31 C
Mumbai
Friday, December 19, 2025
घरराजकारणठाकरेंना भारतरत्न, राऊतांना नोबेल

ठाकरेंना भारतरत्न, राऊतांना नोबेल

Google News Follow

Related

बांग्लादेशच्या पन्नासाव्या स्वातंत्र्यदिनाच्या निमीत्ताने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन दिवसांचा बांग्लादेश दौरा झाला. बांग्लादेशच्या पन्नासाव्या स्वातंत्र्यदिनी भारतीय पंतप्रधान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पण फक्त पंतप्रधान म्हणून हा मान मिळणे चुकीचे आहे. मोदींनी बांग्लादेश स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला. जेलमध्ये गेले पण हे देखील प्रमुख पाहुणे बोलवण्याचे कारण असू शकत नाही. बांग्लादेशला जर प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला बोलवायचेच होते तर त्यासाठी सर्वात योग्य नाव म्हणजे उद्धव ठाकरे. कारण इंदिरा गांधी यांनी जेव्हा बांग्लादेशच्या निर्मितीसाठी धाडसी निर्णय घेतला तेव्हा शिवसेनेने त्यांचे कौतुक करत पाठींबा दिला होता. तो जर दिला नसता तर त्या धाडसाला काही किंमतच नव्हती. त्यामुळे सध्याचे शिवसेना पक्षप्रमुख या नात्याने बांग्लादेशने उद्धव ठाकरेंनाच बोलवायला हवे होते. तसे जर झाले असते तर संजय राऊतांना मोदी आणि बांग्लादेश दौरा या विषयावर आपली लेखणी खर्च करावी लागलीच नसती. कारण मोदींनी बांग्लादेश दौरा करून फक्त राजकीय हेतू साधला असे म्हणतात. उद्धव ठाकरेंनी किमान तसे तरी केले नसते.

हे ही वाचा:

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया होण्याची शक्यता

बेगम ममता बंगालला मिनी पाकिस्तान बनवेल

‘होला मोहल्ला’ दंगलप्रकरणात १७ जणांना अटक

पंतप्रधान मोदी हे बांग्लादेश दौऱ्यावर गेले असल्याने पश्चिम बंगालच्या मतदारांवर त्याचा परिणाम होईल असा आरोप केला जात आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या बद्दल जाहिर वाच्यता केली आहे. राऊतांनीही अग्रलेखात त्याचीच री ओढली आहे. पण मोदींनी खरंच बंगाल निवडणूका डोळ्यासमोर ठेवून दौरा आखला असेल तर वास्तविक मोदींवर ही वेळ का आली याचा विचार होणे आवश्यक आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या निवडणूका प्रचंड प्रतिष्ठेच्या केल्या असे राऊत म्हणतात. पण हा त्यांचा विनय झाला. वास्तविक पश्चिम बंगालच्या निवडणूकांना खरी प्रतिष्ठा आली ती शिवसेनेच्या एन्ट्रीने. राऊतांच्या म्हणण्याप्रमाणे बांग्लादेशमधले अनेक घुसखोर हे बंगालचे मतदार आहेत. हे मतदार म्हणजे ममता बॅनर्जी यांची हक्काची वोटबँक. त्यासोबत तुष्टीकरणाचे राजकारण करण्याची ममतांची ख्यातीच आहे. अशा परिस्थितीत हिंदूत्व, राष्ट्रवाद आणि विकास या त्रिसूत्रीच्या आधारे निवडणूका लढणाऱ्या आणि जिंकणाऱ्या भाजपाला मिशन बंगाल अतिशय सोपे होते. पण भाजपाचे हे मनसुबे खऱ्या अर्थाने उधळले ते शिवसेनेने. पश्चिम बंगालमधली आपली अतिप्रचंड संघटनात्मक ताकद आणि बंगाली हिंदूचा असणारा पाठिंबा ही सगळी मुद्दल शिवसेनेने ममता बॅनर्जींच्या मागे उभी केली. ती पण कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता. त्यामुळे एकीकडे कट्टरतावादी मुसलमान, बांग्लादेशी घुसखोर यांची ताकद आणि त्याच्या जोडीला शिवसेनेचा ज्वलंत हिंदूत्वाचा चेहरा यामुळे तृणमूल काँग्रेस पक्ष अधिक बलवान झाला. हे कमी की काय म्हणून ममता बॅनर्जी यांच्यासोबत एकाचवेळी प्रशांत किशोर आणि संजय राऊत असे दोन चाणक्य असल्याने तिथेही भाजपा लंगडी पडू लागली. त्यामुळे भाजपाला ही निवडणूक कठीण झाली. शिवसेनेच्या एन्ट्रीमुळे बंगाली हिंदू मोदींच्या सभांना पण जाणार नाही हे लक्षात आल्यामुळेच मोदींवर बहुदा बांग्लादेशात जाऊन तिथल्या मथुआ समाजाचा कार्यक्रम करण्याची वेळ आली असावी. पण त्याचाही परिणाम होईल असे वाटत नाही.

अमित शहा यांनी परवा पत्रकारांशी बोलताना बंगालमधल्या पहिल्या टप्प्यातील ३० जागांपैकी २६ पेक्षा जास्त जागा भाजपा जिंकेल असा दावा केला. पण ते काही खरं नाही. परिस्थिती याच्या एकदम उलट असणार आहे. भाजपा २६ पेक्षा जास्त जागा हरणार आहे. त्यातुनही जर भाजपा त्या जागा जिंकलाच तर त्याला कारणही शिवसेनाच असणार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंगालच्या प्रथम चरणात एकही प्रचार सभा बंगालमध्ये घेतली नाही. त्यांच्या सभेची प्रचंड मागणी ही तिथल्या स्थानिक हिंदूंकडून केली जात होती. पण घरात ठिय्या देऊन महाराष्ट्राची कोविड परिस्थिती हाताळण्यात व्यग्र असलेल्या ठाकरेंना ते शक्य नव्हते. त्यामुळे भाजपा जर बंगाल निवडणूकांचा पहिला टप्पा जिंकलीच तर त्यांनी शिवसेनेचे आणि खास करून मुख्यमंत्री ठाकरेंचे आभार मानले पाहिजेत.

हे ही वाचा:

कट्टरपंथी सोकावले असताना ‘आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही’चा टेंभा मिरवायला शिवसेना तयारच असते

लॉकडाऊनच्या विरोधात भाजपा रस्त्यावर उतरेल

गृहमंत्र्यांनी टार्गेट बाजूला ठेवून इथेही जरा लक्ष द्यावे

नरेंद्र मोदींच्या बांग्लादेश दौऱ्याने साध्य काय झाले हे सांगणे तसे अवघडच पण तिथल्या हिंदूंचे नुकसान मात्र खूप झाले. मोदी भेट देणार म्हणून बांग्लादेश सरकारने स्वतः जातीने लक्ष घालून तिथल्या दोन मंदिरांचा जिर्णोद्धार केला. त्यापैकी जेशोरेश्वरी मंदिरात हिंदू भाविकांसाठी एक अद्ययावत सभागृह भारत सरकार बांधून देणार आहे. हिंदू बहूल भागातील एका मुलींच्या शाळेचा विकास करणार आहे आणि एक प्राथमिक शाळा बांधणार आहे. पण याने तिथल्या हिंदू समाजाचा काय फायदा? उलट मोदींच्या भेटीने बांग्लादेशात दंगली उसळल्या. तिथल्या कट्टरवादी मुसलमान आणि डाव्यां विरोधात थेट शेख हसिना यांच्या आवामी लिगचे कार्यकर्ते मोदींच्या बाजूने उभे राहिले पण यात काय मोठे? भारतासोबतच बांग्लादेशमधल्या हिंदूंची खरी काळजी कोणाला असेल तर ती शिवसेनेलाच आहे. जेव्हा मोंदींनी नागरिकता कायद्यात सुधारणा केली, ज्यामुळे अत्याचारग्रस्त बांग्लादेशी हिंदूना भारतीय नागरिकत्व मिळणार आहे. तेव्हा या हिंदूच्या काळजीपोटीच हा कायदा महाराष्ट्रात लागू होणार नाही असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. यातूनच त्यांचे औदार्य दिसून येते.

पंतप्रधान मोदींनी बांग्लादेशच्या स्वातंत्र्यासाठी जो सत्याग्रह केला त्यासाठी मोदींना ‘ताम्रपट’ देण्यात यावा अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. पण खरंतर त्याही आधी उद्धव ठाकरे यांनी देशाच्या राजकारणात जे योगदान दिले आहे त्यासाठी त्यांना भारतरत्न द्यायला हवा. तर राऊत यांनी इतकी वर्ष अग्रलेख खरडून साहित्यात जी वाखाणण्याजोगी कामगिरी केली आहे त्यासाठी त्यांना नोबेल मिळायला हवा.

-स्वानंद गांगल

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

एक कमेंट

  1. ही शिवसेना एक लबाड़ व प्रायव्हेट लामि पक्ष असून स्वतःच्या दानवीय कृत्यांना लपवुन ठेवण्यासाठी हिंदुत्वाची शाल घातलेली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा