शनिवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बिहारच्या कटिहार येथे झालेल्या कार्यक्रमात भारताच्या संविधानाबाबत, महात्मा गांधी व नथुराम गोडसे यांच्याबाबत केलेले दावे पूर्णपणे चुकीचे व तथ्यहीन असल्याचे समोर आले आहे.
राहुल गांधी यांनी बिहारमधील सभेत आपल्या हातातील लाल रंगाच्या संविधानाची प्रत दाखवत सांगितले की, “गोडसेने गांधीजींची हत्या केली कारण त्याला संविधानाबद्दल द्वेष होता. गांधीजींनी संविधानासाठी आपले संपूर्ण आयुष्य दिले. हे संविधान आरएसएस आणि भाजपने आणलेले नाही.
मात्र या सर्व विधानांचा इतिहासाशी काहीही संबंध आहे का, याबद्दल आता बोलले जाऊ लागले आहे.
गोडसेने गांधीजींची हत्या संविधानामुळे केली होती का, याविषयी जेव्हा इतिहासाची पाने उलटण्याचा प्रयत्न झाला तेव्हा काही गोष्टी स्पष्ट झाल्या. महात्मा गांधींची हत्या ३० जानेवारी १९४८ रोजी झाली. नथुराम गोडसेला १५ नोव्हेंबर १९४९ रोजी फाशी देण्यात आली. भारताचे संविधान मात्र २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारले गेले आणि २६ जानेवारी १९५० पासून लागू झाले. म्हणजेच गांधीजींच्या हत्येच्या वेळी संविधान अस्तित्वातच नव्हते.
हे ही वाचा:
राज ठाकरे केवळ कार्यकर्त्यांना दिलासा देतायेत
काँग्रेसला बिहारमध्ये पराभव होण्याची भीती
गांधी काहीही बोलले, देशाने सहन केले असे होणार नाही
संविधानाची प्रारंभिक मसुदा प्रत देखील गांधीजींच्या मृत्यूनंतर तयार झाली. संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. समितीची नियुक्ती ऑगस्ट १९४७ मध्ये झाली. पहिला मसुदा २१ फेब्रुवारी १९४८ रोजी (गांधीजींच्या मृत्यूनंतर) सभेसमोर मांडला गेला. त्यामुळे भाजप आणि आरएसएसबाबतचा दावा दिशाभूल करणारा आहे. भाजप अस्तित्वातच नव्हता, तो नंतर स्थापन झाला. आरएसएस ही एक सामाजिक संघटना असून, संविधानाच्या मसुदा प्रक्रियेत त्याचा कोणताही औपचारिक सहभाग नव्हता.
प्रत्यक्षात हिंदू महासभा घटनेच्या सभेत होती. नथुराम गोडसे ज्या अखिल भारतीय हिंदू महासभेचा सदस्य होता, त्या संघटनेचे काही प्रतिनिधी संविधान सभेत चर्चेत सहभागी होते. स्वातंत्र्य जाहीर झाल्यानंतर गांधीजींना संक्रमण प्रक्रियेपासून जवळपास बाजूला ठेवले गेले. ते ना अंतरिम सरकारमध्ये होते, ना संविधान सभेत. गांधीजींनी ग्रामस्वराज्य आधारित राज्यव्यवस्थेचा प्रस्ताव ठेवला होता, पण तो स्वीकारला गेला नाही.







