पश्चिम उपनगरीय लोकल ट्रेन मध्ये बसण्याच्या जागेवरून दोन जणांमध्ये झालेल्या भांडणात तिसऱ्या प्रवाशावर आपला डोळा गमविण्याची वेळ आली आहे. भांडण करणाऱ्या दोघांपैकी एकाने वांद्रे स्थानकावर उतरून दगड फेकून मारला, हा दगड तिसऱ्याच प्रवाशाच्या डोळ्याला लागल्याने गंभीर इजा झाली आहे. जखमी प्रवाशाला तात्काळ हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पळून गेलेल्या प्रवाशाला वांद्रे रेल्वे पोलिसांनी ३६ तासांत शोधून गुरुवारी रात्री त्याला अटक करण्यात आली आहे.या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२६(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निशांत रत्नकुमार खत्री (२८) असे जखमी प्रवाशाचे नाव आहे. दादरच्या सेनापती बापट मार्गावर राहणारे निशांत ३ फेब्रुवारी रोजी अंधेरी रेल्वे स्थानकातून चर्चगेट दिशेने जाणाऱ्या फास्ट लोकलने प्रवास करत होते. बांद्रा स्थानक फलाट क्रमांक ५ वर सुमारे रात्री ११ वाजण्याच्या सुमारास लोकल थांबताच, दोन अनोळखी इसमांमध्ये वाद सुरू झाला. यावेळी एका इसमाने रेल्वे ट्रॅकमधून दगड उचलून दुसऱ्या इसमाच्या दिशेने फेकण्यास सुरुवात केली. त्यातील एक दगड निशांत यांच्या डाव्या डोळ्याजवळ लागल्याने ते गंभीर जखमी झाले.
हे ही वाचा:
जीवलग मित्र गमावला, वाढदिवस साजरा करणार नाही!
सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त
तीन दिवस बलोचांच्या हाती होती सीपेकची मानगुट…
पाकिस्तान सीमेवर पुन्हा गरजणार भारतीय हवाईदल
घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी तत्काळ जखमीला उपचारासाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल केले. जखमीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला. या घटनेचा तपास करत असताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवली. आरोपी योगेश बंजराज बोध (३६, मजूर) याला ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी अटक करण्यात आली. तो मूळचा उत्तर प्रदेशातील असून सध्या मुंबईत वास्तव्यास होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बांद्रा रेल्वे पोलिसांच्या पथकाने केली.







