अमेरिकन गायिका मेरी मिलबेन यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थन करत काँग्रेस नेते राहुल गांधींवर खरपूस टीका केली. राहुल गांधी यांनी असा आरोप केला होता की, पंतप्रधान मोदी “ट्रम्प यांना घाबरले आहेत.” भारत रशियन तेल खरेदी करणे थांबवेल, अशी हमी आपल्याला दिल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केला होता, त्याला अनुसरून मिलबेन यांनी हे वक्तव्य केले. राहुल गांधींवर त्यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली.
मोदींना नेहमीच पाठिंबा देणाऱ्या मेरी मिलबेन यांनी ‘X’ वर थेट राहुल गांधींना उद्देशून म्हटले, “राहुल गांधी, तुम्ही चुकीचे आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी अध्यक्ष ट्रम्प यांना घाबरत नाहीत. मोदींना दीर्घकालीन रणनीती कशी राबवायची हे माहित आहे आणि अमेरिकेसोबतचे त्यांचे राजनैतिक संबंध अत्यंत धोरणात्मक आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष नेहमी अमेरिकेच्या हिताला प्राधान्य देतील, तसेच मोदी भारताच्या हितासाठी सर्वोत्तम तेच करतील आणि मी त्यांचे कौतुक करते. हाच खरा राष्ट्रनेत्याचा दृष्टिकोन आहे.”
त्या राहुल गांधींना उद्देशून पुढे म्हणाल्या, “मला तुमच्याकडून अशा प्रकारच्या नेतृत्वाची अपेक्षा नाही, कारण तुमच्याकडे मुळात भारताचे पंतप्रधान होण्यासाठी लागणारी गुणवत्ता नाही. म्हणूनच तुम्ही तुमच्या मी भारताचा द्वेष करतो या मोहिमेकडे वळा आणि त्या मोहिमेत तुम्हीच तुमचे श्रोते असाल.
राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये असा आरोप केला होता की, पंतप्रधान मोदी वारंवार अमेरिकेला भारताच्या धोरणांवर नियंत्रण ठेवू देतात. त्यांनी मोदींवर रशियन तेल खरेदी थांबवण्यास मान्यता देणे, गाझा कराराबद्दल ट्रम्प यांना अभिनंदन संदेश पाठवणे, अमेरिकेच्या वित्त मंत्र्यांचा दौरा रद्द करणे आणि ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानशी शस्त्रसंधीबाबत ट्रम्प यांनी घेतलेल्या श्रेयावर मौन बाळगणे अशा अनेक गोष्टींवर टीका केली.
ट्रम्प यांचा दावा
डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधी आठवड्याच्या सुरुवातीला व्हाईट हाऊसमधील पत्रकार परिषदेत दावा केला होता की पंतप्रधान मोदींनी त्यांच्याशी दूरध्वनीवर बोलताना भारत रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवेल, अशी हमी दिली.
ट्रम्प म्हणाले, “ते लगेच थांबवू शकत नाहीत, थोडी प्रक्रिया आहे, पण ती लवकर पूर्ण होईल.” ट्रम्प यांनी सांगितले की, भारताच्या रशियन तेल आयातीबाबत आपल्याला चिंता वाटते. कारण त्यातून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या युद्ध प्रयत्नांना निधी मिळतो, असे अमेरिकेचे मत आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत आहे, याबद्दल मी समाधानी नव्हतो,” असे ट्रम्प म्हणाले.
हे ही वाचा:
बरेली हिंसाचार: मौलाना तौकीर रजांचे सचिव अफजल बेग कोर्टात शरणागत!
गॅविन लार्सन न्यूजीलंड क्रिकेटे निवड व्यवस्थापक
पाक संरक्षण मंत्री म्हणतात, दोन आघाड्यांवर युद्धासाठी तयार!
२० वर्षांपासून मुंबईत राहत होता घुसखोर बांगलादेशी, असा सापडला!
भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रत्युत्तर
भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ट्रम्प यांचा दावा ठामपणे फेटाळला. मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल म्हणाले, “भारत हा तेल आणि वायूचा मोठा आयातदार आहे. अस्थिर ऊर्जा बाजारात भारतीय ग्राहकांचे हित सुरक्षित ठेवणे ही आमची सातत्यपूर्ण प्राथमिकता राहिली आहे. आमचे आयात धोरण याच उद्दिष्टाने चालवले जाते. स्थिर ऊर्जा दर आणि सुरक्षित पुरवठा हे आमच्या ऊर्जा धोरणाचे दोन मुख्य स्तंभ आहेत.”
ते पुढे म्हणाले की, भारताने अनेक वर्षांपासून अमेरिकेसोबत ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याचा प्रयत्न केला आहे आणि सध्याच्या अमेरिकी प्रशासनासोबत या विषयावर चर्चाही सुरू आहे. त्यांनी स्पष्ट केले की, ट्रम्प यांनी ज्या दिवशी फोन केल्याचा उल्लेख केला त्या दिवशी मोदी आणि ट्रम्प यांच्यात कोणतीही दूरध्वनीवर चर्चा झाली नाही.
रशियाचे समर्थन
दरम्यान, रशियाने पंतप्रधान मोदी आणि भारतीय सरकारला ठाम पाठिंबा दिला. भारतातील रशियाचे राजदूत डेनिस अलीपोव्ह म्हणाले, “भारत आणि रशियामधील ऊर्जा सहकार्य हे भारताच्या राष्ट्रीय हिताशी पूर्णपणे सुसंगत आहे.”
भारत रशियाकडून तेल आयात सुरू ठेवेल का, या प्रश्नावर त्यांनी म्हटले, “हा प्रश्न भारतीय सरकारकडेच विचारावा. भारतीय सरकार आपल्या राष्ट्रीय हिताचा विचार करूनच निर्णय घेते आणि आमचे ऊर्जा सहकार्य त्या हिताशी पूर्णपणे अनुरूप आहे.”







