आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला जोरदार दणका बसला असून माजी नगरसेवक दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तथा माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे. तसेच त्यांनी भाजपामध्ये पक्ष प्रवेश केला आहे. दादरच्या वसंत स्मृतीमध्ये तेजस्वी घोसाळकर यांचा भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश झाला.
तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटले आहे की, आपण अत्यंत सामान्य कुटुंबातील मुलगी असून घोसाळकरांसारख्या राजकीय आणि सामाजिक कुटुंबात सून म्हणून आलो. समाजकारण, राजकारण हे कधीही त्यांच्यासाठी महत्त्वाकांक्षेचे साधन नव्हते. पती आणि सासरे यांना साथ देण्यासाठी हा प्रवास सुरू केल्याचे त्या म्हणाल्या. अशातच अभिषेक यांची निघृण हत्या झाली तरीही जबाबदारी स्वीकारली, असं त्या म्हणाल्या. राजकारण करताना, जनतेसाठी काम करताना, आणि कुटुंबाची जबाबदारी पार पाडताना अडचणींचा सामना करावा लागत असून अशा वेळी पदाची नव्हे, तर निर्भीडपणे साथ देणाऱ्या ताकदीची गरज असल्याचे तेजस्वी म्हणाल्या.
पुढे त्यांनी लिहिले आहे की, “मागील काही वर्षांच्या अनुभवांवरून, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, प्रभाग क्रमांक १ असो वा इतर भाग तसेच माझ्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी, मला एका वेगळ्या निर्णयाकडे पाहावे लागत आहे. तरीही एक गोष्ट मी ठामपणे सांगते, माझ्या आयुष्यातील अंधाऱ्या काळात आपण दिलेली साथ मी कधीही विसरू शकत नाही. मी कायम तुमच्या ऋणात राहीन. जिथे जिथे, जेव्हा-जेव्हा संधी मिळेल, तेव्हा तेव्हा त्या प्रेमाची आणि विश्वासाची परतफेड करत राहीन,” असं तेजस्वी घोसाळकरांनी सांगितले.
हे ही वाचा:
‘धुरंधर’ने ओलांडला ५०० कोटींचा टप्पा!
पक्ष नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या माजी आमदाराची काँग्रेसमधून हकालपट्टी
पंतप्रधान मोदींचा इथिओपिया दौरा; काय असणार चर्चेचा अजेंडा?
इस्रायली सैन्याकडून दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या वरिष्ठ दहशतवाद्याचा खात्मा
तेजस्वी घोसाळकर यांनी पक्ष प्रवेशाआधी सोशल मीडियावर भावूक पोस्ट करत निर्णयाची माहिती दिली. तसेच मुलांच्या भविष्याच्या सुरक्षेसाठी वेगळा निर्णय घ्यावा लागतोय, असं मत व्यक्त केलं. तेजस्वी घोसाळकर या ठाकरे गटाच्या नगरसेविका होत्या. २०१७ मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिच्या निवडणुकीत ठाकरे गटाकडून प्रभाग क्रमांक १ मधून तेजस्वी घोसाळकर विजयी झाल्या होत्या. तेजस्वी घोसाळकर या माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तर माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई आहेत. अभिषेक घोसाळकर यांची फेब्रुवारी २०२४ मध्ये निर्घृण हत्या करण्यात आली.







