आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करत असताना एकीकडे या चित्रपटाला राजकीय वादाला तोंड द्यावे लागत आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी चित्रपटावर तीव्र टीका करत त्याला खोटी फिल्म आणि द्वेष पसरवण्याचे माध्यम असे म्हटले आहे. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, पाकिस्तानवर आधारित कथा भारतीय प्रेक्षकांसमोर का मांडली जात आहे?
वृत्तसंस्थेशी बोलताना अबू आझमी म्हणाले, “हा चित्रपट फक्त द्वेष पसरवण्यासाठी बनवला आहे. ही एक खोटी फिल्म आहे. ही पाकिस्तानी फिल्म आहे, तर ती पाकिस्तानच्या लोकांना का दाखवत नाही? भारतातील लोकांना का दाखवत आहे?” आझमी यांनी आरोप केला की, या चित्रपटात मुस्लिम समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यांच्या मते, काही गुन्हेगार दाखवून संपूर्ण समाजाची प्रतिमा खराब केली जात आहे, तर व्यापक सामाजिक वास्तवांकडे दुर्लक्ष केले जात आहे.
यापूर्वी समाजवादी पक्षाचे आणखी एक आमदार रईस शेख यांनीही या चित्रपटावर टीका केली होती. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की, ‘धुरंधर’सारखे चित्रपट कथाकथन आणि राजकीय संदेश यांच्यातील सीमारेषा धूसर करतात आणि वारंवार एका सरकारची स्तुती करतात. हे कला नाही, तर एक अजेंडा आहे. तसेच त्यांनी सिनेमाचा वापर प्रचारासाठी होत असल्याचा आरोपही केला.
हे ही वाचा:
काबूलमधील रुग्णालयावरील पाकिस्तानच्या हल्ल्यावर जागतिक मानवाधिकार संघटनेकडून सवाल
जगभरात दहशतवादात घट पण, पाकिस्तानमध्ये ६ % वाढ
कतारच्या ऊर्जा पायाभूत सुविधेवर इराणचा हल्ला; पुढील पाच वर्षे १७% LNG उत्पादन ठप्प
इराणमध्ये १९ वर्षीय चॅम्पियन कुस्तीपटूसह दोन आंदोलकांना सार्वजनिकरित्या दिली फाशी
दरम्यान, वारिस पठाण यांनीही म्हटले की, चित्रपटांचा उद्देश ज्ञान आणि मनोरंजन देणे हा असावा, मात्र काही निर्माते नफ्यासाठी नकारात्मकता पसरवत आहेत. वाद वाढत असतानाही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. प्रदर्शित झाल्याच्या पहिल्याच दिवशी त्याने १०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला असून आतापर्यंत एकूण कमाई १४५.५५ कोटी रुपये (सर्व भाषांमध्ये) झाली आहे. या स्पाय-ऍक्शन थ्रिलर चित्रपटात रणवीर सिंगसह आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, राकेश बेदी आणि सारा अर्जुन यांसारखे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये आहेत.







