ठेकेदारीच्या पैशांवरून झालेल्या वादातून तीन मित्रांनी हातगाडी चालकाचे अपहरण करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. साकिनाका पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावत तिन्ही आरोपींना अटक केली आहे. मृताचे नाव एहशानअली अन्सारी (४७) असे असून तो साकिनाका येथील खैराणी रोडवरील अल्विन डिसोझा कंपाऊंडमध्ये भावासोबत राहत होता. एहशानअली ठेकेदारीवर हातगाडी चालवण्याचे काम करत होता.
७ सप्टेंबर रोजी तो अचानक बेपत्ता झाल्याने भावाने साकिनाका पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली होती. दुसऱ्या दिवशी घाटकोपर पूर्व छेडानगर परिसरात टिळकनगर पोलिसांच्या हद्दीत त्याचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे साकिनाका पोलिसांनी अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
तपासात समोर आले की, ७ सप्टेंबर रोजी खैराणी रोडवरील मदिना हॉटेलजवळ एहशानअली याचा निसारअली, वाजीदअली आणि हकीकतअली या तिघांशी ठेकेदारीच्या पैशांवरून वाद झाला होता. पोलिसांनी या तिघांचा शोध घेऊन त्यांना शुक्रवारी ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
ठेकेदारीचे पैसे न दिल्याचा राग मनात धरून तिघांनी एहशानअलीचे अपहरण केले, त्याची हत्या करून मृतदेह छेडानगर परिसरात टाकून पसार झाल्याचे चौकशीत उघड झाले. साकिनाका पोलिसांनी निसारअली, वाजीदअली आणि हकीकतअली या तिघांना अपहरण व खुनाच्या गुन्ह्यात अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.







