दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत त्याने सलग दोन शतके ठोकत दणका दिला. आता तिसरा आणि शेवटचा वनडे शनिवारी विशाखापत्तनममध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यातही विराटने शतक ठोकले तर, तो 2018 मधील स्वतःचाच करिश्मा पुन्हा जिवंत करू शकतो आणि नवा इतिहास रचू शकतो.
वनडे क्रिकेटमधील महानतम फलंदाजांपैकी एक मानल्या जाणाऱ्या विराटने 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत सलग तीन वनडे सामन्यांत तीन शतके ठोकली होती. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेतही जर त्याच्या बॅटमधून तिसरे सलग शतक बाहेर पडले, तर हे त्याच्या कारकिर्दीतील दुसरे असे यश ठरेल. असे करणारा भारताचा पहिला खेळाडू म्हणून त्याची नोंद होईल.
विशाखापत्तनममध्ये तर विराट कोहलीचे आकडे आणखी भव्य आहेत.
2011 ते 2023 दरम्यान येथे खेळलेल्या 7 वनडे सामन्यांत त्याने 587 धावा, 3 शतके आणि 2 अर्धशतके ठोकली आहेत. त्यामुळे तिसऱ्या वनडेतही कोहली दक्षिण आफ्रिकेवर भारी पडू शकेल, अशी मोठी शक्यता आहे.
वनडे क्रिकेटमध्ये विराटशिवाय रोहित शर्मा, डिव्हिलियर्स, क्विंटन डी कॉक, हर्शल गिब्स, जॉनी बेयरस्टो आणि रॉस टेलर यांनीही सलग तीन शतके ठोकली आहेत.
पाकिस्तानचे जहीर अब्बास, सईद अनवर आणि बाबर आझम यांनी सलग तीन वनडे शतकांची ही उपलब्धी दोनदा साध्य केली आहे. तर फखर झमानने असे एकदा केले आहे.







