30 C
Mumbai
Thursday, September 24, 2026
घरधर्म संस्कृतीद्वादशम तू गजानन, १२ नावांची कथा!

द्वादशम तू गजानन, १२ नावांची कथा!

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

गणपतीच्या अनेक स्तोत्रांपैकी देवर्षी नारद मुनींनी रचलेले “श्री संकटनाशन गणेश स्तोत्र” किंवा “गणेश द्वादशनाम स्तोत्र” हे अत्यंत प्रभावी आणि लोकप्रिय स्तोत्र होय. नारद पुराणातील मूळ स्तोत्र हे संस्कृत भाषेत आहे. मात्र, महाराष्ट्रातील थोर संत श्रीधर स्वामी यांनी मराठी भाषेत याचा अनुवाद केला. ज्यामुळे हे स्तोत्र घराघरात पोहचून नित्य पठण होते. “प्रणम्य शिरसा देवं”, गौरीपुत्रं विनायकम्…” या शब्दांनी सुरुवात होणाऱ्या या स्तोत्राचे वैशिष्ट्य म्हणजे यात गणपतींची १२ नावे केवळ सांगितलेली नाहीत तर ती एका विशिष्ट क्रमाने मांडली आहेत. ही १२ नावेच खास महत्त्वाची का? हे पाहण्यासाठी हे स्तोत्र विशेषत्वाने पाहावे लागेल.

स्तोत्रात गणपतीची पहिली चार नावे आहेत. वक्रतुण्ड, एकदन्त, कृष्णपिङ्गाक्ष आणि गजवक्त्र, त्यानंतर लम्बोदर, विकट, विघ्नराज आणि धूम्रवर्ण ही नावे येतात. पुढे भालचंद्र, विनायक, गणपति आणि गजानन अशी उर्वरित चार नावे दिली आहेत. विशेष म्हणजे या प्रत्येक नावामागे गणपतीच्या स्वरुपाची किंवा त्यांच्या दैवी भूमिकेची वेगळी ओळख दडलेली आहे. या नाममालेची सुरुवातच ‘वक्रतुण्ड’ या नावाने होते. गणपतीच्या वक्र सोंडेचा वैशिष्ट्य सांगणारे हे नाव आहे. त्यानंतर लगेच ‘एकदन्त’ येते. म्हणजे गणपतीच्या दोन अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी- सोंड आणि एकच दात- पहिल्याच दोन नावांत समोर येतात. त्यानंतर ‘कृष्णपिङ्गाक्ष’ या नावातून त्यांच्या नेत्रांचा संदर्भ येतो आणि चौथे नाव ‘गजवक्त्र’ त्यांच्या गजमुखाची ओळख करुन देते. म्हणजे या पहिल्या चार नावांकडे एकत्र पाहिले तर गणपतीचे रुप जणू शब्दांमधून उभे राहते. सोंड, दात, डोळे आणि गजमुख- गणपतीच्या प्रतिमेतील महत्त्वाची वैशिष्ट्ये एका पाठोपाठ एका क्रमाने समोर येतात. यानंतरची नावेही  तितकीच रंजक आहेत. ‘लम्बोदर’ या नावातून गणपतीच्या उदराचा संदर्भ येतो, तर ‘विकट’ हे त्यांचे विलक्षण किंवा प्रभावी स्वरुप दर्शवणारे नाव मानले जाते. त्यानंतर अकरावे नाव आहे ‘गणपति’. हे नाव गणांचा अधिपती म्हणून गणपतीची ओळख अधोरेखित करते. या १२ नावांच्या नाममालेचा शेवट होतो तो ‘गजानन’ या नावाने. ज्या देवतेची सर्वात ठळक ओळख गजमुखामुळे होते. त्याच ओळखीने ही नाममाला पूर्ण होते.

या १२ नावांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्तोत्रात त्यांचा क्रम अगदी स्पष्टपणे दिलेला आहे. “प्रथमं”, “द्वितीयकम्”, “तृतीयं”, “चतुर्थकम्” अशा शब्दांपासून सुरुवात करत पुढे पाचवे ते बारावे नाव क्रमाने सांगितले जाते. त्यामुळे ही केवळ नावांची यादी नसून क्रमबद्ध नामस्मरणाची रचना असल्याचे दिसून येते. याहून महत्त्वाचे म्हणजे १२ नावे सांगून झाल्यावर स्तोत्रात पुन्हा “द्वादशैतानि नामानि” अर्थात “ही १२ नावं”, असा स्पष्ट उल्लेख येतो. या १२ नावांचे त्रिसंध्येला पठण करणाऱ्याला विघ्नांची भीती राहत नाही, अशी फलश्रुती दिली आहे. त्यामुळे संकटनाशन स्तोत्राच्या संपूर्ण रचनेत या १२ नावांना मध्यवर्ती स्थान आहे. या नाममालेकडे बारकाईने पाहिल्यास गणपतीच्या विविध पैलूंचे एक सुंदर चित्र समोर येते. सुरुवातीला त्यांच्या शारीरिक वैशिष्ट्यांची ओळख होते; पुढे त्यांच्या रुपातील इतर वैशिष्ट्ये दिसतात. आणि त्यानंतर विघ्नराज, विनायक आणि गणपति या नावांमधून त्यांच्या दैवी भूमिकेची जाणीव होते. शेवटी गजानन या नावाने पुन्हा त्यांच्या मूलभूत ओळखीवर नाममाला येऊन थांबते. म्हणूनच वक्रतुण्डपासून गजाननापर्यंतची ही १२ नावे केवळ गणपतीची वेगवेगळी विशेषणे नाहीत. ती गणपतीच्या रुपाची, वैशिष्ट्यांची आणि दैवी स्थानाची एक संक्षिप्त ओळख करून देणारी नाममाला आहे. आणि या १२ नावांचे नियमित स्मरण केल्याने विघ्नांचा नाश होतो, अशी श्रद्धा या स्तोत्राच्या फलश्रुतीत व्यक्त केली आहे.

कोणत्याही स्तोत्र पठणासाठी दिवसभरातील काहीएक वेळकाळ नेमून दिलेला किंवा सांगितलेला असतो आणि त्यानुसार केल्यास काय फळ प्राप्त होईल याची माहिती दिली जाते. इथे “त्रिसंन्ध्यं यः पठेन्नरं: |” या शब्दांमुळे जे लोक सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा तीनही काळात, तिन्ही वेळी या स्तोत्राचे पठण करतात त्यांना कोणत्याही विघ्नाची किंवा संकटाची भीती राहत नाही.

नारद पुराणातील संकटनाशन स्तोत्रातल्या या अनोख्या नाममालेचे सतत सहा महिने पठण केल्याने फलप्राप्तीला सुरुवात होते. तसेच एक वर्ष नियमितपणे म्हटल्याने इच्छित साध्य होते. अर्थात विद्यार्थी असल्यास विद्या (ज्ञान) प्राप्ती, धनार्थी असल्यास धनसंपत्ती मिळते. पुत्रार्थी असल्यास संतानप्राप्ती होते आणि मोक्षार्थ्याला मोक्ष म्हणजे सद्गती मिळते.
तर अशा या मनोकामना पूर्ण करणा-या स्तोत्राचे पठण करावे हा निश्चय न करणे हे कदाचित अशक्य.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
334,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा