24 C
Mumbai
Friday, December 19, 2025
घरसंपादकीयढलती का नाम महाविकास आघाडी; मन्नू तेरा हुआ, अब मेरा क्या होगा?

ढलती का नाम महाविकास आघाडी; मन्नू तेरा हुआ, अब मेरा क्या होगा?

राजकीय उकाडा वाढल्यामुळे उद्धव ठाकरे यांना घाम फुटला आहे. त्यामुळेच ते पवारांच्या भेटीला गेले.

Google News Follow

Related

शिउबाठाचे पक्षप्रमुख उद्धव यांनी काल मंगळवारी सिल्व्हर ओक निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत काय चर्चा झाली आहे, ते पवारांनी सांगितले. त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनीही सांगितले. परंतु त्या बैठकीत कोणती चर्चा होणार याबाबत खरा तपशील उघड होण्याची शक्यता कमी. या बैठकीत साहेब तुमचे सेटींग झाले असेल तर माझेही करून द्या अशी चर्चा झाल्याची शक्यता सर्वाधिक आहे.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर शरद पवार यांनी मुहूर्त साधला आणि ते एका पाठोपाठ एक दणके देत चालले आहेत. आधी गौतम अदाणी यांची पाठराखण केली, जेपीसीबाबत संभ्रम निर्माण केला. पंतप्रधानांची डिग्री हा राजकीय मुद्दा असू शकत नाही, असे मत व्यक्त केले. अजित पवारांनी तर संजय राऊत यांची ईव्हीएमची थिअरी पूर्णपणे बाद केली. म्हणजे काँग्रेस आणि शिउबाठा यांनी जे तीर भाजपावर सोडले ते सगळे या काका-पुतण्यांनीच निकामी करून टाकले.
इथपर्यंत उद्धव ठाकरे गप्प होते. संजय राऊतच काय ते बोलत होते. परंतु त्यानंतर पवारांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आणि मातोश्रीवर चिंतेचे ढग दाटले. ‘ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना मित्रपक्षांना विश्वासात घेतले नाही’, असे मत एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी व्यक्त केल्यानंतर ठाकरेंचे धाबे दणाणले. मामला आता आडून आडून राहिला नाही तर अगदी थेट झाला होता.

पवार महाविकास आघाडीचे विसर्जन करायला चाललेत का? अशी शंका अनेकांच्या मनात निर्माण झाली. महाविकास आघाडीचे अस्तित्व शरद पवारांशिवाय शक्यच नाही. ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्यासारख्या अहंमन्य नेत्यांना बांधून ठेवण्याची कामगिरी पवारांनीच पार पाडली, याबाबत कुणालाच संशय नाही. त्यामुळे वेळ न दवडता, उद्धव ठाकरेंनी त्यांचे तारणहार (कि मारणहार?) संजय राऊत यांच्यासह सिल्व्हर ओकवर धाव घेतली. सुप्रिया सुळे या देखील बैठकीत उपस्थित होत्या.

सुळे यांचे म्हणणे प्रमाण मानले तर या बैठकीत ताडोबाच्या जंगलात वाढलेल्या वाघांवर चर्चा झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींचा जागर झाला. शेंबडे पोर सुद्धा यावर विश्वास ठेवणार नाही. जे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत मंत्रालयात फिरकत नव्हते, ज्यांना भेटायला शरद पवार काँग्रेसच्या नेत्यांसोबत अनेकदा मातोश्री किंवा वर्षा निवासस्थानी यायचे, ते उद्धव ठाकरे वाघांवर आणि बाबांवर चर्चा करण्यासाठी सिल्व्हर ओकवर गेले यावर कुणाचा विश्वास बसेल?

त्यात अंजली दमानिया यांनी अजित पवार भाजपामध्ये चालले असे ट्वीर करून धुरळा उडवून दिलेला आहे. भाजपाने ४ वॉशिंगमशीनची मागणी नोंदवलेली आहे, असे संजय राऊत म्हणालेत. शिंदे-फडणवीस सरकारने मांडलेल्या विश्वासमत प्रस्तावाच्या बाजूने १६४ जणांनी मतदान केले. परंतु पुन्हा जर अशी वेळ आली तर आम्हाला १८४ मते पडतील असा दावा केला आहे. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी राज्यात भूकंप होणार असे सुतोवाच केले आहे आणि अवकाळी पावसाच्या चर्चेसाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करायला गेले आहेत.

हे ही वाचा:

एलआयसीने घेतले अदानी कंपनीत आणखी शेअर्स, काँग्रेसचा तीळपापड

आरे-बीकेसी नंतर आता मेट्रो ३ वरळीपर्यंत धावणार

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ‘आंबेडकर यात्रा ट्रेन’

केशुब महिंद्रा यांचे ९९ व्या वर्षी निधन

गेल्या काही दिवसात राजकीय वातावरण कमालीचे बदललेले आहे. राजकीय उकाडा वाढल्यामुळे उद्धव ठाकरे यांना घाम फुटला आहे. त्यामुळेच ते पवारांच्या भेटीला गेले. पवार यांनी या भेटीत मविआवर चर्चा झाल्याचे सांगितले आहे. पक्ष म्हणून आपल्या भूमिका वेगळ्या असल्या तरी मविआ म्हणून आपण एकत्र काम केले पाहिजे, असे मत पवारांनी मांडले आहे. परंतु एकाला गिरगावला आणि एकाला गोरेगावला जायचे आहे, मग हे शक्य कसे होणार?

तिथे कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली याचा अंदाज बांधणे कठीण नाही. पवारांच्या विधानावरून उद्धव ठाकरे यांनी एकच सवाल विचारला असेल, कहना क्या चाहते हो? साहेब असे अचानक मविआला दणके का देताय? हा या प्रश्नाचा अर्थ, परंतु उद्धव यांनी तो सूचक शब्दात विचारला असेल.

चलती का नाम गाडी, या ब्लॅक एण्ड व्हाईटच्या जमान्यातला सिनेमा. अशोक कुमार, अनुप कुमार, किशोर कुमार हे बंधू आणि लावण्यसम्राज्ञी मधुबाला यांचा हा सिनेमा. या सिनेमात एक गाणं आहे, मन्नू तेरा हुआ, अब मेरा क्या होगा? गाण्याची पार्श्वभूमी मजेदार आहे. हे तिघे सख्खे भाऊ, सिनेमात सुद्धा भावाच्या भूमिकेत आहेत. कोणत्याही मुलीकडे बघायचे नाही, असा दमच मोठ्या भावाने घालून दिलेला असतो. परंतु किशोर कुमार बंडखोरी करून मधुबालाच्या प्रेमात पडतो. हे समजल्यावर अनुपकुमार हे गाणं म्हणतो. महाराष्ट्रात सुद्धा हेच चित्र आहे, भाजपाकडे पाहायचे नाही, हा दंडक पवारांनीच मोडला आहे. म्हणून ठाकरेंचे धाबे दणाणले आहे.

नेमकं हेच उद्धव ठाकरे यांनी पवारांना विचारले असेल. साहेब तुमचं काही सेटींग झाले असेल तर होऊ द्या, पण आता माझं काय होणार ते तर सांगा? या कथनाचा भावार्थ तुमचं जमलं असेल तर माझंही जमवून टाका.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा