भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जायसवाल याला सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये राजस्थानविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर रुग्णालयात दाखल करावे लागले. सामना संपल्यानंतर त्याच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला.
यशस्वी जायसवाल याला पोटात तीव्र ऐंठन जाणवू लागल्याने त्याला पुण्यातील आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला सध्या पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सामना सुरू असतानाच यशस्वीला पोटात त्रास जाणवत होता आणि सामना संपल्यानंतर त्याची प्रकृती अधिक बिघडली. रुग्णालयात त्याच्यावर अल्ट्रासाऊंड आणि सीटी स्कॅन तपासण्या करण्यात आल्या. तपासणीनंतर डॉक्टरांना त्रासाचं नेमकं कारण समजलं असून सध्या यशस्वीची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.
बीसीसीआयकडून याबाबत अद्याप कोणताही अधिकृत अपडेट देण्यात आलेला नाही, मात्र येत्या काही दिवसांत अधिक स्पष्ट माहिती मिळण्याची शक्यता आहे.
यशस्वी जायसवाल सध्या भारतीय टी-२० संघाचा भाग नसल्यामुळे तो सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळत आहे. याआधी हरियाणाविरुद्धच्या सामन्यात त्याने स्फोटक शतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला होता आणि भारतीय टी-२० संघात सलामीवीर म्हणून आपला दावा मजबूत केला होता.
हरियाणाविरुद्ध पारीची सुरुवात करताना यशस्वीने ५० चेंडूत १६ चौकार आणि १ षटकार लगावत १०१ धावांची दमदार खेळी केली होती. त्याने २३ चेंडूत अर्धशतक आणि ४८ चेंडूत शतक पूर्ण केलं होतं.
भारतीय टी-२० संघात सध्या उपकर्णधार शुभमन गिल अभिषेक शर्मासोबत सलामीला येत आहे. मात्र टी-२० प्रकारात सलामीवीर म्हणून गिलची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. जायसवाल आणि संजू सॅमसन यांसारख्या फलंदाजांना बाजूला ठेवून गिलला संधी देण्यात आल्याने चर्चा रंगत आहेत. अशातच जायसवालच्या शतकामुळे गिलवरील दबाव अधिक वाढला आहे.
आत्तापर्यंत यशस्वी जायसवालने भारतीय संघासाठी २३ टी-२० सामने खेळत २२ डावांमध्ये १ शतक आणि ५ अर्धशतकांच्या जोरावर ७२३ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट १६४.३२ इतका प्रभावी आहे.







