केरळमध्ये काँग्रेस पक्षासाठी एका कार्यक्रमात लाजिरवाणी घटना घडली. पक्षाच्या १४० व्या स्थापना दिनाच्या समारंभात कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी राष्ट्रगीत चुकीचे गायले. यात केवळ कार्यकर्तेच नव्हे तर माजी संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांच्यासह राज्यातील वरिष्ठ नेते उपस्थित होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पक्षाची नाचक्की झाली.
शनिवारी केरळ प्रदेश काँग्रेस कमिटी (केपीसीसी) मुख्यालयात ही घटना घडली. यावेळी राष्ट्रगीतासाठी नेते उभे राहताच, मुख्य गायकाने सुरुवातीच्या ओळी “जन-गण-मन- अधिनायक जय हे” ऐवजी “जन-गण-मंगला-दयाका जय हे” असे म्हटले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे कॉंग्रेसची नाचक्की झाली आणि विरोधी पक्ष तसेच जनतेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
ए के अँटनी, व्हीएम सुधीरन, पीसी विष्णुनाध आमदार आणि एआयसीसी सरचिटणीस दीपा दासमुंसी यांच्यासह वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत ही चूक झाली. चूक असूनही, कोणत्याही नेत्याने हस्तक्षेप केला नाही किंवा ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला नाही आणि राष्ट्रगीत चुकीच्या शब्दांनीच पूर्ण झाले.
हे ही वाचा:
उस्मान हादीच्या हत्येचा खटला २४ दिवसांत पूर्ण करा!
केरळात मत्ताथूरमध्ये काँग्रेस सत्तातूर; भाजपशी हातमिळवणी
आंध्र प्रदेशात टाटा- एर्नाकुलम एक्सप्रेसचे दोन डबे आगीत जाळून खाक
थंडीत अचानक वाढतात हृदयाचे ठोके?
कॉंग्रेस पक्षाशी संबंधित ही पहिलीच घटना नाही. या वर्षाच्या सुरुवातीला, वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या आणखी एका कार्यक्रमात राष्ट्रगीत चुकीचे गायले गेले होते, ज्याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता आणि त्यावर व्यापक टीका झाली होती. या प्रकरणावर काँग्रेस नेतृत्वाकडून त्वरित कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.







