28 C
Mumbai
Friday, November 20, 2026
घरसंपादकीयराहुल गांधींना नेमकं झालंय काय?

राहुल गांधींना नेमकं झालंय काय?

Google News Follow

विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना नेमकं काय झालंय असा प्रश्न कुणाच्याही मनात येऊ शकतो. भारतात असताना त्यांचे सरकारवर आरोप हे स्वाभाविक आहेत, पण परदेश दौऱ्यावर असताना त्यांना नेमके काय झालेले असते. कारण अशा दौऱ्यात राहुल गांधी हे भारताच्या विऱोधात जेवढे बोलता येईल तेवढे बोलतात.

सध्या राहुल गांधी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत आणि तिथे कोलंबिया, शिकागो विद्यापीठात त्यांचे भाषण झाले. राहुल गांधी हे अशा भाषणांमध्ये आपले व्हिजन कधीही सांगत नाहीत, पण देशाची स्थिती कशी वाईट आहे, पंतप्रधान अर्थातच नरेंद्र मोदी हे कसे वाईट पंतप्रधान आहेत, देशाची आर्थिक स्थिती कशी खालावलेली आहे, देशात कशी बेरोजगारीची समस्या चिघळली आहे, देश कसा सत्यानाशाच्या उंबरठ्यावर आहे, यावर राहुल गांधी भरभरून बोलत असतात. विशेष म्हणजे या भाषणांमध्ये भारताची एकही चांगली बाजू ते कधीही सांगत नाहीत. कोणत्याही क्षेत्रात भारत आगेकूच करतोय, असे राहुल गांधींनी सांगितल्याचे आठवत नाही. काँग्रेस सत्तेवर आली तर आणि तरच भारत या सगळ्या समस्यांमधून बचावणार आहे, असा दुधखुळा युक्तिवाद ते करतात.

आता त्यांनी एक्सवर जी ताजी पोस्ट केली त्यात त्यांनी अमेरिका, चीन आणि रशिया या तीन देशांचे प्रमुख त्रिसदस्यीय बैठकीत बसलेले दाखवले आणि या बैठकीत भारत का नाही, असा अपेक्षित बालीश प्रश्न विचारला. काँग्रेसचे सरकार असते तर याठिकाणी भारतही टेबलवर बसलेला दिसला असता असा राहुल गांधींचा दावा आहे.

राहुल गांधी बिनधास्त कोणतेही दावे करू शकतात. त्यासाठी कोणता तर्क, तथ्य असलेच पाहिजे अशी त्यांची कोणतीही अट नसते. मुळात तीन देश एका ठिकाणी येणार असतील तर तो त्या तीन देशांचा प्रश्न असतो, एवढेही राहुल गांधींना का कळू नये? कोणतेही देश आणि कितीही देश एकत्र येऊन विविध मुद्द्यांवर चर्चा करू शकतात. त्यात निमंत्रण नसलेल्या देशांना उपस्थित राहण्याची अर्थातच मुभा नसते. मग चीन, रशिया, अमेरिका या देशात जर एखादी बैठक होत असेल तर त्यात भारताने जायलाच हवे असा हट्ट करणे हा मूर्खपणा नाही का? भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका यांच्यातही क्वाड परिषद होते, आताच या चारही देशांचे प्रतिनिधी एकत्र आले. यात पाकिस्तान का नव्हता, रशिया का नव्हता, चीन का नव्हता असा प्रश्न कुणी विचारला तर लोक त्याला हसतीलच. जर चार देशांनी एकत्र येण्याविषयी ठरवले असेल तर त्यात पाचवा देश येऊच शकत नाही, हे अगदी सरळ आहे. काँग्रेस असती तर काँग्रेसचा पंतप्रधान थेट रशिया, चीन, अमेरिकेच्या त्रिपक्षीय बैठकीत घुसला असता असे राहुल गांधींना म्हणायचे आहे की काय?

भारत त्या बैठकीत नाही हा भारताचा अपमान राहुल गांधींना वाटतो. मग काँग्रेसची इतकी वर्षे सत्ता होती, तेव्हा अन्य देशांच्या अशा कोणत्या बैठकांमध्ये काँग्रेसचे पंतप्रधान बोलावले गेले होते, तेही राहुल गांधींना सांगायला हवे. उलट आताच्या काळात भारताचा सन्मान आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेलाच आहे. तो राहुल गांधींनी कितीही नाकारला तरी तो विविध बैठका, विविध घडामोडींमधून दिसत असतो. भारताचे सगळ्यांशी चांगले संबंध ठेवण्याची भूमिका त्याला कारणीभूत आहे. त्यामुळेच विविध आर्थिक संकटे आली तरीही भारतीयांना त्याची फार मोठी झळ त्यावेळी बसली नाही.

राहुल गांधी दावा करतात की, पाकिस्तानला एकीकडे महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी मिळते, इराण अमेरिका युद्धात पाकिस्तान महत्त्वाची भूमिका बजावत आहे मग भारत कुठे आहे?  त्या दोन देशांच्या युद्धावर तोडगा काढण्यासाठी त्यांना कुणाला मध्यस्थ बनवावासा वाटतो, हा त्यांचा प्रश्न आहे. बरे, पाकिस्तान मध्यस्थ झाल्यामुळे पाकिस्तानचा कोणता फायदा झाला किंवा हे युद्ध पाकिस्तानमुळे संपले याविषयी राहुल गांधींनी काही माहिती दिल्याचे स्मरत नाही. एकूणच भारताला कमी लेखण्यासाठी राहुल गांधी कोणत्याही घडामोडींचा हवा तसा अर्थ लावायला मोकळे आहेत.

हे ही वाचा:

भारतात जन्मलेल्या दहशतवाद्यांपासून जम्मू-काश्मीर ३५ वर्षांनी मुक्त!

अय्यप्पा दीक्षा घेतलेल्या हिंदू कर्मचाऱ्याला टीसीएस कार्यालयात प्रवेश नाकारला

नवी मुंबई विमानतळावर विमानांची विक्रमी वाहतूक

धोनी सीएसके संघाची खरी ओळख!

पण याच भाषणात त्यांना पाकिस्तानच्या विद्यार्थ्याने भारत पाकिस्तान संबंधांबाबत प्रश्न विचारला, तेव्हा मात्र राहुल गांधी यांची बहुतेक ट्युब पेटली असावी. त्यांनी उत्तर दिले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानने दहशतवादाला पुरस्कृत करणे थांबवले पाहिजे. जोपर्यंत हा सीमेपलिकडून होणारा दहशतवाद थांबत नाही, तोपर्यंत दोन देशात चर्चा होऊ शकत नाही, असे राहुल गांधी म्हणतात. राहुल गांधींनी गेल्या १२ वर्षात प्रथमच अशी भूमिका मांडली आहे. कुठेतरी राहुल गांधी यांनी थोडासा बुद्धीला जोर लावल्यामुळे त्यांना भारत पाकिस्तानबाबत अशी भूमिका आवश्यक आहे, असे सांगता तरी आले. खरे तर, ही भूमिका तर विद्यमान सरकारचीही आहे. त्यात वेगळे असे काय? पाकिस्तानने दहशतवाद थांबवावा ही भारताची भूमिका आहेच, पहलगाम येथे जो भ्याड हल्ला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केला, त्यावेळी मात्र भारतावर टीका करण्यात काँग्रेसचे सगळे नेते अग्रेसर होते. त्याला उत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले आणि पाकिस्तानला जबर दणका दिला, तेव्हाही भारताची किती विमाने पाडली, अमेरिकेने युद्धविराम करण्यास सांगितले म्हणून भारत थांबला अशा निरर्थक गोष्टीत काँग्रेसने आपला वेळ खर्ची घातला. आपण ऑपरेशन सिंदूरच्या रूपात जबरदस्त उत्तर दिले याबद्दल आपल्या सैन्यदलांचे मनोबल वाढवताना काँग्रेस पक्ष कधीही दिसला नाही.

ऑपरेशन सिंदूरनंतर मोदींनी विविध पक्षांच्या खासदारांचे गट तयार करून देशविदेशात त्यांना ऑपरेशन सिंदूर करण्यामागील भारताची आवश्यकता काय, याचे स्पष्टीकरण देण्यास सांगितले. काँग्रेसचे शशी थरूर त्या गटात होते. तेव्हाही पाकिस्तानकडून कसा दहशतवादाचा पुरस्कार केला जातो, हेच या सगळ्या खासदारांनी सांगितले. मग तेव्हा आपण काय वेगळे सांगितले. राहुल गांधींना मात्र ते उशिरा सुचले, एवढेच. त्यांच्या पक्षाचे खासदार जाऊन देशविदेशात भारताची पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाबद्दल काय भूमिका आहे, हे सांगत असताना राहुल गांधींना तेव्हा पाकिस्तानातून दहशतवादाला खतपाणी घातले जाते, हे माहीत नव्हते का? तेव्हाच त्यांनी पाकिस्तानचा दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही, अशी रोखठोक भूमिका घ्यायला हवी होती, पण तेव्हा चटपटीत राजकारण करण्यात काँग्रेसने धन्यता मानली. खरे तर, पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाचा सर्वाधिक फटका हा काँग्रेसच्या सत्ताकाळातच भारतीयांना सहन करावा लागलेला आहे. २००८चा मुंबईवरील अतिरेकी हल्ला हा त्याचे एक मोठे उदाहरण आहे. त्याच पाकिस्तानला बरे वाटावे म्हणून राहुल गांधी हे भारताला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात, हे दुर्दैवी आणि संतापजनक आहे. भाजपाने त्यांना पाकिस्तान फॅन बॉय अशी उपाधी दिली आहे, ती खरीच म्हणावी लागेल.

इस्रायलच्या संदर्भात सुद्धा राहुल गांधींनी भूमिका मांडली तीही त्यांना उशिरा सुचलेले शहाणपण म्हणता येईल. किंवा मग आंतरराष्ट्रीय स्तरावर असे बोलणे गरजेचे आहे, नाहीतर आपली भारतातच नव्हे तर अन्य देशातही नाचक्की होईल, अशी भीती तरी त्यांना वाटत असावी.

इस्रायल बाबत ते काय म्हणाले की, भारत आणि इस्रायल संबंध हवे आहेत. इस्रायलने त्यांच्यावर हमासकडून झालेल्या हल्ल्याचेही त्यांनी समर्थन केले. भारताने इस्रायलकडून शस्त्रास्त्रे विकत घेण्याबाबतही राहुल गांधींना कोणताही आक्षेप नाही. मग हीच तर भारताची भूमिका होती. इस्रायलने त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे कसे उत्तर द्यावे, हे भारत सांगू शकत नाही. ते इस्रायलने ठरवायचे आहे. त्याचा काय कुणाला कसा लावायचा तो त्यांनी लावावा. अर्थात निरपराध्यांची हत्या होऊ नये ही तर भारताची खूप आधीपासूनचीच भूमिका आहे. मग अचानक राहुल गांधींना इस्रायलने दिलेल्या प्रत्युत्तराचे समर्थन करावेसे का वाटले?

राहुल गांधी म्हणतात की, भारत जगाचे नेतृत्व करण्यास सक्षम नाही. ही भाषा राहुल गांधी कसे काय वापरू शकतात. आपला देश नेतृत्व करू शकतो, असा विश्वास व्यक्त करायचा की, देशाकडे ती क्षमता नाही असे म्हणायचे. मोदींचे नेतृत्व तुम्हाला मान्य नाही ठीक आहे, पण देश जगाचे नेतृत्व करू शकेल असेही तुम्हाला वाटत नाही, याला काय म्हणणार. म्हणजे काँग्रेस सत्तेत आली की, तेव्हा देश जगाचे नेतृत्व करेल, असे राहुल गांधींना म्हणायचे आहे की काय?

एकूणच राहुल गांधींच्या डोक्यात जो काही घोळ झालेला आहे, तो कोण निस्तरणार आहे?

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा