‘दोन महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरपटत येतील, सॉरी म्हणतील, परंतु त्यांना माफ करायचे की नाही, हे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरवतील.’ अमेरिकेचे कॉमर्स सेक्रेटरी हावर्ड ल्युटनिक यांनी काही महिन्यांपूर्वी केलेले भाकीत म्हणजे मनातले मांडे ठरले आहे. नाकमुठीत घेऊन डोनाल्ड ट्रम्प यांनाच मोदींना फोन करावा लागला. रशियाशी तेल खेरदी करत असल्यामुळे लादलेले २५ टेरीफ रद्द आणि उरलेल्या २५ टक्के टेरीफ ऐवजी आता फक्त १८ टक्के टेरीफ द्यावे लागेल, असे जाहीर करावे लागले. ट्रम्प यांनी केलेला फोन नरेंद्र मोदी यांनी घ्यावा म्हणून भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्गिओ गोर यांना ‘ट्रम्प यांनी मोदींना फोन केलेला आहे, आता महत्वाच्या घोषणेसाठी सज्ज रहा’, अशी पोस्ट एक्सवर टाकावी लागली. एका मोठ्या भीतीच्या दडपणाखाली ट्रम्प यांचा हा फोन कॉल झाला असण्याची शक्यता आहे. मोदींना ट्रम्प सॉरी म्हणाले असतील याची शक्यताही नाकारता येत नाही.
अमेरिकेतील एका नामांकीत अर्थतज्ज्ञाने जाहीरपणे ट्रम्प प्रशासनाचे कान टोचले आहेत. पीटर श्चिफ असे त्यांचे नाव. ते म्हणतात, ‘आपण जगावर अवलंबून आहोत. आपण निर्माण करत नसलेल्या वस्तू जग आपल्याला देते. त्या मोबदल्यात ते जे पैसे देतात ते आपण साठवत नाही. जगाते अर्थकारण आपल्यामुळे चालत नाही. आपले अर्थकारण जगामुळे चालते. डॉलर लवकरच कोसळणार आहे, त्याची जागा सोने घेणार आहे. यापुढे जे आर्थिक संकट येईल त्यासमोर २००८ ची मंदी म्हणजे पोरखेळ वाटेल (पीटर श्चिफ यांनी स्कूल पिकनिक हा शब्द वापराला आहे)’, श्चिफ हे कोणी टॉम डीक किंवा हॅरी नाहीत. ते युरो-पॅसिफीक कॅपिटलचे संस्थापक आहेत. रिअल इस्टेट क्षेत्र बुडीत जाऊन अमेरिकेवर अर्थसंकट येणार अशी भविष्यवाणी करणाऱ्या मोजक्या तज्ज्ञांमध्ये ते आहेत. ज्याला सबप्राईम क्रायसिस म्हणून ओळखले जाते. मोठे आर्थिक संकट येईल, बॅंकीग क्षेत्र कोसळेल असा इशारा त्यांनी दिला होता. तेच पीटर श्चिफ पुन्हा एकदा मंदीचा इशारा देत आहेत. ते एकमेव नाहीत. अशांची जंत्री आहे. ही मंडळी सतत ट्रम्प यांचे कान टोचतायत. इतके की ही टोचणी प्रत्यक्षात झाली असती तर कदाचित ट्रम्प यांचे कान जाळीदार झाले असते. श्चिफ आणखी बरेच काही म्हणाले आहे, ते सांगण्यापूर्वी ट्रम्प काय म्हणाले आहेत, ते पाहाणे महत्वाचे.
ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल वर केलेल्या पोस्टमध्ये मोदींचे गुणगान केले आहे. टेरीफ १८ टक्क्यांवर आणल्याची घोषणा केली आहे. स्वत:चे नाक वाचवण्याचा प्रयत्नही केला आहे. ‘रशियाकडून तेल विकत घेणार नाही, असे भारताने मान्य केले आहे, यामुळे रशिया युक्रेन युद्ध थांबेल’, असा उल्लेख या पोस्टमध्ये आहे. म्हणजे मोदींनी माघार घेतली, असे सूचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. भारत युरोपातील मुक्त व्यापार करारामुळे अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट यांना जसा पोटशूळ झाला होता. तसाच पोटशूळ ट्रम्प यांच्या फोननंतर काँग्रेसच्या नेत्यांना झाला आहे. मोदींनी माघार घेतली, असा प्रचार त्यांनी सुरू केलेला आहे. जे माघार घेतात ते फोन करतात, एवढे सामान्य ज्ञान काँग्रेसवाल्यांना नाही. फोन ट्रम्प यांनी केला होता. मोदींनी सॉरी न म्हणता, टेरीफ मागे घेण्याची घोषणाही त्यांनीच केली.
ट्रम्प यांचे गेल्या काही महिन्यातले वागणे एखाद्या वाया गेलेल्या सैरभैर मुलासारखे होते. ज्याला दाबता येईल त्याला ते दाबत होते, व्हेनेझुएला सारख्या देशाला चिरडत होते, भारताबाबत हे शक्य नाही, भारताची गरजही आहे, अशा पेचात ते अडकले होते. अखेर टेरीफ मागे घेण्याची घोषणा करून त्यांनी आपली सुटका करून घेतली. भारत आणि युरोप दरम्यान झालेला व्यापार करार हा ट्रम्प यांना झटका होता.
ग्रीनलॅंड प्रकरणाचे हाडूक ट्रम्प यांच्या गळ्यात अडकले. बाहेर येत नाही, गिळताही येत नाही, अशी त्यांची परिस्थिती झाली होती. युरोपातील सगळे देश त्यांच्या विरोधात गेले होते. हे सगळे देश मोदींचे निरीक्षण करत होते. ट्रम्प यांच्या शेलक्या विधानांना उत्तर न देता मोदी कसे अनुल्लेखाने मारतायत, याची मजा हे देश पाहात होते.
हे ही वाचा:
२०२७ एशियन शूटिंगचे यजमानपद भारताकडे
भारतीय कायद्यांचे उल्लंघन सहन केले जाणार नाही!
ट्रम्प यांनी घेतले नमते, टॅरिफ आणला १८ टक्क्यांवर
प्रभा यादव, चिंतामणी हसबनीस यांना सोनल मानसिंग यांच्या हस्ते भरतमुनी सन्मान प्रदान
‘ट्रेड डील तयार होते. त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी मोदींनी ट्रम्प यांना फोन केला पाहिजे होता, परंतु मोदींनी फोन केला नाही, त्यामुळे ट्रेड डील झाले नाही’, अशी कबूली हावर्ड ल्युटनिक यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दिली. त्यानंतरही मोदींनी ट्रम्प यांना फोन केला नाही. ट्रम्प मोदींना फोन करतायत, परंतु मोदी फोन उचलत नाहीत. चार वेळा ट्रम्प यांनी फोन केला होता, परंतु मोदींनी तो रिसिव्ह केला नाही, अशी बातमी फ्रॅंकफर्ट ऑलजेमिने झैटंग या जर्मन वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती. हे सगळी गंमत जगातील देश पाहात होते.
त्याचे दृश्य परिणाम दिसत होते. शेजारी देश असलेला कॅनडाही भारताशी सलगी करू लागला होता. मार्क कार्नी मार्चमध्ये भारत भेटीवर येत आहेत. ब्राझीलचे पंतप्रधान लुल्ला दा सिल्व्हा, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅन्यूअल मॅक्रॉन, हे सगळे ट्रम्प यांच्यामुळे दुखावलेले नेते रांगेत भारतात येत आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादमीर पुतीन, युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सूला वॉन डेर लेन यांच्या भारत भेटीचा डंका सगळया जगात वाजला होता. ब्रिक्स गटांच्या आगामी बैठकीचे अध्यक्षपद भारताकडे आहे. त्यानिमित्ताने जगभरातील नेते भारतात येणार आहेत. ट्रम्प यांना दिसत होते की, जगातील सगळे नेते भारताशी जवळीक निर्माण करतायत आणि ट्रम्प यांच्या प्रशासनातील नेते दोन्ही देशांतील संबंधांचा चिखल बनवतायत.
अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट यांनी भारत युरोप दरम्यान झालेल्या मुक्त व्यापार करारावर आगपाखड केली. युरोपातील देशांवर विश्वासघाताचा ठपका ठेवला. तेव्हाच ही बाब स्पष्ट झाली होती की भारत ईय़ू व्यापार करारामुळे ट्रम्प अस्वस्थ झाले आहेत. त्यांच्याकडे दोनच पर्याय राहिले होते. एक तर आगपाखड करणे किंवा शरणागती पत्करणे. त्यांनी दुसरा पर्याय स्वीकारला.
व्हेनेझुएलाचे हे तेल घेण्याची तयारी भारताने दाखवली असल्याचे ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये जाहीर केले आहे. हे तेल भारत आधीही खरेदी करत होता. अमेरिकेने व्हेनेझुएलावर निर्बंध लादले. आता व्हेनेझुएलात सत्तांतर घडवल्यानंतर या तेलावर आता अमेरिकेचा कब्जा आहे. हे तेल आता अमेरिका भारताला विकणार आहे. स्वस्तात मिळत असेल तर ते विकत घेण्याची भारताची तयारी आहे. ट्रम्प ते न देण्याचे काहीच कारण नाही. कारण हा लुटीचा माल आहे.
व्हेनेझुएलाच्या तेलाची लुट करून अमेरिकी अर्थकारणाचा तिढा सुटणार नाही. परिस्थिती गंभीर आहे. दर साल अमेरिकी कर्जावर १.२ ट्रिलयन व्याज द्यावे लागते आहे. हा आकडा फुगत जाणार. अमेरिकेला हे न झेपणारे ओझे आहे. बुडीत जात असलेल्या अमेरिकी अर्थकारणाबाबत पीटर श्चिफ यांचे विधान अगदीच ताजे आहे. परंतु ही परिस्थिती एका दिवसात निर्माण होत नाही. या आर्थिक डबघाईच्या दिशेने अमेरिकेची वाटचाल बराच काळ सुरू आहे. सहा महिन्यापूर्वी जे.पी.मॉर्गन या वित्तसंस्थे मुख्य अर्थविश्लेषक मायकल फेरोली म्हणाले होते की, ‘मंदीची शक्यता ६० टक्क्यांवरून ५० टक्क्यांवर आलेली आहे.’ जे.पी.मॉर्गन चेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेमी डीमन म्हणाले होते की, ‘आम्ही मंदीची शक्यता पूर्णपणे फेटाळत नाही.’ अब्जाधीश अमेरिकी गुंतवणूदार स्टीव्ह कोहेन न्यूयॉर्कमध्ये झालेल्या एका इन्वेस्टमेंट कॉन्फन्समध्ये म्हणाले होते की, ‘मंदी आलेली नाही, परंतु अर्थकारणातील वाढ मात्र खुंटलेली आहे.’ वाढलेले कर्ज आणि त्यावर द्यावे लागणारे व्याज यामुळे आंतरराष्ट्रीय रेटींग एजन्सी मूडीजने अमेरिकेचे रेटींग कमी केले होते. अमेरिकेची २०२४ मध्ये असलेली ६.४ टक्के वित्तिय तूट २०३५ पर्यंत ९ टक्के पर्यंत वाढेल असे भाकीत मूडीजने केले होते.
सहा महिन्यांनंतर परीस्थिती सुधारलेली नाही. जानेवारी २०२६ मध्ये सगळ्यात मोठा दणका दिला कॉन्फरन्स बोर्ड या अमेरिकी थिंक टॅंकने. या संस्थेच्या अहवालात अमेरिकी ग्राहकाचा विश्वास गेल्या १२ वर्षातील किमान पातळीवर पोहोचलेला असून तो ८४.५ वर आलेला आहे, अशी माहिती उघड केली. फॉर्च्यून ५०० मधल्या बहुतेक कंपन्या या थिंक टॅंकच्या सदस्य आहेत. पीटर श्चिफ तेच सांगतायत. २००८ मध्ये आलेली मंदी आणि येऊ घातलेली मंदी यात एक मूलभूत फरक असेल. २००८ मध्ये मंदीचे सावट सगळ्या जगावर होते. येणारी मंदी फक्त अमेरिकेपुरती असले, जगाचा यात फायदाच होईल. येणाऱ्या आर्थिक संकटासमोर २००८ची मंदी पोरखेळ वाटेल. त्यांनी स्कूल पिकनिक हा शब्द वापरला आहे, त्यावरून येणाऱ्या संकटाची भीषणता लक्षात येऊ शकेल. हीच भीती छळत असल्यामुळे ट्रम्प भारतासमोर नमते घेत आहेत, मोदींना ते सॉरी म्हणाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)







