मेंदूवर नियंत्रण गमावलेला माणूस जसा आज एक आणि उद्या एक अशी विधाने करतो, तशी परिस्थिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची झालेली आहे. भारत हा महत्वपूर्ण देश आहे, अमेरिका आणि भारताचा व्यापार करार टप्प्यात आहे, असे विधान काही दिवसांपूर्वी करणाऱ्या ट्रम्प यांनी भारताचे अर्थकारण मृतवत झालेले आहे, असे अकलेचे तारे तोडलेले आहेत. भारतावर २५ टक्के आयात शुल्क आणि दंडाची घोषणा त्यांनी केली आहे. पाकिस्तानसोबत मात्र त्यांनी व्यापार करार झाल्याचे जाहीर केलेले आहे, ज्याचा तपशील उपलब्ध नाही. तेल उत्पादनाच्या क्षेत्रात पाकिस्तानसोबत भागीदारीचे सुतोवाच त्यांनी केले आहे. उद्या पाकिस्तान भारताला तेल निर्यात करू शकतो असे आचरट विधानही केले आहे. ट्रम्प यांच्या या बडबडीला थेट पाकिस्तानमधून सणसणीत चपराक मिळालेली आहे.
गेल्या काही दिवसातील घडामोडींवरून एक बाब स्पष्ट होती, की ट्रम्प यांना भारताश व्यापार करार करण्यापेक्षा, भारताचा रशियासोबत असलेला व्यापार बंद करण्यामध्ये जास्त रस होता. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल विकत घेत होता, शस्त्र विकत घेत होता. भारताने हे करू नये म्हणून अमेरिका, युरोपियन युनियन भारताला धमकावण्याचे काम करीत होते. भारताची भूमिका स्पष्ट होती. आमच्या देशाच्या ऊर्जा गरजा आहेत. आमच्या देशासाठी जे योग्य असेल ते आम्ही करू. व्यापार कराराद्वारे भारताच्या कृषी, डेअरी आणि लघु उद्योग क्षेत्रात शिरकाव करायचा, भारतीयांच्या गळ्यात मांसाहारी दूध आणि जेनेटीक बियाणी मारायची ही त्यांची भूमिका होती. ती भारताने साफ फेटाळली. देशहिताचा करार असेल तरच करणार अशी ठाम भूमिका भारताने घेतली. आम्ही ९ जुलैच्या डेडलाईनची चिंता करत नाही, असे आपले वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी ठणकावून सांगितले. ही डेडलाईन उलटून गेल्यानंतरही अमेरिकेने भारतावर टेरीफ लादले नाही, त्यामुळे काही तर सकारात्मक होईल अशी अपेक्षा होती. परंतु तसे झाले नाही.
अमेरिकेने भारतावर लादलेले टेरीफ ही ताठ कण्याची किंमत आहे. भारताने त्याची तयारी दाखवली आहे. भारताने युक्रेन-रशिया युद्ध सुरू झाल्यापासून दीड लाख कोटी रुपये किमतीचे तेल रशियाकडून विकत घेतले. यावर प्रति बॅरल कधी १८ ते २० डॉलर तर कधी फक्त ३ डॉलरपर्यंत सूट मिळवली. कल्पना करा भारताचे किती पैसे वाचले असतील.
ट्रुथ सोशलवर ट्रम्प यांनी ज्या पोस्ट केल्या आहेत, त्यातून त्यांची हताशा समोर आलेली आहे. भारत आणि रशिया यांचे अर्थकारण मृतवत झालेले आहे. आम्ही भारताशी फार व्यापार करतच नव्हतो, भारत हा टेरीफ किंग आहे, असे मत यावर त्यांनी व्यक्त केलेले आहे. कोल्ह्याला द्राक्षे आंबट असा त्याचा अर्थ आहे.
हे ही वाचा:
अमरनाथ यात्रा: भाविकांची संख्या ४ लाखांवर
भारतीय नौदल प्रमुखांनी घेतली जपानच्या संरक्षण मंत्र्याची भेट
भगवा आतंकवादाचे खोटे कथानक यासाठी घडवले
‘दहशतवाद कधी भगवा नव्हता, ना आहे आणि कधी नसेल!’
ट्रम्प यांनी टेरीफ लावण्याची घोषणा केल्यानंतर विरोधी पक्षांनी संसदेत गोंधळ घातला. खरे तर त्यांनी खूष व्हायला हवे होते. कारण काँग्रेस नेते राहुल गांधी छातीठोकपणे सांगत होते, की पियूष गोयल कितीही ठामपणे सांगत असले तरी हे ट्रम्प यांच्यासमोर निश्चितपणे शरणागती पत्करणार. परंतु हे घडले नाही, राहुल गांधी नेहमीप्रमाणे खोटे ठरले. काँग्रेसची ही खासियत आहे. काहीही झाले तरी ते विरोध करणार आणि मोदी कसे चूक होते ते सांगणार. आता भारत झुकला नाही, म्हणून ट्रम्प यांनी टेरीफ लावले. भारताने आपल्या शेतकऱ्यांचे, भारतीय लघु उद्योगाचे हित जपले म्हणून त्यांनी मोदी सरकारचे कौतूक केले पाहिजे, परंतु ते टेरीफच्या मुद्द्यावर टीका करतायत.
ट्रम्प यांनी सगळ्यात मोठा विनोद केलाय तो म्हणजे पाकिस्तानसोबत व्यापार कराराची घोषणा केलेली आहे. तेल उत्पादनाच्या क्षेत्रात भागीदारी कऱण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे. म्हणजे उत्तम ऑफर देणाऱ्या एका सुपर मार्केट किंवा मॉलकडे पाहून नाक मुरडायचे आणि बंद झालेल्या दारुड्या टपरीवाल्याला मिठ्या मारायला जायचे. सगळे जग ट्रम्प यांच्याकडे पाहून हसते आहे. ट्रम्प यांच्यासोबत आजवर ज्या ज्या देशांनी करार केले ते सगळे आतबट्याचे आहेत. जपान, व्हीएतनाम, इंडोनेशिया, युरोपियन युनियन. सगळ्याचे स्वरुप साधारणपणे असे की हे देश कोणतेही आयातशुल्क आकारल्याशिवाय अमेरिकी मालाला प्रवेश देणार आणि अमेरिका मात्र यांच्या मालावर आय़ातशुल्क लावणार. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एम्युन्यूअल मेक्रॉन यांनी करार झाला त्या दिवसाचे वर्णन काळा दिवस या शब्दात केले.
याचा अर्थ प्रत्येक देशाने अमेरिकेच्या दंडेली समोर मान तुकवली भारताने तुकवली नाही. कारण मोदींना विरोधी पक्ष कोणती भूमिका घेणार याची अजिबात चिंता नव्हती. त्यांच्याकडे कोणतीही विश्वासार्हता उरलेली नाही, हे मोदींना ठाऊक होते. परंतु त्यांनी भारतीयांच्या हिताशी तडजोड केली नाही.
ट्रम्प यांना पाकिस्तानसोबत तेल भागीदारी करायची आहे. पाकिस्तानच्या एका चायना पाकिस्तान इकोनॉमिक कॉरीडोअऱवर ६० अब्ज डॉलर गुंतणाऱ्या चीनच्या त्या रकमेची माती कशी हे पाहिल्यानंतरही ट्रम्प ही स्वप्न पाहतायत. बलुचिस्तानचे नेत मीर यार बलोच यांनी स्पष्ट शब्दात ट्रम्प यांना बजावले आहे. बलोचिस्तान इज नॉट फॉर सेल. ट्रम्प यांची माहिती बरोबर आहे. तेलाचे साठे, नैसर्गिक वायू, तांबे, लिथिअम, रेअर अर्थ मिनरल सगळे आहे, परंतु ते बलोचिस्तानमध्ये आहे, जो एक स्वतंत्र देश आहे. पाकिस्तानच्या पंजाबमध्ये नाहीत.
हिंदीत यासाठी एक सुंदर म्हण आहे, सर मुंडवातेही ओले पडे. संस्कृतमध्ये प्रथम ग्रासे मक्षिका पात म्हणतात, ट्रम्प यांची अवस्था तशी झालेली आहे. बलोचिस्तानमध्ये आलात तर जे काही चीनसोबत झाले, तेच तुमच्यासोबत होणार, असा या मीर यार यांच्या विधानाचा अर्थ.
अमेरिकेची अर्थव्यवस्था गाळात आहे, म्हणून ट्रम्प यांनी सत्तेवर आल्या आल्या USAID म्हणजे युनायटेड स्टेट एड ही भानगडच बंद केली. कारण जगातील अनेक देशांना पूर्वी प्रमाणे डॉलरची खिरापत वाटण्या इतकी अमेरिकेची आर्थिक स्थिती राहिलेली नाही. ट्रुथ सोशल वरील पोस्टमध्ये ट्रम्प यांनी पाकिस्तानसोबत तेल भागादारीची चर्चा केली आहे, त्यातच ते म्हणतायत रशियन नेते मदव्हेदेव हे स्वत:ला अजूनही रशियाचे अध्यक्ष समजतायत. ते एका खतरनाक विषयात शिरतायत. हा खतरनाक विषय म्हणजे, त्यांनी अमेरिकेला दिलेला युद्धाचा इशारा. रशियावर लादण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या डेडलाईन जगाला अशा यद्धाच्या दिशेने नेतायत, ज्यात ट्रम्प यांच्या देशाचाही समावेश आहे. म्हणजे रशियाला फार चेपण्याचा प्रय़त्न केलात, तर युद्ध फक्त युक्रेनपुरते मर्यादित राहणार नाही, असे मेदव्हेदेव म्हणतायत.
या सगळ्या घडामोडींचा निचोड एकच आहे. जगातील एकही शक्तीशाली देश ट्रम्प यांना जुमानत नाही. चीन, रशिया सोडा अगदी इराण नाही आणि कधी काळी अमेरिकेशी जवळीक असलेला युरोपातील महत्वाचा देश फ्रान्सही नाही. पॅलेस्टाईनला मान्यता देऊन फ्रान्सने अमेरिकी पराराष्ट्र धोरणाशी फारकत घेतली आहे. ब्रिटन त्या मार्गावर आहे. कॅनडानेही तेच केले आहे. ट्रम्प यांनी कॅनडाच्या या पावलानंतर आता त्यांच्यासोबत ट्रेड डील नाही, अशी घोषणाही केली आहे. परंतु युरोपात कुठे वेगळी परिस्थिती आहे.
भारताचा विषय लक्षात घ्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मुद्द्यांवर अडून बसले आहेत, त्याचे कारण स्पष्ट आहे. भारत ही स्वत:च एक मोठी बाजारपेठ आहे. भारताच्या जीडीपीमध्ये निर्यातीचा वाटा २१ टक्के आहे. त्यात अमेरिकेला केली जाणारी निर्यात ७७.७ अब्ज डॉलर आहे. भारत अमेरिकेकडून ४२.६ अब्ज डॉलरची आयात करतो. अमेरिकेला येणार तूट साधारण ३७ अब्ज डॉलरची आहे. ही तूट भरून देण्याची भारताची तयारी आहे. परंतु त्यांच्या वाटेल त्या अटी भारत स्वीकारणार नाही. अमेरिकेने टेरीफची घोषणा केल्यानंतरही भारताने याची अत्यंत संयमी प्रतिक्रिया दिलेली आहे. आम्ही अमेरिकी अध्यक्षांनी केलेल्या टेरीफच्या घोषणेचा अभ्यास करीत आहोत. राष्ट्रहित जपण्यासाठी आम्ही आवश्यक पावले उचलू.
भारताच्या या प्रतिक्रियेचा अर्थ केवळ एवढाच आहे, जो होगा वो देखा जायेगा, हम न झुकेंगे ना रुकेंगे. भारताने या क्षणी तरी अमेरिकेला बाजूला ठेवून आपल्या विश्वासू मित्राची अर्थात रशियाची बाजू घेतली आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)







