29 C
Mumbai
Friday, September 11, 2026
घरक्राईमनामाएआय बनतोय हल्लेखोरांचे नवे हत्यार! सायबर हल्ले, हेरगिरी, शस्त्रविकासात गैरवापर

एआय बनतोय हल्लेखोरांचे नवे हत्यार! सायबर हल्ले, हेरगिरी, शस्त्रविकासात गैरवापर

अँथ्रोपिकचा धक्कादायक अहवाल

Google News Follow

Related

आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयचा वापर दिवसेंदिवस वाढत असताना त्याच्या गैरवापराचेही गंभीर चित्र समोर येत आहे. एआयचा वापर केवळ माहिती मिळवण्यासाठी, मजकूर तयार करण्यासाठी किंवा कोडिंगसाठी होत नसून आता सायबर हल्ले, हेरगिरी, सोशल मीडिया प्रभाव मोहिमा, लष्करी तंत्रज्ञान, जैविक संशोधन, फसवणूक आणि इतर एआय मॉडेलची गुप्तपणे नक्कल करण्यासाठीही केला जात असल्याचा दावा एआय कंपनी अँथ्रोपिकने केला आहे.

अँथ्रोपिकने सप्टेंबर २०२६मध्ये प्रसिद्ध केलेल्या थ्रेट इंटेलिजन्स रिपोर्टमध्ये क्लाउड (Claude) या कंपनीच्या एआय मॉडेलच्या गैरवापराशी संबंधित अनेक प्रकरणांचा आढावा घेतला आहे. हा अहवाल केवळ भविष्यात एआयमुळे काय धोके निर्माण होऊ शकतात, याचा अंदाज नाही. डिसेंबर २०२५ ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत क्लाउडच्या गैरवापराच्या ज्या मोहिमा कंपनीने शोधून थांबवल्या, त्यातील निवडक प्रकरणे या अहवालात मांडण्यात आली आहेत.

अँथ्रोपिकने या गैरवापराचे सात प्रमुख प्रकार मांडले आहेत. यामध्ये सायबर हल्ले, हेरगिरी, सोशल मीडिया प्रभाव मोहिमा, शस्त्रविकास, जैविक संशोधन, फसवणूक आणि एआय मॉडेलची परवानगीशिवाय नक्कल करण्याचा प्रयत्न यांचा समावेश आहे. ‘एआय आता केवळ मदतनीस नाही; हल्ल्याची अनेक कामे एकत्र करण्याचे साधन’ या अहवालातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा सायबर हल्ल्यांमधील एआयच्या बदलत्या भूमिकेशी संबंधित आहे. पूर्वी एखादा हॅकर एआयकडून कोड, तांत्रिक माहिती किंवा एखाद्या विशिष्ट समस्येचे समाधान घेऊ शकत होता. मात्र अँथ्रोपिकच्या मते, आता काही मोहिमांमध्ये एआयचा वापर हल्ल्याच्या अनेक टप्प्यांना एकत्र जोडण्यासाठी केला जात आहे. एखाद्या लक्ष्याची माहिती गोळा करण्यापासून म्हणजेच reconnaissance, phishing, malware तयार करणे, सॉफ्टवेअरमधील त्रुटींचा गैरफायदा घेणे आणि अखेरीस डेटा चोरीपर्यंतच्या प्रक्रियेत एआयचा वापर झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.

हेरगिरीसह सायबर हल्ल्यात एआयचा वापर

अँथ्रोपिकने एका रशिया-संबंधित हेरगिरी मोहिमेचा उल्लेख केला आहे. या मोहिमेत एआयच्या मदतीने लक्ष्यांची माहिती गोळा करणे, phishing करणे, malware तयार करणे, हल्ला राबवणे आणि चोरीचा डेटा गोळा करणे अशी अनेक कामे करण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, सुरक्षा यंत्रणांना एखादा malware सापडल्यानंतर तो ओळखू येऊ नये यासाठी त्यात बदल करून त्याची नवीन आवृत्ती तयार करण्यासाठीही एआयचा वापर करण्यात आल्याचे अहवालात नमूद आहे. या मोहिमेत युक्रेन आणि युरोपमधील सरकारी, संरक्षण आणि राजनैतिक संस्थांना लक्ष्य करण्यात आल्याचे अँथ्रोपिकने म्हटले आहे. यामुळे सायबर हल्ल्यांचे स्वरूप बदलण्याची शक्यता आहे. अँथ्रोपिकच्या मते, एआयमुळे भविष्यात अत्यंत गुंतागुंतीचे हल्ले करण्यासाठी पूर्वीसारखी मोठी आणि अत्यंत कुशल टीम आवश्यक नसेल. तुलनेने कमी तांत्रिक कौशल्य असलेल्या व्यक्तींनाही अधिक जटिल मोहिमा राबवण्याची क्षमता मिळू शकते.

एआयच्या मदतीने जनमतावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न

एआय चा गैरवापर सायबर हल्ल्यांपुरता मर्यादित नसल्याचेही या अहवालातून समोर येते. एका ऑपरेशनमध्ये मतदार आणि मतदारसंघांशी संबंधित माहितीचे विश्लेषण करून विशिष्ट सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांच्या आधारे लोकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे अँथ्रोपिकने म्हटले आहे. या मोहिमेत बनावट सोशल मीडिया अकाउंट्स तयार करणे, कृत्रिम पद्धतीने सहभाग वाढवणे आणि बनावट बातमी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जनमतावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे एआयच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर तयार होणाऱ्या बनावट ऑनलाइन सामग्रीमुळे सार्वजनिक चर्चेवर आणि मतदारांच्या मतांवर परिणाम करण्याचा धोका वाढू शकतो.

एआयचा वापर करून लक्ष्यांची प्रोफाइलिंग

अँथ्रोपिक अहवालात हेरगिरीशी संबंधित एक प्रकरणही मांडण्यात आले आहे. चीनशी संबंधित एका ऑपरेशनमध्ये सीरियातील उईघुर व्यक्ती आणि संघटनांशी संबंधित माहिती गोळा करण्यासाठी क्लाउडचा वापर करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. या ऑपरेशनमध्ये १००हून अधिक व्हाट्सअप ग्रुप आणि अनेक टेलिग्राम चॅनेलमधून मिळालेली माहिती संरचित करून संभाव्य लक्ष्यांची प्रोफाइल तयार करण्यात आली. त्यानंतर काही व्यक्तींशी संपर्क साधण्यासाठी एआयच्या मदतीने संवाद आणि भाषांतर करण्यात आले. या प्रकरणामुळे एआयचा वापर मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन माहिती गोळा करून ती व्यवस्थित वर्गीकृत करण्यासाठी आणि संभाव्य लक्ष्यांशी संपर्क साधण्यासाठी कसा होऊ शकतो, हे दिसून येते.

लष्करी तंत्रज्ञान आणि शस्त्रविकासात एआय

अँथ्रोपिकच्या अहवालातील आणखी एक चिंताजनक भाग म्हणजे लष्करी तंत्रज्ञानाशी संबंधित एआयचा वापर. एका रशिया-संबंधित गटाने स्वयंचलित ड्रोन प्रणालीसाठी सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी क्लाउडचा वापर केल्याचे कंपनीने म्हटले आहे. दुसऱ्या चीन-संबंधित प्रकरणात इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि हवाई संरक्षण यंत्रणांविरोधातील लक्ष्यनिश्चितीशी संबंधित सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी वापर झाल्याचे अँथ्रोपिकने नमूद केले आहे.

जैविक संशोधनात एआयचा दुहेरी वापर

एआयचा वापर जैविक संशोधनातही वाढत आहे. मात्र या क्षेत्रात एआयच्या क्षमतेचा सकारात्मक आणि धोकादायक अशा दोन्ही प्रकारे वापर होऊ शकतो. अँथ्रोपिकने अशा पाच प्रकरणांचा उल्लेख केला आहे ज्यामध्ये क्लाउडचा वापर विषाणू, विषारी संयुगे आणि इतर ड्युअल युज जैविक संशोधनाशी संबंधित कामांसाठी झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. यातील काही संशोधन वैद्यकीय किंवा उपचारात्मक स्वरूपाचे असू शकते. मात्र त्याच ज्ञानाचा चुकीच्या पद्धतीने वापर होण्याची शक्यता असल्यामुळे या क्षेत्रात केवळ एआयमधील सुरक्षा फिल्टर पुरेसे नसल्याचे अँथ्रोपिकचे मत आहे.

हे ही वाचा:

आयआरसीटीसी प्रकरणी लालू कुटुंबाविरोधात आरोप निश्चित करण्याचे आदेश

विजय मल्ल्याला बनायचंय ‘कॉकरोच’!

फेटा, टिळा अन् हातात मोदक; मुख्यमंत्री फडणवीसांनी साकारला गणराय

चित्रपट पुरस्कार कार्यक्रम गुजरातला नेल्यामुळे राज ठाकरेंची चिडचिड

एकूणच, अँथ्रोपिकचा हा अहवाल एआयच्या गैरवापराचा आवाका किती वेगाने वाढू शकतो, याकडे लक्ष वेधतो. सायबर हल्ल्यांपासून हेरगिरीपर्यंत, बनावट माहितीपासून फसवणुकीपर्यंत आणि लष्करी तंत्रज्ञानापासून जैविक संशोधनापर्यंत एआयचा वापर होऊ शकतो. त्यामुळे एआयची सुरक्षा हा केवळ तंत्रज्ञान कंपन्यांसाठीचा विषय न राहता सरकार, सुरक्षा यंत्रणा आणि सामान्य वापरकर्त्यांसाठीही महत्त्वाचा मुद्दा ठरणार असल्याचा इशारा या अहवालातून मिळतो.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
332,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा