29.3 C
Mumbai
Friday, October 23, 2026
घरविशेषरेल्वे स्थानकांतील अस्वच्छतेवर पश्चिम रेल्वेचा दणका!

रेल्वे स्थानकांतील अस्वच्छतेवर पश्चिम रेल्वेचा दणका!

Google News Follow

रेल्वे स्थानकांवरील स्वच्छता, प्रवाशांना मिळणाऱ्या खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल मंडळाने ‘स्वच्छता पंधरवडा २०२६’ अंतर्गत स्वच्छता आणि खाद्य सुरक्षा मोहिमेला वेग दिला आहे. या मोहिमेद्वारे स्थानक परिसर, रेल्वे वसाहती, गाड्यांचे डबे, पेंट्री कार आणि देखभाल केंद्रांमध्ये व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर कारवाई करत सुमारे ५० जणांकडून एकूण ४८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या माहितीनुसार, मुंबई सेंट्रल, वसई रोड, बोरिवली, गोरेगाव, विरार, अंधेरी, वापी, सुरत आणि अमळनेर यांसह विविध स्थानकांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सुमारे ४० स्थानके आणि रेल्वे वसाहतींमधून अनधिकृत पोस्टर, बॅनर व स्टिकर हटविण्यात आले. तसेच, १२० निश्चित ठिकाणांवरील गुटखा आणि पानाचे डाग स्वच्छ करण्यात आले.

वलसाड आणि अमळनेर येथील रेल्वे वसाहतींमध्येही व्यापक स्वच्छता करण्यात आली. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासोबतच थुंकणे आणि परिसर अस्वच्छ करणे टाळावे, यासाठी जनजागृती करणारे फलक लावण्यात आले. मुंबई सेंट्रल येथील ईएमयू कारशेड, नंदुरबार येथील कॅरेज अँड वॅगन डेपो तसेच कोच केअर सेंटर आणि देखभाल विभागांमध्येही विशेष स्वच्छता करण्यात आली. मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या डब्यांची आतून व बाहेरून धुलाई करण्यात आली.

खाद्यपदार्थ आणि पिण्याच्या पाण्याची तपासणी

प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने खाद्यपदार्थांची स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यावर विशेष भर देण्यात आला. मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, ग्रँट रोड, वलसाड, उधना, सुरत आणि वापी येथील खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची वाणिज्य आणि आरोग्य निरीक्षकांनी तपासणी केली. रेल्वे गाड्यांमधील पेंट्री कारचीही कसून पाहणी करण्यात आली.

खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन त्यांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात आली. खानपान कर्मचाऱ्यांना वैयक्तिक स्वच्छता, सुरक्षित पद्धतीने अन्न हाताळणे आणि भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाच्या (FSSAI) नियमांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथही देण्यात आली.

पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता तपासण्यासाठी जोरावासन आणि उकाई सोनगड स्थानकांवर एच२एस चाचणी किटद्वारे पाण्याचे नमुने तपासण्यात आले. तसेच, वांद्रे पश्चिम येथील रेल्वे वसाहतीतील आरपीएफ बॅरकसह निर्धारित ठिकाणी पाण्यातील क्लोरीनचे प्रमाण आणि टीडीएसची तपासणी करण्यात आली.

२,५०० किलो कचऱ्याची विल्हेवाट

या दोन दिवसीय मोहिमेदरम्यान संपूर्ण मंडळात विविध प्रकारचा २,५०० किलोपेक्षा अधिक कचरा जमा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. रेल्वे परिसरात अस्वच्छता पसरविणाऱ्यांविरुद्ध कारवाई करत सुमारे ५० जणांवर एकूण ४८ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. याशिवाय, ८२ जणांचे समुपदेशन करून त्यांना परिसर स्वच्छ ठेवण्याचे आणि कचरा न पसरविण्याचे आवाहन करण्यात आले.

स्वच्छता, अन्नसुरक्षा, पाणी गुणवत्ता तपासणी आणि जनजागृती या माध्यमांतून मुंबई सेंट्रल मंडळाने रेल्वे परिसर अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि प्रवाशांसाठी आरोग्यदायी ठेवण्याच्या दिशेने प्रयत्न तीव्र केले आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा