गुरुवारी फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये एका बंदुकधारी व्यक्तीने केलेल्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या गोळीबाराच्या घटनेत सहा जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, या घटनेतील पीडित हे विद्यापीठाचे विद्यार्थी नव्हते. आरोग्य विभागाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, त्यांना गोळीबाराच्या घटनेची पूर्ण माहिती देण्यात आली आहे. ही एक भयानक गोष्ट आहे. अशा गोष्टी घडणे हे भयानक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. या प्रकरणात एका २० वर्षीय संशयितावर गोळीबार करण्यात आला आणि त्याला कायदा अंमलबजावणी कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. फिनिक्स इकनर असे या संशयिताचे नाव आहे. या अचानक झालेल्या गोळीबारामुळे विद्यापीठातील विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्यात भीतीचे वातावरण असून ते कॅम्पसमध्ये घडलेल्या घटनेने घाबरले आहेत. गोळीबाराचे साक्षीदार असलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले की ते जिवंत राहिल्याबद्दल स्वतःला खूप भाग्यवान मानतात.
हे ही वाचा :
महाराष्ट्रावर हिंदी लादू नका, नाहीतर संघर्ष अटळ!
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, २२ नक्षलवाद्यांना अटक!
“पाकिस्तानचा काश्मीरशी एकमेव संबंध म्हणजे बेकायदेशीरपणे व्यापलेला प्रदेश रिकामा करणे”
विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेजवळ ही गोळीबाराची घटना घडली. त्यानंतर लगेचच, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या आणि गस्तीच्या गाड्या कॅम्पसमध्ये पोहचल्या. संशयिताने आदेशांचे पालन न केल्याने पोलिसांनी त्याला गोळी घालून जखमी केले. जवळजवळ तीन तासांच्या या नाट्यमय घडामोडीनंतर दुपारी ३ वाजता विद्यापीठातील लॉकडाऊन उठवण्यात आला. लोकांना कॅम्पसमध्ये फिरण्यास मोकळीक देण्यात आली तर त्यांना शूटिंग साइटपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला. फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डीसँटिस यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आणि एक्स वर म्हटले की, “आमच्या प्रार्थना पीडितांच्या कुटुंबासोबत आहेत आणि राज्य कायदा अंमलबजावणी सक्रियपणे प्रतिसाद देत आहे.”







