दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी डॉ. शाहीन हिच्या घरी सोमवार, १ डिसेंबर रोजी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) छापेमारी केली. लखनऊच्या खंडारी बाजार परिसरात तिच्या घरात अचानक एनआयएचे पथक पोहचल्याने खळबळ उडाली. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी डॉ. शाहीन हिच्या निवासस्थानी सुमारे सहा तास शोध घेत छापेमारी केली. तसेच यावेळी घरात उपस्थित असलेले शाहीनचे वडील आणि भाऊ शोएब यांचीही चौकशी करण्यात आली. काही कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या महिन्यात दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या कार बॉम्बस्फोटात डॉ. शाहीन ही मुख्य आरोपींपैकी एक असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणात अनेकांना अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान नाव समोर आल्यानंतर एटीएसने शाहीनचा भाऊ परवेझ यालाही लखनऊ येथून अटक केली. परवेझ हा वेगळ्या घरात राहत होता. त्याच्या घरातून कागदपत्रे, लॅपटॉप, मोबाईल फोन आणि इतर संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले आहे.
एनआयएच्या कारवाई दरम्यान शाहीन होच्या घराच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. खंडारी बाजारातील अनेक रस्त्यांवर सार्वजनिक हालचालींवरही बंदी घालण्यात आली होती. पथकात फॉरेन्सिक तज्ञांचा समावेश होता. आठ सदस्यांची एनआयए टीम शाहीनच्या घरी पोहोचली. आणखी दोन टीम लखनऊमध्ये पोहोचल्या. एका टीमने शाहीनचा भाऊ परवेझच्या घरी छापा टाकला तर दुसऱ्या टीमने शाहीनच्या जवळच्या सहकाऱ्याच्या घरी छापा टाकला.
हे ही वाचा:
जीडीपी वाढीचा परिणाम शेअर बाजारावर; सेन्सेक्स, निफ्टीने गाठला नवा उच्चांक
“२००९ च्या उठावात भारताचा हात होता” बांगलादेशचा गंभीर आरोप
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात १३ विधेयके ठरणार महत्त्वाची
शाहीनच्या अटकेनंतर चौकशीत धक्कादायक खुलासे झाले आहेत. शाहीनने महिला जिहादींचा एक गट बनवला होता आणि व्हिडिओ कॉलद्वारे अल्लाहच्या नावाखाली त्यांना प्रशिक्षण दिले, असे उघड झाले आहे. त्यांचे ब्रेनवॉश करण्यात आले होते.







