मध्यपूर्वेतील संघर्ष अधिक तीव्र होत असताना इराणने जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळांवर मोठा हल्ला केल्याचा दावा केला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या साहाय्याने अमेरिकेच्या लढाऊ विमानांवर आणि हवाई इंधन भरणाऱ्या टँकर विमानांवर हल्ले करून त्यांचे मोठे नुकसान केल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या दाव्याला अमेरिका किंवा जॉर्डनकडून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.
इराणच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेने गुरुवारी रात्री इराणमधील लष्करी ठिकाणांवर केलेल्या हवाई हल्ल्यांच्या प्रत्युत्तरादाखल ही कारवाई करण्यात आली. IRGCने सांगितले की, जॉर्डनमधील अमेरिकन तळांवर दोन टप्प्यांत क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांत अनेक अमेरिकन लढाऊ विमाने आणि इंधन भरणारी टँकर विमाने नष्ट झाली, तर इतर अनेक विमानांचे मोठे नुकसान झाले.
जॉर्डनमधील तळांव्यतिरिक्त ओमानमधील अमेरिकेच्या दोन महत्त्वाच्या रडार प्रणाली लक्ष्य केल्याचाही दावा इराणने केला आहे. या कारवाईमुळे अमेरिकेच्या हवाई देखरेख आणि लष्करी समन्वय क्षमतेवर परिणाम झाल्याचा दावा IRGCने केला आहे. या दाव्याचीही स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.
इराणचे दावे समोर आल्यानंतरही अमेरिका आणि जॉर्डनने अशा कोणत्याही नुकसानीची अधिकृत माहिती दिलेली नाही. यापूर्वीही संघर्षादरम्यान दोन्ही बाजूंनी परस्परांविरोधात मोठे दावे केले असले, तरी त्यातील अनेक दाव्यांची स्वतंत्र पुष्टी झालेली नव्हती. त्यामुळे जॉर्डनमधील अमेरिकन विमानांचे नुकसान झाल्याचा दावा अद्याप अपुष्ट मानला जात आहे.
हे ही वाचा:
एडनच्या आखातात रासायनिक टँकरवर सशस्त्र हल्ला; जहाजावर हल्लेखोरांचा ताबा
महेश ट्युटोरियल्सच्या ३३ शाखांना टाळे; विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
मुंबई लोकलमध्ये ‘सीट वॉर’चा कळस; महिला डब्यात पेपर स्प्रे फवारला
पाणबुड्यांचा ‘कर्दनकाळ’ भारताच्या ताफ्यात; MH-60R सीहॉक हेलिकॉप्टर दाखल
दरम्यान, अमेरिकन सेंट्रल कमांडने (CENTCOM) इराणमधील लष्करी क्षमता कमकुवत करण्यासाठी सलग सहाव्या रात्री हवाई हल्ले केल्याची माहिती दिली आहे. या कारवाईत क्षेपणास्त्र तळ, ड्रोन सुविधा, नौदलाशी संबंधित पायाभूत सुविधा तसेच इतर लष्करी ठिकाणे लक्ष्य करण्यात आली. इराणच्या दक्षिणेकडील काही भागांतील पूल, विमानतळ आणि बंदरांनाही या हल्ल्यांचा फटका बसल्याचे वृत्त आहे.







