उत्तराखंडच्या निसर्गरम्य दऱ्या-खोऱ्यांमध्ये वसलेले नैनीताल आता फक्त पर्यटकांचीच नव्हे तर किंग कोब्राचीही आवडती जागा बनत आहे. वन विभागाच्या अलीकडच्या अहवालानुसार, हा अत्यंत धोकादायक साप, जो पूर्वी फक्त दाट जंगलांमध्ये आणि तराई भागात दिसायचा, तो आता नैनीतालच्या रहिवासी वसाहतींपर्यंत पोहोचला आहे. सन २०१५ ते २०२० या काळात उत्तराखंडात किंग कोब्राच्या एकूण १३२ दर्शनांपैकी तब्बल ८३ वेळा तो नैनीताल जिल्ह्यात आढळला. हे आकडे स्पष्ट करतात की पारंपरिक वर्षावनांबाहेर किंग कोब्राची सर्वाधिक संख्या नैनीतालमध्ये आहे.
नैनीतालमधील वाढते तापमान किंग कोब्रासाठी पोषक वातावरण निर्माण करत आहे. प्रथमच २००६ मध्ये नैनीतालच्या भवाली फॉरेस्ट रेंजमध्ये किंग कोब्रा दिसला. त्यानंतर २०१२ मध्ये मुक्तेश्वर येथे २३०३ मीटर उंचीवर त्याचे घरटे सापडले, जे जागतिक विक्रम मानले जाते. आतापर्यंत नैनीतालमध्ये १८ फूट लांबीचा किंग कोब्रा रेस्क्यू करण्यात आला आहे. नैनीताल प्राणीसंग्रहालयातील रेंजर आनंद लाल यांनी आयएएनएसशी बोलताना सांगितले की, किंग कोब्रा हा थंड रक्ताचा साप आहे, ज्याला उष्णतेची गरज असते. नैनीतालच्या बांज आणि पिरुळाच्या पानांमधून निघणारी उष्णता यासाठी आदर्श ठरते. याच पानांच्या ढिगाऱ्यात किंग कोब्रा आपले घरटे तयार करतो.
हेही वाचा..
भारत आत्मनिर्भर आणि सक्षम देश; मोदींच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित!
भारत-जपान संबंध ‘मेड फॉर इच अदर’ !
परदेशी गुंतवणूक प्रकरणात ईडीची छापेमारी
३० हून अधिक आयएफएस अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या बदलल्या
त्यांनी सांगितले की, किंग कोब्रा हा जगातील सर्वात मोठा विषारी साप आहे, ज्याची लांबी १८ फूटांपर्यंत जाऊ शकते. हा एकमेव साप आहे जो अंडी घालण्यासाठी घरटे बांधतो. मादी किंग कोब्रा अंड्यांचे संरक्षण करण्यासाठी तब्बल ८० ते १०० दिवस उपाशी राहते. भारतात हा साप वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षित आहे. याशिवाय, वन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, किंग कोब्रा दिसल्यास घाबरू नये आणि त्वरित वन विभागाला कळवावे. वाढते तापमान आणि अनुकूल वातावरण यामुळे नैनीताल किंग कोब्राचे नवे ठिकाण बनत असून स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.







