बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स (WCPL) 2025 मध्ये, इंडिया चॅम्पियन्स संघाने पाकिस्तानविरुद्ध सेमीफायनल सामन्यात खेळण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.
हा निर्णय भारत सरकारच्या भूमिकेशी सुसंगत आहे, ज्याने दहशतवादामुळे शेजारी देश पाकिस्तानसोबत कोणतेही द्विपक्षीय क्रीडा संबंध नाकारले आहेत.
अलीकडील पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारतीय सैन्याने चालवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ लक्षात घेता भारतीय संघाने ही कठोर भूमिका घेतल्याचे सांगितले जाते. संघात शिखर धवन, इरफान पठाण, हरभजन सिंग, युवराज सिंग आणि सुरेश रैना सारखे अनुभवी खेळाडू आहेत.
यापूर्वी देखील भारताने स्पर्धेच्या गट टप्प्यात पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला होता. त्यावेळीही अनेक माजी भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरण्यास तयार नव्हते.
या स्पर्धेच्या प्रमुख प्रायोजकांपैकी एक असलेली ट्रॅव्हल-टेक कंपनी EasyMyTrip ने देखील या मुद्द्यावर भारताचे समर्थन केले आहे. कंपनीचे सह-संस्थापक निशांत पिट्टी यांनी सोशल मीडियावर लिहिले की, “दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालू शकत नाहीत. भारतीय संघाने ज्या पद्धतीने कामगिरी केली आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे, परंतु पाकिस्तानविरुद्धचा उपांत्य सामना हा केवळ एक सामना नाही. EasyMyTrip या सामन्यापासून स्वतःला वेगळे करते – आधी देश, नंतर व्यवसाय.”
मंगळवारी भारतीय चॅम्पियन्स संघाने वेस्ट इंडिज चॅम्पियन्स संघाला फक्त १३.२ षटकांत पराभूत करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याच्या निर्णयामुळे स्पर्धेच्या भवितव्यावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.







