गुजरातमधील एका प्रवाशाला गर्दीमुळे डब्यात चढताच न आल्यामुळे त्याच्या दिवाळीच्या आनंदावर विरजण पडले आहे. त्याच्याकडे एसीचे तिकीट असूनही त्याच्यावर ही वेळ आल्याने त्याने सोशल मीडियावर भारतीय रेल्वेवर सडकून टीका करून तिकिटाचे संपूर्ण पैसे आपल्याला परत द्यावे, अशी मागणी केली आहे. त्याची ही पोस्ट खूप व्हायरल झाली आहे.
गुजरातमधील वडोदरा येथील अंशुल सक्सेना याने त्याच्या गावी जाण्यासाठी थ्री एसीचे तिकीट काढले होते. मात्र एसी डबाही विनातिकीट प्रवाशांनी तुडुंब भरला असल्याने अंशुल त्या डब्यात चढू शकला नाही. त्यामुळे कन्फर्म्ड तिकीट असूनही तो जाऊ शकला नाही. त्यानंतर संतापाच्या भरात अंशुल याने ‘एक्स’ या सोशल मीडिया साइटवर भारतीय रेल्वेला उद्देशून ‘माझ्या दिवाळीच्या आनंदावर विरजण पाडल्याबद्दल आपले आभार,’ अशी उपहासात्मक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना टॅग करून आपले एक हजार १७३ रुपये ९५ पैसे आपल्याला परत हवे आहेत, अशी मागणी केली आहे. अशी मागणी करताना त्याने रेल्वे स्थानक आणि डब्यातील गर्दीचे व्हिडीओ आणि छायाचित्रे पोस्ट केली आहेत.
हे ही वाचा:
पंजाबमध्ये १०० गाड्या एकमेकांवर धडकल्या
दिल्लीमधील प्रदूषणाची पातळी ९९९ वर
महुआ मोईत्रा यांना पक्षाची नवी जबाबदारी!
‘भारतात काय बदलले? उत्तर नरेंद्र मोदी आहेत’
‘भारतीय रेल्वेचे अतिशय ढिसाळ व्यवस्थापन. माझ्या दिवाळीच्या आनंदावर विरजण टाकल्याबद्दल आपले आभार. तुमच्याकडे थ्रीएसीचे तिकीट असूनही तुमच्यावर ही परिस्थिती ओढवली. पोलिसांकडून कोणतीही मदत मिळू शकली नाही. माझ्यासारखे अन्य प्रवासीही या रेल्वेत चढू शकले नाहीत,’ असे अंशुलने या पोस्टमध्ये नमूद केले आहे. ‘मजुरांच्या गर्दीने मला रेल्वेबाहेर ढकलून दिले. त्यांनी दरवाजे बंद केले आणि कोणालाही रेल्वेमध्ये शिरू दिले नाही. पोलिसांनी मला मदत करण्यास स्पष्टपणे नकार दिला आणि ते माझ्या परिस्थितीवर दात काढून हसत होते, असेही अंशुलने यात म्हटले आहे. त्यावर असंख्य प्रवाशांनी प्रतिक्रिया देऊन रेल्वे प्रशासनाचे वाभाडे काढले आहेत.







