कसोटी, टी-२० मालिका जिंकल्यानंतर भारताने एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ सज्ज झाला आहे. एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडला धूळ चारत भारताने मालिकेत १-० अशी बढत मिळवली आहे. भारताने या सामन्यात ६६ धावांनी विजय मिळवला आहे.
मंगळवारी भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली. पुण्यातल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळवल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. भारताकडून रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी चांगली सुरुवात करून दिली. पण शिखर सोबत ६४ धावांची भागिदारी करून रोहित शर्मा बाद झाला. त्यानंतर मैदानात आलेल्या कर्णधार विराट कोहली याने धवनला चांगली साथ दिली. शिखर धवनचे शतक २ धावांनी हुकले. तो ९८ धाव करून बाद झाला, तर कोहलीने ५६ धावांची खेळी केली. धवन, कोहलीने रचलेल्या पायावर के.एल. राहुल आणि कृणाल पांड्या या दोघांनी कळस चढवला. राहुलने ४३ चेंडूत नाबाद ६२ धाव केल्या तर पांड्याने ३१ चेंडूत ५८ धाव केल्या. पदार्पणाच्या सामन्यात सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम कृणाल पांड्याने केला आहे. या कामगिरीच्या जोरावर भारताने धावफलकावर ३१७ धावा चढवल्या.
हे ही वाचा:
बेअब्रु सरकार, रया गेलेले पवार
भाजपाच्या आरोपांना उत्तरे द्या नवाब मलिक, भ्रमिष्टा सारखे बोलू नका
‘पेन ड्राईव्ह’ घेऊन फडणवीस दिल्लीत
या लक्ष्याचा सामना करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंड संघाने अतिशय आक्रमक सुरुवात केली. इंग्लंडचे ओपनर्स जेसन रॉय आणि जॉनी बेस्ट्रॉव यांनी अवघ्या १४ षटकांमध्ये १३५ धाव ठोकल्या. पण नंतर इंग्लंडच्या संघाला उतरती कळा लागली. इंग्लंडकडून जॉनी बेस्ट्रॉव याने ९४ तर रॉय याने ४६ धावांची खेळी केली. पण या दोघांव्यतिरिक्त कोणालाही चांगली कामगिरी करता आली नाही. भारताकडून गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याने भारतासाठी पदार्पण केले. कृष्णा याने ८.१ षटकांत ५४ धावांत ४ बळी घेतले. पदार्पणाच्या सामन्यात ४ बळी घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.