30 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
घरविशेषलेसबियन एलिमेंट: गरज, अपरिहार्यता की पब्लिसिटी स्ट्रॅटेजी?

लेसबियन एलिमेंट: गरज, अपरिहार्यता की पब्लिसिटी स्ट्रॅटेजी?

Google News Follow

Related

भारत हा सध्या ओटीटी विश्वासाठीचे एक हॉट फेव्हरेट मार्केट आहे. डिजीटल इंडियाचे स्वप्न प्रत्यक्षात येत असताना स्वस्त स्मार्टफोन, स्वस्त इंटरनेट हे भारतीयांना उपलब्ध झाले आणि भारतात असलेले प्रचंड मोठे मार्केट ओटीटी प्लॅटफॉर्म्सना खुणावू लागले. ॲमेझॉन, नेटफ्लिक्स, अल्ट बालाजीपासून सुरू होणारी ही ओटीटीची ‘वाढता वाढता वाढे भेदीले शुन्य मंडळा’ अशी गत झाली आहे. अगदी टिव्ही चॅनल्स असणाऱ्या झी, सोनी, स्टार यांनाही या स्पर्धेत उतरण्या खेरीज पर्याय उरला नाही. त्यांनीही आपापले ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि त्यासाठी एक्स्लुझिव कंटेटची सुरूवात केली.

हा जमाना कंटेंटचा आहे असं कायम म्हटलं जायचं आणि ओटीटीने ते सिद्ध करून दाखवलं. हव्या त्या भाषेतला, हरप्रकारच्या जॉनरचा, जगाच्या कानाकोपऱ्यातील कंटेट भारतीय श्रोत्यांना एका क्लिकवर उपलब्ध होऊ लागला. सास-बहूच्या मालिकांना आणि न्यूज चैनल्सवरच्या डिबेटला कंटाळलेल्या भारतीय प्रेक्षकांनी हा कंटेट अगदी हसत हसत स्विकारला. मागणी वाढली की पुरवठा वाढतो हे अर्थशास्त्रीय सूत्र इथेही लागू पडले आणि भारतातील वेब सिरिजची संख्या वाढू लागली. कोविड लॉकडाऊनच्या अपरिहार्यतेने निर्मात्यांना आणखी एक पाऊल पुढे टाकणे भाग पडले आणि चित्रपटच थेट ओटीटीवर रिलीज होऊ लागले.

निर्मात्यांच्या दृष्टीने ओटीटी प्लॅटफॉर्म्सचे काही विशेष फायदे असतात. त्यातील एक अत्यंत महत्वाचा फायदा म्हणजे ओटीटी कलाकृतींना सेन्सॉरची कात्री लागत नाही. याचाच फायदा (गैरफायदा?) घेत वेब सिरीजच्या नॉर्मल कथानकाला हिंसाचार, शिव्या आणि इंटिमेट प्रसंगांचा तडका दिला जाऊ लागला. जणू काही हा हिट वेब सिरिजचा अलिखीत फॉर्म्युला तयार झाला. हे समीकरण ठसवण्यात सेक्रेड गेम्स, मिर्झापूर, पाताल लोक या वेब सिरिजचा मोठा वाटा आहे. हे समीकरण आता जवळपास एस्टॅब्लिश झाल्यातच जमा आहे. म्हणजे वेब सिरिजमध्ये शिव्या किंवा प्रौढ दृष्ये आली तर वावगं वाटत नाही. उलट नसतील तरंच आश्चर्य वटते. अशातच आता भारतीय कलाविश्वात समलैंगिकता आणि त्यातही प्रामुख्याने लेसबियन दृश्य दाखवण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.

१९९८ साली दिपा मेहतांचा फायर प्रदर्शित झाला. हा भारतातील पहिला लेसबियन चित्रपट. शबाना आझमी आणि नंदिता दास यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या या कलाकृतीने नावाप्रमाणेच आग लावली. आधी जनतेच्या मनात आग लागली आणि मग ही आग थेट चित्रपटाच्या पोस्टर्सपर्यंत पसरली. १९९८ ते २०२२ या चोविस वर्षांत भारतीय समाजमन खूप बदलले आहे. एकेकाळी भारतीय समाजात टॅबू मानल्या जाणाऱ्या समलैंगिकतेसारख्या गोष्टी आता हळू हळू स्विकारल्या जाऊ लागल्या आहेत. LGBTQIA समुहाला त्यांचे हक्क मिळू लागले आहेत. २०१८ साली सर्वोच्च न्यायालयाने भारतीय दंड संहितेचे कलम ३७७ असंविधानिक ठरवत या समुदायाला मोठा दिलासा दिला आहे. पण तरिही या समुदायाची सामाजिक स्वीकारार्हता वाढण्याची गरज आहे. त्यासाठी त्यांच्या प्रश्नांवर लिहीले जाणे, बोलले जाणे गरजेचे आहे. त्यावर प्रकाश टाकणाऱ्या कलाकृती निर्माण होणे गरजेचे आहे. यात दुमत नाहीच. पण असे असले तरि कोणत्याही कथानकात संबंध नसताना लेसबियन दृश्ये समाविष्ट का करावीत?

कथानकाची गरज, कथेची गरज, त्या कथेतले त्या गोष्टीचे महत्व या गोष्टी लक्षात घेत ही दृष्ये समाविष्ट करण्यात आली तर ठीक आहे. उदाहरणार्थ ॲमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेली ‘मॉडर्न लव्ह मुंबई’. या कलाकृतीत विविध प्रेम कहाण्या दाखवण्यात आल्या आहेत. यात एका गे कपलची कथासुद्धा आहे. प्रतिक गांधी आणि शेफ रणवीर ब्रार यांनी ही गे कपलची भूमिका केली आहे. हे कथानकाला धरून आहे. प्रेमकथांवर भाष्य करताना समलैंगिकत जोडप्याचे भावविश्व, त्यांच्या अडचणी या बाबींवर प्रकाश टाकला गेलाच पाहिजे. पण त्याचवेळी ॲमेझॉन प्राईमवरच प्रदर्शित झालेल्या ‘गिल्टी माईंड्स’ या सिरिजमधील एक लेसबियन दृष्य अनाकलनीय आहे. म्हणजे वकीली पेशा, विविध न्यायालयीन खटले, पिडीत आणि गुन्हेगार यांची मानसिकता, वकिलांची केस लढतानाची मानसिकता हे सगळं दाखवताना दिग्दर्शकाला तो लेसबियन सिन मधेच का घुसवावासा वाटला हा खरंच प्रश्न पडतो. बरं त्या दृष्याची संपूर्ण कथानकात काहीही समर्पकता नाही. हे फक्त एक प्रातिनिधीक उदाहरण आहे. अशी अनेक उदाहरणे आढळू शकतात जिथे संबंध नसताना ही अशी दृष्य दाखविण्यात आली आहेत.

अनेकदा या दृश्यांचा वापर या वेब सीरिजच्या प्रमोशन आणि पीआरसाठी वापरला जातो. उदाहरणार्थ झी फाईव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ब्लडी ब्रदर्स नावाची एक वेब सिरीज आहे. त्यात असेच एक लेसबियन चुंबन दृश्य आहे. झी फाईव्ह ओटीटीची इतर ऍप्लिकेशन्स किंवा वेबसाईटवर जाहिरात करताना जाणीवपूर्वक हे दृश्य दाखवले जाते. अशाचप्रकारे सीरिजच्या ट्रेलरमध्येही या दृश्यांचा खुबीने वापर केला जातो. म्हणजे जणू काही प्रेक्षक खेचण्यासाठीच ही अशी दृश्ये वापरता यावीत म्हणूनच ती चित्रित केली जातात का? असा प्रश्न पडतो. मग याला धरूनच बातम्या किंवा कथा माध्यमांमध्ये छापून आणल्या जातात. मुलाखती दिल्या जातात. ‘त्या सीनच्या वेळी अभिनेत्रीची मानसिकता काय होती’ इथपासून ते ‘घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या’ इथपर्यंत अनेक कथा छापून आणल्या जातात आणि वेब सीरिजच्या प्रचार, प्रसिद्धीत आपला वाटा ते पार पाडतात.

हे ही वाचा:

राज ठाकरेंच्या सभेला १३ अटी

लक्षद्वीपजवळ २१९ किलो हेरॉईन केले जप्त

केंद्र सरकारकडून देशवासियांना मोठा दिलासा

नवाब मलिकांचे दाऊदच्या टोळीशी थेट संबंध

या संपूर्ण कलाविश्वात आणखीन एक नवा ट्रेंड हळूहळू रुजू होत आहे. तो म्हणजे विषमलिंगी असलेली स्त्री किंवा स्त्रिया या समलिंगी होताना दाखवल्या जातात. हॉटस्टारवर प्रदर्शित झालेल्या सिटी ऑफ ड्रीम्समध्ये अभिनेत्री प्रिया बापट हिच्या लेसबियन चुंबनाची चांगलीच चर्चा झाली होती. त्यातही तिचे अशाच प्रकारचे परिवर्तन दाखवण्यात आले आहे. हॉटस्टारच्याच ह्युमन या सिरीजमध्येही मुख्य नायिका असणाऱ्या शेफाली शहा आणि कीर्ती कुल्हारी या दोन विषमलिंगी स्त्रिया समलिंगी चुंबन करताना दाखवण्यात आल्या आहेत. माधुरी दीक्षितची ‘मजा माँ’ नावाचा एक चित्रपट येऊ घातला आहे. या चित्रपटात माधुरी दीक्षित एका मुलाच्या आईची भूमिका साकारणार आहे. पण असे असले तरीही ती यात समलिंगी दाखवण्यात आल्याची चर्चा आहे.

हे अशाप्रकारचे ट्रेंड्स खूप घातक आहेत. म्हणजे या लेखकांना किंवा दिग्दर्शकांना नेमका काय संदेश द्यायचा असतो? एखादी महिला किंवा पुरुष नैसर्गिकरित्या समलैंगिक असेल तर ते समजूही शकतो. पण असे ओढून ताणून करण्याची गरज काय? कलाकृतींमध्ये वाढत जाणारा हा लेसबियन एलिमेंट हा गरज आहे? अपरिहार्यता आहे? की पब्लिसिटी स्ट्रॅटेजी आहे?

उद्देश काहीही असला तरीदेखील यातून समाजात जाणारा संदेश खूप चुकीचा आहे. म्हणजे LGBTQIA समूहाला प्रस्थापित करताना लोकांमध्ये नकळत किंवा जाणीवपूर्वक त्याबाबतचे आकर्षण निर्माण केले जात आहे. सध्या लहान मुलांकडे स्मार्टफोन असणे ही अतिशय सामान्य बाब झाली आहे. इंटरनेट नावाच्या मायाजालावर ते रोज विहार करत असतात. अशातच त्यांच्या समोर अशा बाबी आल्याने यातून त्यांच्या मनात निर्माण होणाऱ्या शंका, कुतूहल यातून ही मुले त्या वाटेला गेली तर याला जबाबदार कोण? यातून खरंच समलिंगी समुदायाला समाजात हक्काचे स्थान मिळवून द्यायला मदत होईल की त्यांच्याबद्दल समाजात कटुता वाढेल? यातून ही दरी खरंच कमी होईल की हे अंतर अधिक वाढेल? या मुद्द्यांचा विचार होणे गरजेचे आहे.

आज देशात असे अनेक प्रयोग झाले आहेत ज्यात फक्त दर्जेदार कथानकाच्या आधारावर यश मिळाले आहे. फॅमिली मॅन, स्पेशल ऑप्स, पंचायत इथपासून ते बाहुबली, आरआरआर, केजीएफ, काश्मीर फाईल्सपर्यंत अनेक नावे घेता येतील. या प्रत्येक कलाकृतीचा विषय वेगळा, दिग्दर्शक वेगळे, अभिनेते वेगळे पण यात कुठेही ओढूनताणून समलैंगिक कंटेंट सोडाच पण साधे इंटिमेट दृश्येही दाखवण्यात आली नव्हती. तरीही लोकांनी त्यांना उचलून धरले. कारण त्या कथेत आणि कथा सांगणाऱ्यांमध्ये तेवढा दम होता.

तेव्हा गरज नसताना लंगड्या कथानकाला इंटिमसीच्या आणि लेसबियन दृश्यांच्या कुबड्या देणाऱ्या लेखक, दिग्दर्शकांनी याचा विचार करण्याची गरज आहे आणि प्रेक्षकांनीही विचार करण्याची गरज आहे की लेसबियन कंटेंटचा हा अतिरेकी मारा किती सहन करायचा? तर दुसरीकडे या विषयात जबाबदारी आणि उत्तरदायित्व निश्चित होण्याचीही गरज आहे. आज वाढत जाणारे हे ओटीटीचे विश्व, त्यावर येणारा कंटेंट आणि त्याचा सांभाव्य धोका या सर्व बाबी विचारात घेत ओटीटीला सेन्सॉरच्या कक्षेत आणण्याची आवश्यकता वाटू लागली आहे. वेळीच हे केले नाही तर याचे गंभीर परिणाम आपल्याला समाज आणि देश म्हणून नक्कीच भोगायला लागू शकतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा