आसाम आणि मिझोराम या दोन राज्यात सीमावादावरुन सध्या धुमश्चक्री सुरु आहे. मिझोराम पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आसामचे ६ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर आसाममध्ये कार्यरत असलेले मराठमोळे आयपीएस वैभव निंबाळकर यांच्या पायाला गोळी लागून ते जखमी आहेत. या सर्व हिंसाचारानंतर आता मिझोरामने थेट आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हत्येचा प्रयत्न, कट रचल्याचा आरोप असे अनेक गंभीर गुन्हे मुख्यमंत्री हिंमत सरमा यांच्यावर लावण्यात आले आहेत. इतंकच नाही तर त्यांना उद्या पोलीस स्टेशनला हजर राहण्यास बजावलं आहे.
मिझोराम पोलिसांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्यासह सहा वरिष्ठ अधिकारी आणि २०० पोलिसांवर गुन्हे दाखल केले आहेत. मिझोराम पोलीस महासंचालक जॉन एन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्वांविरुद्ध हत्येचा प्रयत्न आणि अन्य गुन्हेगारी कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सीमांत नगरजवळ मिझोराम आणि आसाम पोलिसांमध्ये हिंसक झडप झाली होती. त्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आसाममधखील बराक घाटी परिसरातील कचार, करीमगंज आणि हाईलकांडीची १६४ किमीची सीमा मिझोरम राज्यातील आईजोल, कोलासीब आणि मामित जिल्ह्यांना लागते. जमीनीच्या कारणावरुन ऑगस्ट २०२० पासून आतंरराज्य सीमेवर संघर्ष सुरु झाला आहे. मिझोरमचे पोलीस महानिदेशक लालबियाकथांगा खिंगागते यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीमध्ये वादग्रस्त भागात एटलांन नदीच्या जवळील भागात रात्री आठ झोपड्या जाळण्यात आल्याचं सांगितलं. हिमंता बिस्वा सरमा आसामचे मुख्यमंत्री झाल्यानंतर संघर्ष वाढला आहे. गेल्यावर्षी झालेल्या संघर्षानंतर केंद्र सरकारनं हस्तक्षेप केला होता.
हे ही वाचा:
बेन स्टोक्सचा क्रिकेटला अलविदा?
सर्वसामान्यांचे नेते गणपतराव देशमुख यांचे निधन
आसाम आणि मिझोरममधील आंतरराज्यीय सीमा वादावरुन दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आरोप प्रत्यारोप केले आहेत. वादग्रस्त भागात आसाम आणि मिझोरममधील पोलीस दल आणि सामान्य नागरिकांमध्ये संघर्ष झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. तिथे गोळीबार झाल्याचं समोर आलं होतं. दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरुन आरोप प्रत्यारोप केले मात्र नंतर त्यांच्यात चर्चा झाल्याचं सागंण्यात आलं आहे. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक देखील झाली होती.