हिंदीच्या तथाकथिक सक्तीवरून मराठी भाषेसाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे ५ जुलैच्या विजयी मेळाव्यात एकत्र आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा हे दोन बंधू एकत्र दिसले ते उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त. उद्धव ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या वांद्रे येथील मातोश्रीवर राज ठाकरे रविवारी पोहोचले आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांना पुष्पगुच्छ देत त्यांचे अभिष्टचिंतन केले. ही या दोन बंधूंची वेगळे झाल्यानंतर तिसऱ्यांदा मातोश्रीवर झालेली भेट आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे यासाठी गेले अनेक वर्षे वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केले गेले. मात्र तसे होऊ शकले नाही. यंदा मात्र राज्य सरकारने घेतलेल्या त्रिभाषा सूत्राच्या निर्णयावरून मराठी भाषिकांचे नुकसान होत असल्याचा दावा करत ठाकरे बंधूंनी ५ जुलैला आंदोलनाची हाक दिली होती. मात्र त्याआधी, सरकारने तो जीआर रद्द केल्यानंतर त्या आंदोलनाचे रूपांतर विजयी मेळाव्यात करण्यात आले. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकाच मंचावर एकत्र दिसले होते. निवडणुकीतही ही युती होणार असा अंदाज बांधण्यात येऊ लागला.
हे ही वाचा:
जायकवाडीच्या धरणसाठ्यात वाढ, मराठवाड्याला अलर्ट
भारत आणि मालदीव वाढवणार द्विपक्षीय सहकार्य
जगभरात पुन्हा वाजला पंतप्रधान मोदींचा डंका
‘श्रवणकुमार’ बनले रामपूरचे चार भाऊ …
मात्र राज ठाकरे यांनी ही युती केवळ मराठीच्या मुद्द्यावर झालेली आहे, इथे राजकारणाचा संबंध नाही, असे म्हटले होते. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत ही युती होणार का, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मात्र आता राज ठाकरे यांनी पुढाकार घेऊन उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी शुभेच्छा देण्यासाठी मातोश्री गाठली आणि आपण विशाल हृदयाचे आहोत, हे दाखवून दिले.
यानिमित्ताने दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला. पुन्हा एकदा युतीची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली. मनसेचे प्रमुख पदाधिकारी आणि शिवसेना उबाठाचे पदाधिकारी यावेळी एकत्र आले होते. या दोन पक्षातील, दोन भावांमध्ये युती झाल्याचेच हे चिन्ह आहे, अशा प्रतिक्रिया विविध कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
याआधी, उद्धव ठाकरे यांच्यावर लिलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी झाल्यानंतर २०१२मध्ये राज ठाकरे त्यांना भेटायला रुग्णालयात गेले होतेच, पण त्यानंतर गाडीतून त्यांनी उद्धव ठाकरेंना मातोश्रीपर्यंत सोबत केली. नंतर ते जवळपास अर्धा तास मातोश्रीवर होते. त्यानंतर पुन्हा एकदा राज ठाकरे मातोश्रीवर गेले आहेत. त्याआधी, २०१६मध्येही राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते. तेव्हाही या दोन बंधूंमध्ये तासभर चर्चा झाली होती.







