशतवादी संघटनेची तुलना आपल्या पवित्र गणेशोत्सवाशी? हा संपूर्ण हिंदू समाजाचा आणि आपल्या सणांचा घोर अपमान आहे.

आता मुख्य गोष्ट ही समजून घेतली पाहिजे की या डाव्यांना, ब्रिगेडींना, बामसेफींना आणि पडद्यामागून काम करणाऱ्या ख्रिश्चन मिशनरी व इस्लामिस्ट विचारसरणीला गणेशोत्सव एवढा डोळ्यात का खुपतो? कारण गणेशोत्सव हा केवळ एक धार्मिक उत्सव उरलेला नाही, तर तो हिंदू समाजाचे एक प्रचंड शक्ती प्रदर्शन आहे. आजची जेन झी म्हणजे नवी तरुण पिढी या गणेशोत्सवामध्ये स्वयंस्फूर्तीने उतरते, रात्रं-दिवस मंडळांमध्ये काम करते, ढोल-ताशा पथकात वादक म्हणून तासनं-तास सराव करते. सर्व जाती-पातीचे भेदभाव विसरून अखंड हिंदू समाज या १० दिवसांत संघटित होत असतो. आणि हीच गोष्ट या हिंदूविरोधी टोळीला पचत नाही. उघडपणे हिंदू संस्कृतीला आणि सणांना विरोध केला तर जनता यांना हुसकावून लावेल, हे यांना पक्के ठाऊक आहे. म्हणूनच हे लोक कधी समाजसेवेचा बुरखा पांघरतात, कधी पर्यावरणवादी बनतात, तर कधी ध्वनीप्रदूषणाचे कारण पुढे करतात. आणि या आडोशाने हिंदू उत्सवांना केविलवाणा विरोध करण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक सण किंवा उत्सव जवळ आला की अशी आळींबे आपोआप उगवत असतात. पण सुदैवाने लोकांच्या आता ही गोष्ट लक्षात आली आहे, त्यामुळे यांना वेळीच तडाखे दिले जात आहेत.

अहो, आपल्या भारतीय रंगीबेरंगी आणि विविधतेने नटलेल्या संस्कृतीतून सण आणि उत्सव बाजूला काढले, तर या भारत देशात उरेल तरी काय? हिंदूंचा सण आला की मेलेले विचारवंत अचानक बिळातून जिवंत होऊन बाहेर येतात. दिवाळी आली की फटाक्यांमुळे प्रदूषण होते, होळी आली की पाणी वाचवा, पंढरपूरची वारी आली की संविधान वारीचे नाटक, आणि गणपती आले की हा बापट बाहेर येतो. बाकीच्या वेळी, इतर धर्मीयांचे सण किंवा जयंत्या असतात, तेव्हा हे सगळे निवांत आपापल्या बिळात आराम करत असतात. मीडियासुद्धा हिंदूविरोधी कोणी काही बोलले की त्याला उचलून धरतो, पण हेच लोक इतर अन्यायावर गप्प बसतात. हे फक्त हिंदू धर्मावरच का घडते? कारण हिंदू सहिष्णू आहे, शांत आहे. म्हणून कोणीही उठावे आणि येऊन हिंदू लोकांवर व त्यांच्या सणांवर टपली मारून जावे?

बापट साहेब, तुमची डावी विचारसरणी आता महाराष्ट्राच्या जनतेसमोर पूर्णपणे उघडी पडली आहे. तुमचा विषय जर खरोखरच फक्त डीजे आणि मर्यादित आवाजापुरता राहिला असता, तर देशातील ऐंशी टक्के जनता तुमच्या पाठीशी उभी होती आणि आम्हीसुद्धा त्यात होतो. पण जेव्हा तुम्ही आपल्या पारंपरिक ढोल-ताशांना विरोध करता, जेव्हा तुम्ही मानाच्या गणपतींना शहराबाहेर घालवायची भाषा करता, जेव्हा तुम्ही हिंदू तरुणी-तरुणांना ‘लष्कर-ए-उत्सव’ म्हणून थेट दहशतवादी ठरवता, तेव्हा तुमचा बुरखा फाटतो. तुमचा हेतू स्पष्ट होतो की तुम्हाला समाजप्रबोधन नकोय, तर तुम्हाला हिंदू संस्कृतीला आणि परंपरांना टार्गेट करायचे आहे.

उत्सवांमध्ये काळाच्या ओघात जर काही गैरप्रकार किंवा अयोग्य गोष्टी शिरल्या असतील, जसे की अति-कर्कश डॉल्बी, तर त्या नक्कीच दूर केल्या पाहिजेत. पण ते नियम पाळून, ती विकृती दूर करून हे उत्सव अधिक जोशात, अधिक उत्साहात आणि अधिक एकजुटीने साजरे झालेच पाहिजेत. बापटांसारख्या भंपक आणि प्लांटेड पपेट्सच्या बडबडीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून हिंदू समाजाने आपली एकता आणि संस्कृती जपली पाहिजे. आणि बापटांना आमचा थेट आणि स्पष्ट इशारा आहे, नास्तिकतेचा बुरखा पांघरून हिंदू सणांवर आणि देवांवर चिखलफेक करणे आता तरी थांबवा. अन्यथा महाराष्ट्राची सुजाण जनता तुम्हाला तुमच्या योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा