जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख आणि भारताचा सर्वात मोस्ट वाँटेड दहशतवादी मसूद अझहर याला पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तान भागात स्कर्दू शहरात, सदपारा रोड परिसरात पाहिल्याची ताजी गुप्तचर माहिती भारताला मिळाली आहे. हे ठिकाण त्याच्या बहरावलपूरमधील मूळ तळापासून तब्बल १ हजार किमी दूर आहे.
हा परिसर पर्यटनासाठी प्रसिद्ध असून येथे निसर्गरम्य तलाव आणि उद्याने आहेत, पण UN ने बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचा प्रमुख येथे आश्रय घेत असल्याचे वृत्त धक्कादायक आहे. या भागात दोन मशिदी, त्यांना संलग्न मदरसे आणि काही खासगी तसेच सरकारी गेस्ट हाऊसेस आहेत.
बिलावल भुट्टो यांचा दावा खोटा
पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी अलीकडेच दावा केला होता की, मसूद अझहर अफगाणिस्तानात असू शकतो, आणि तो पाकिस्तानी भूमीवर सापडल्यास भारताच्या ताब्यात देण्याची तयारी पाकिस्तान दाखवेल, असे त्यांनी अल जझीरा या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.
मसूद अझहर भारतावर झालेल्या अनेक भयंकर दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाइंड मानला जातो. यात २०१६ चा पठाणकोट हवाई तळावरचा हल्ला आणि २०१९ चा पुलवामा हल्ला यांचा समावेश होतो. पुलवामा हल्ल्यात ४० हून अधिक जवान शहीद झाले होते.
हे ही वाचा:
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या मुलाला वाढदिवशीच अटक!
भारताचा पहिला ‘अँग्लो-इंडियन वर्ल्ड कप हिरो
गुरूपौर्णिमेविरुद्ध डाव्यांचा कांगावा
अवकाशातून परतल्यानंतर शुभांशू शुक्ला कसे आहेत?
बहावलपूर येथील तळावर भारताचे हवाई हल्ले
भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत अझहरच्या बहरावलपूर येथील जमिया सुभान अल्लाह या मुख्यालयावर हवाई हल्ला केला होता. त्या वेळी अझहरच्या कुटुंबातील 10 सदस्य ठार झाले होते, असे अहवाल सांगतात. तसेच त्याचे जमिया उस्मान ओ अली हे दुसरे केंद्रही तेथे आहे, जे एका दाट लोकवस्तीतील मशिदीशेजारी आहे.
जैश-ए-मोहम्मदचे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स जाणूनबुजून जुन्या भाषणांचे ऑडिओ क्लिप्स पसरवून, अझहर अजूनही बहावलपूरमध्येच असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करत आहेत. २०१९ मध्ये झालेल्या बालाकोट एअर स्ट्राईकनंतरही अझहरला पेशावरमधील एका सुरक्षित ठिकाणी हलवले गेले होते. त्यामुळे त्याला पुन्हा बहरावलपूर सोडून स्कर्दू येथे हलवण्यात आल्याचे ही नवीन माहिती सूचित करते.
सैयद सलाहुद्दीनही पाकिस्तानमध्ये सुरक्षित
मसूद अझहरच नाही तर, दुसरा भारत-विरोधी दहशतवादी, हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सैयद सलाहुद्दीन सुद्धा इस्लामाबादमधील आलिशान भागात सुरक्षितपणे राहत असल्याचे सांगितले जाते. तो बर्मा टाउन या उपनगरात एका कार्यालयातून कार्यरत असून बंदुकधारी सुरक्षा रक्षकांसह सतत दिसून येतो.







