अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधील मोजावे वाळवंटातील एडवर्ड्स एअर फोर्स बेसवरून उड्डाण केल्यानंतर काही क्षणांतच अमेरिकन एअर फोर्सचे बी-52 स्ट्रॅटोफोर्ट्रेस हे बॉम्बर विमान कोसळले. या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. यामुळे खळबळ उडाली आहे. एअर फोर्स बेसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात सोमवारी सकाळी सुमारे ११.२० वाजता (स्थानिक वेळेनुसार) घडला. घटनेनंतर तातडीने आपत्कालीन पथके घटनास्थळी रवाना करण्यात आली असून बचाव व तपास कार्य सुरू आहे.
वृत्तानुसार, एअर फोर्स बेसने आणखी एका पोस्टमध्ये विमानतळ तात्पुरता बंद करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच येणारी सर्व विमाने अन्य विमानतळांकडे वळविण्यात आली आहेत. कर्नल जेम्स हेस यांनी माध्यमांना सांगितले की, “आज एडवर्ड्स एअर फोर्स बेसवर अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून आम्ही आठ उत्कृष्ट अमेरिकन नागरिक गमावले आहेत.” मृतांमध्ये लष्करी कर्मचारी, सरकारी नागरी अधिकारी आणि सरकारी कंत्राटदारांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
या दुर्घटनेनंतर सर्व गैर-व्यावसायिक अभ्यागतांसाठी जारी केलेले प्रवेश परवाने पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आले आहेत, जेणेकरून संपूर्ण यंत्रणा आपत्कालीन प्रतिसाद आणि बचाव कार्यावर लक्ष केंद्रित करू शकेल, असे बेस प्रशासनाने स्पष्ट केले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बी-52 स्ट्रॅटोफोर्ट्रेस विमानात एकूण आठ जण होते. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणांतच ते कोसळले आणि त्यात कोणीही बचावल्याची शक्यता नसल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
‘एक्स’वरील माहितीनुसार, हे विमान नियमित चाचणी मोहिमेवर होते. अपघातानंतर परिसरात काळ्या धुराचे मोठे लोट दिसून आले, जे अनेक मैलांवरूनही पाहता येत होते. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून त्याचा सखोल तपास सुरू आहे. तसेच दुर्घटनेतील सर्व व्यक्तींची ओळख पटविण्याचे कामही सुरू आहे.
हे ही वाचा:
नीट परीक्षेपूर्वी टेलिग्रामवर तात्पुरती बंदी
मान्सून सुस्तावला; आणखी आठवडाभर प्रतीक्षा
इराणने अण्वस्त्रांना दिला कायमचा नकार!
मे महिन्यात दुचाकी विक्री १९ लाखांच्या पार
बी-52 स्ट्रॅटोफोर्ट्रेस हे अमेरिकेचे दीर्घ पल्ल्याचे धोरणात्मक बॉम्बर विमान आहे. हे विमान सुमारे ५० हजार फूट उंचीपर्यंत उड्डाण करू शकते, तर सामान्य प्रवासी विमाने साधारणपणे ३५ हजार फूट उंचीवर उडतात. या विमानाची ७० हजार पाउंड पेलोड क्षमता असून त्यामध्ये शेकडो पारंपरिक बॉम्ब तसेच ३२ अण्वस्त्रक्षम क्रूझ क्षेपणास्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे.







