लडाखला राज्याचा दर्जा देण्याच्या आणि संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याच्या मागण्यांदरम्यान २४ सप्टेंबर रोजी हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारानंतर लेहमध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत निर्बंध लागू आहेत. यानुसार जिल्ह्यात पाच किंवा त्याहून अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी आहे. पूर्व लेखी परवानगीशिवाय कोणतीही मिरवणूक, रॅली किंवा मोर्चा काढता येणार नाही. तर, अशांततेच्या पार्श्वभूमीवर लेहमध्ये सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत.
लेहमधील भाजप कार्यालयाला लक्ष्य करून झालेल्या निदर्शनांना हिंसक वळण लागल्यानंतर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. गुरुवारी, लडाखचे उपराज्यपाल कविंदर गुप्ता यांनी सार्वजनिक सुरक्षेबाबत वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, केंद्रशासित प्रदेशातील सद्य परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी लेह येथे उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. या बैठकीला मुख्य सचिव पवन कोतवाल, पोलिस महासंचालक एसडी सिंग जामवाल आणि भारतीय लष्कर आणि इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान, उपराज्यपालांनी लडाखमध्ये शांतता, सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी अधिक दक्षता, अखंड आंतर-एजन्सी समन्वय आणि सक्रिय उपाययोजनांची आवश्यकता यावर भर दिला.
हे ही वाचा:
सोनम वांगचुक यांचे उपोषण आणि लडाख समोरील खरा प्रश्न..!
ट्रम्प यांचा नवा टॅरिफ वार; औषधांवर १०० टक्के कर
भाजपाकडून बिहार, बंगाल, तामिळनाडूत निवडणूक प्रभार्यांची नियुक्ती
सोनम वांगचुक आणि त्यांच्या संस्थेची परकीय निधी कायदा उल्लंघन प्रकरणी चौकशी
दरम्यान, उपोषणासह निषेधाचे नेतृत्व करणारे सोनम वांगचुक हे केंद्रशासित प्रदेशातील तणावासाठी जबाबदार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. या हिंसाचारामुळे राजकीय वाद निर्माण झाला, जिथे भाजप नेते अमित मालवीय यांनी आरोप केला की काँग्रेसचे नगरसेवक फुटसोग स्टॅनझिन त्सेपाग यांनी बुधवारी लेहमधील भाजप कार्यालयावर हल्ला करणाऱ्या निदर्शकांना भडकावले होते. वांगचुक यांनी निदर्शनांमध्ये काँग्रेसची भूमिका नाकारली आणि एएनआयला सांगितले की, भाजप कार्यालयात घुसलेल्या व्यक्तीचे नाव काय आहे? काही आठवड्यांपूर्वी, काँग्रेस पक्षाला आमच्या संस्थेतून काढून टाकण्यात आले जेणेकरून ते अराजकीय राहू शकेल. त्यामुळे या चळवळीचा काँग्रेसशी काहीही संबंध नाही. त्यांना निवडणुका संपेपर्यंत चळवळीपासून दूर जाण्यास सांगण्यात आले होते.







