राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी अंदमान-निकोबार बेटांतील बियोडनाबाद येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.
भागवत आणि शाह यांनी श्री विजयपुरम येथील बी.आर. आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (DBRAIT) येथे आयोजित कार्यक्रमालाही हजेरी लावली, जिथे सावरकरांवरील एक गीत प्रकाशित करण्यात आले.
हे कार्यक्रम सावरकरांच्या ‘सागरा प्राण तळमळला’ या सुप्रसिद्ध कवितेच्या ११६ व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आले होते.
सावरकरांना १९११ साली ब्रिटीशांनी पोर्ट ब्लेअर (आताचे श्री विजयपुरम) येथे कैद केले होते. त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली होती. अत्यंत हालअपेष्टांमध्ये त्यांनी हा तुरुंगवास भोगला.
पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात बोलताना मोहन भागवत म्हणाले की अंदमान बेटे दोन महान व्यक्तिमत्त्वांचे घर आहे, ते म्हणजे ‘वीर’ सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस. सावरकरांनी भारतासाठी वापरलेल्या ‘हिंदू राष्ट्र’ या संकल्पनेचे सरसंघचालकानी कौतुक केले.
भागवत म्हणाले, “सावरकरांनी फक्त भारताला ‘हिंदू राष्ट्र’ असे संबोधले नाही, तर त्यामागील कारणही स्पष्ट केले. ही सिंधूची भूमी, पितृभूमी आणि हिंदूंची पवित्र भूमी असल्यामुळे त्यांनी भारताला ‘हिंदू राष्ट्र’ म्हटले.”
हे ही वाचा:
ठाणे मनपा एथलेटिक्सच्या खेळाडूंनी जिंकली ९ पदके
मोदींच्या या दौऱ्यामुळे पश्चिम आशिया, आफ्रिकेत वाढेल भारताची निर्यात
भागवत पुढे म्हणाले की, १८५७ ते १९४७ दरम्यान देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले किंवा प्राणार्पण केले, त्या सर्व व्यक्ती “एका आकाशगंगेप्रमाणे” आहेत. त्या आकाशगंगेतला सर्वात तेजस्वी तारा म्हणजे वीर सावरकर,” असे ते म्हणाले.
गृहमंत्री अमित शाह यांनी सावरकरांना भारतीय सांस्कृतिक मूल्ये, परंपरा आणि इतिहासातून उद्भवणाऱ्या सामूहिक ओळखीचे सर्वात स्पष्ट, ठाम आणि प्रभावी प्रतिपादन करणारे विचारवंत म्हणून गौरवले.
शाह म्हणाले, ब्रिटीशांनी कायम भारतीयांवर गुलामगिरीची मानसिकता लादण्याचा प्रयत्न केला. त्यांनी १८५७ च्या उठावाला ‘बंड’ असे नाव दिले, पण सावरकरांनी त्याला ‘स्वातंत्र्याची लढाई’ म्हटले आणि भारतीयांना आत्मविश्वास दिला. या विषयावर त्यांनी लिहिलेलं पुस्तक छापण्याआधीच बंदी घालण्यात आले. असे भाग्य कोणत्याही पुस्तकाला प्रथमच लाभले. या पुस्तकात त्यांनी १८५७ च्या संघर्षाला भारताचे पहिले स्वातंत्र्यसमर म्हणून परिभाषित केले.”
शाह यांनी पुढे सांगितले की ‘वीर’ ही उपाधी कोणत्याही सरकारने दिलेली नसून देशातील जनतेने स्वतः दिली आहे, आणि हेच सावरकरांच्या विचारांचे आणि कार्याचे जनमान्यत्व दर्शवते.







