मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काकोरी ट्रेन लूट शताब्दी समारोहाच्या समारोपप्रसंगी देशासाठी बलिदान दिलेल्या क्रांतीकारकांना अभिवादन करत, सध्याच्या पिढीला राष्ट्रभक्ती व स्वदेशी वस्तूंचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.
मुख्यमंत्री म्हणाले, “स्वदेशी आपल्या जीवनाचं ध्येय असावं, स्वदेशीच आपलं मंत्र असावा. आपण स्वदेशीसाठी जगू आणि देशासाठी मरू. ही राष्ट्रभक्तीची पराकोटीची भावना आपल्यात असेल, तर भारताला कोणतीही शक्ती थांबवू शकणार नाही. स्वातंत्र्याचा हा संदेश आज आपल्याला प्रेरणा देतोय.”
योगी यांनी ९ ऑगस्ट १९२५ च्या काकोरी घटनेचा उल्लेख करत सांगितले की, “ज्या क्रांतीकारकांनी ब्रिटिश सरकारच्या खजिन्यावर हल्ला करून तो पैसा स्वातंत्र्यलढ्यात वापरला, त्यांनी भारतात राष्ट्रभक्तीची मशाल पेटवली. त्याचाच परिणाम म्हणजे १९४७ मध्ये देश स्वतंत्र झाला.”
काकोरी लुटीत फक्त ४,६०० रुपये लुटले गेले होते, पण ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी १० लाखांहून अधिक रुपये खर्च केले. पं. रामप्रसाद बिस्मिल, अशफाकउल्ला खान, ठाकुर रोशन सिंह, राजेंद्रनाथ लाहिरी यांना कोणतीही सुनावणी न करता फाशी देण्यात आली. चंद्रशेखर आझाद ब्रिटिशांच्या हाती लागले नाहीत, त्यांनी लढता लढता वीरमरण पत्करलं.
मुख्यमंत्री म्हणाले, “आजपासून शंभर वर्षांपूर्वी जे शूर क्रांतीकारक देशासाठी शहीद झाले, त्यांचं स्मरण करून आपलं ऋण फेडण्यासाठी प्रत्येक भारतीयाने पूर्ण समर्पणाने झोकून द्यायला हवं.”
योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘हर घर तिरंगा’ या आवाहनाची आठवण करून दिली. त्यांनी म्हटलं, “प्रत्येक घरावर तिरंगा फडकवला पाहिजे, प्रत्येक गावात, प्रभागात तिरंगा यात्रेचं आयोजन झालं पाहिजे. आपण तिरंग्याच्या माध्यमातून देशाच्या एकतेचा संदेश देत, फुटीरतावादाला चोख प्रत्युत्तर देऊ.”
त्यांनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत भारतीय लष्कराच्या शौर्याचे कौतुक केले आणि सांगितले की, “दुश्मनांनी लादलेल्या युद्धाला आपल्याकडील जवानांनी दिलेलं उत्तर पाहून जगाने भारताच्या ताकदीला मान्यता दिली आहे.”
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, “विदेशी वस्तू विकत घेतल्यास आपला पैसा बाहेर जातो आणि तोच पैसा दहशतवादाला पोसतो. यंदाच्या रक्षाबंधन, जन्माष्टमी, दसरा, दीपावली आणि छठ या सणांमध्ये फक्त स्वदेशी वस्तूंचा वापर करा. स्वदेशी खरेदीमुळे आपल्या कारागिरांना काम मिळतं आणि देशाचं आर्थिक बळ वाढतं.”
योगी यांनी २ ऑक्टोबरला प्रत्येक उत्तर प्रदेशवासीयाने गांधी आश्रमातून खादी खरेदी करण्याचं आवाहन केलं.
कार्यक्रमात योगी आदित्यनाथ यांनी काकोरी ट्रेन अॅक्शनमध्ये शहीद झालेल्या क्रांतीकारकांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी पीपळाचं झाड लावलं, छोट्या मुलींकडून राखी बांधून घेतली, मिठाई व चॉकलेट भेट दिली, तसेच म्युझियममध्ये सेल्फी आणि फोटोशूटही केलं.
यावेळी शहीदांच्या कुटुंबीयांचा मंचावर सन्मान करण्यात आला आणि काकोरी घटनेवर आधारित पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. संस्कृती विभागाकडून सादर करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात काकोरी घटनेचे चित्रण करण्यात आले.







