पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’च्या १२४व्या भागात देशातील ऐतिहासिक किल्ल्यांचा उल्लेख करत त्यांना भारताच्या समृद्ध वारशाचे प्रतीक म्हटले. त्यांनी सांस्कृतिक वारशावर चर्चा करताना चित्तौडगड, कालिंजर आणि इतर किल्ल्यांचा उल्लेख केला आणि सांगितले की, हे फक्त विटा व दगड नाहीत, तर आपल्या अभिमान आणि संस्कृतीच्या कथा आहेत.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “देशातील हे किल्ले अनेक आक्रमणे व कठोर हवामान सहन करूनही अडगळलेले नाहीत. राजस्थानमधील चित्तौडगड, कुंभलगड, रणथंबोर, आमेर आणि जैसलमेर हे किल्ले जगप्रसिद्ध आहेत. कर्नाटकमधील गुलबर्गा व चित्रदुर्ग किल्ले त्यांच्या भव्यतेने आश्चर्यचकित करतात. हे पाहून मनात प्रश्न येतो – त्या काळात एवढे भव्य किल्ले कसे बांधले गेले असतील?” त्यांनी उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यातील कालिंजर किल्ल्याचा उल्लेख केला, ज्यावर महमूद गझनीने अनेकदा आक्रमण केले, पण दरवेळी पराभूत झाला. त्यांनी बुंदेलखंडमधील ग्वाल्हेर, झाशी, दतिया, अजयगड, गढकुंडार आणि चंदेरी किल्ल्यांचाही उल्लेख केला.
हेही वाचा..
लाखो विद्यार्थी जोडले गेले इन्स्पायर मानक योजनेला!
राज ठाकरेंनी पुन्हा दाखविला दिलदारपणा…उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले ‘मातोश्री’वर
मेलबर्नमध्ये सौरभ आनंद यांच्यावर तलवारीने हल्ला
गाझामधील तात्पुरत्या युद्धविरामाला नेतन्याहूंची मान्यता
पंतप्रधानांनी सांगितले की, युनेस्कोने १२ मराठा किल्ल्यांना ‘जागतिक वारसा स्थळ’ म्हणून मान्यता दिली आहे. यातील ११ किल्ले महाराष्ट्रात तर एक किल्ला तामिळनाडूमध्ये आहे. प्रत्येक किल्ला म्हणजे इतिहासाचे एक पान आहे. प्रत्येक दगड, एका ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार आहे. मोदी म्हणाले, प्रतापगड किल्ला, जिथे शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा पराभव केला, आजही त्यांची वीरता आपल्याला जाणवते. विजयदुर्ग किल्ला, ज्यामध्ये गुप्त बोगदे होते, हे त्यांच्या दूरदृष्टीचे प्रतीक आहे.
पंतप्रधानांनी आपल्या रायगड दौऱ्याचाही उल्लेख केला. ते म्हणाले, काही वर्षांपूर्वी मी रायगडला गेलो होतो. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झालो होतो. हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहील. ते पुढे म्हणाले, सल्हेरचा किल्ला, जिथे मुघल पराभूत झाले. शिवनेरी, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला – एक असा किल्ला, जो शत्रूला भेदता आला नाही. खानदेरीचा किल्ला, समुद्राच्या मध्यभागी असलेला हा अद्भुत किल्ला… शत्रू त्यांना थांबवू इच्छित होते, पण शिवाजी महाराजांनी अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली.
पंतप्रधानांनी देशवासीयांना आवाहन केले की त्यांनी या किल्ल्यांना भेट द्यावी, त्यांच्या इतिहासाची माहिती घ्यावी आणि आपल्या सांस्कृतिक वारशाचा अभिमान बाळगावा. हे किल्ले केवळ भारताच्या गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार नाहीत, तर स्वाभिमान आणि संस्कृतीच्या कथा सांगणारे आहेत. मोदी म्हणाले, हे किल्ले आपली परंपरा आणि ओळख आहेत – ज्यांच्या भिंती आजही धैर्य आणि अभिमानाची साक्ष देतात.







