राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील बंजारी गावात शुक्रवारी रात्री भीतीदायक प्रसंग घडला, जेव्हा सुमारे ८ फूट लांब आणि ८० किलो वजनाची एक मगर अचानक एका घरात शिरली. बचाव अधिकाऱ्यांना वारंवार कॉल करूनही कुणीही वेळेवर पोहोचू शकले नाही, त्यामुळे एका स्थानिक व्यक्तीने मगर खांद्यावर घेऊन सुरक्षित स्थळी नेल्याचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गावातील रहिवासी लातुरलाल यांनी सांगितले की, “रात्री १० वाजण्याच्या सुमारास आम्ही घरात बसलो होतो. अचानक समोरच्या दरवाजातून मगर आत आली आणि थेट मागच्या खोलीत गेली. आम्ही घाबरून घराबाहेर पळालो.” घटनेनंतर कुटुंबीयांनी स्थानिक प्रशासन व बचाव पथकाला संपर्क केला, पण त्यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी इटावा येथील वन्यजीव कार्यकर्ता हयात खान टायगर यांच्याशी संपर्क साधला, जे यापूर्वी अनेकदा प्राणी बचाव मोहिम राबवत आले आहेत.
हयात खान आणि त्यांच्या टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सुरुवातीला मगरीच्या तोंडाला टेप लावली, नंतर पाय दोरीने बांधले, आणि मगर सुरक्षितपणे घराबाहेर काढली. संपूर्ण बचाव मोहिम सुमारे एक तास चालली आणि रात्री ११ वाजता संपली. व्हिडिओमध्ये हयात खान मगरीला खांद्यावर वाहून नेताना दिसतात, तर गावकरी टाळ्यांच्या गजरात जल्लोष करताना दिसतात.
हे ही वाचा :
धन धना धन धन…मंधाना! रचला इतिहास
‘महिला प्रजनन तंत्र’कडे दुर्लक्ष केल्यास होऊ शकतात गंभीर परिणाम
खसखस: शारीरिक आणि मानसिक थकवा दूर करणारे औषध
नेपाळच्या तुरुंगातून पळालेली पाकिस्तानची महिला त्रिपुरात
चंबळ नदीत सोडण्यात आली मगर
शनिवारी सकाळी मगरीला गेटा परिसरातील चंबळ नदीत सुरक्षित सोडण्यात आले. हयात खान यांनी सांगितले की, “ही गेल्या वर्षभरात बंजारी गावातून वाचवलेली तिसरी मगर आहे.”
गावकऱ्यांच्या मते, गावाजवळील तलाव मगरींचे स्थायिक ठिकाण झाले असून, त्यामुळे पाणी वापरणेही धोकादायक झाले आहे. “गेल्या वर्षभरात पाण्याजवळ जायला सुद्धा भीती वाटते. आम्हाला योग्य कुंपण किंवा मगरींचे स्थलांतर हवे आहे,” अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी स्थायी उपाययोजनांची मागणी करत, या प्रकारांच्या पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपाय करण्याचे आवाहन केले आहे.







