देशभरात अंडी आणि चिकनच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली असून त्यामागे पोल्ट्री उद्योगाचा वाढलेला उत्पादन खर्च हे प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. कोंबड्यांच्या खाद्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या मका, सोयाबीन खळी आणि आयातीत आवश्यक खाद्यघटकांच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्याने पोल्ट्री उत्पादकांचा खर्च झपाट्याने वाढला आहे. त्याचा थेट परिणाम किरकोळ बाजारातील अंडी आणि चिकनच्या दरांवर झाला असून अनेक शहरांमध्ये एका अंड्याची किंमत ८.५० ते ९ रुपयांपर्यंत पोहोचली आहे, तर चिकनचा किरकोळ दर प्रतिकिलो २५० ते २६० रुपयांपर्यंत वाढला आहे.
पोल्ट्री उद्योगातील तज्ज्ञांच्या मते, कोंबड्यांच्या खाद्याचा सर्वात मोठा घटक म्हणजे मका असून तो एकूण खाद्यामधील सुमारे ५५ टक्के हिस्सा व्यापतो. मार्चनंतर मक्याच्या किमतींमध्ये ३५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्याचबरोबर खाद्यातील प्रथिनांचा प्रमुख स्रोत असलेल्या सोयाबीन खळीचा वाटा सुमारे २२ टक्के आहे आणि तिच्या किमतींमध्ये तब्बल ६४ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. याशिवाय खाद्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या आवश्यक अमिनो अॅसिडच्या किमती मार्चपासून साडेतीनपट वाढल्याने उत्पादन खर्च आणखी वाढला आहे.
हे ही वाचा:
मोदींच्या आवाहनालाही छेद! सोन्याचे दर घसरताच खरेदी पुन्हा वाढली
ग्रूमिंग गँगच्या दोषीला स्वीकारण्यास नकार, तरी पाकवर कोट्यवधींची मेहरबानी
महान अष्टपैलू क्रिकेटपटू सर गारफिल्ड सोबर्स यांचे निधन
लॉर्ड्समधील सामना रोहितचा अखेरचा नाही!
मक्याच्या वाढत्या मागणीमागे पोल्ट्री उद्योगाबरोबरच इथेनॉल उत्पादन क्षेत्राचाही मोठा वाटा आहे. इथेनॉल निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात मक्याची खरेदी होत असल्याने बाजारात उपलब्धता कमी झाली आणि किमती वाढल्या. दुसरीकडे, गेल्या वर्षी सोयाबीन उत्पादनात सुमारे २० टक्के घट झाल्याने सोयाबीन खळीचा पुरवठा कमी झाला आहे. यंदाच्या अनियमित मान्सूनमुळे खरीप आणि रब्बी हंगामातील उत्पादनाबाबतही अनिश्चितता निर्माण झाली असून त्यामुळे खाद्यधान्यांच्या किमती आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
याशिवाय पश्चिम आशियातील संघर्षाचाही अप्रत्यक्ष परिणाम पोल्ट्री उद्योगावर झाला आहे. काही महत्त्वाचे खाद्यघटक आयातीवर अवलंबून असल्याने पुरवठा साखळी विस्कळीत झाली आणि आयात खर्च वाढला. त्यामुळे पोल्ट्री उत्पादकांना वाढीव खर्चाचा सामना करावा लागत आहे. वाहतूक, मजुरी, पाणीपुरवठा आणि फार्म देखभालीचा खर्चही वाढल्याने एकूण उत्पादन खर्चात मोठी भर पडली आहे.
उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेचाही चिकन उत्पादनावर मोठा परिणाम झाला. उच्च तापमानामुळे ब्रॉयलर कोंबड्यांची वाढ आणि उत्पादन घटले, तसेच उष्णतेच्या ताणामुळे पक्ष्यांची उत्पादकता कमी झाली. परिणामी बाजारात चिकनचा पुरवठा कमी झाला आणि किमती वाढल्या. अनेक पोल्ट्री फार्मना पाण्याची टंचाई आणि अतिरिक्त व्यवस्थापन खर्चाचाही सामना करावा लागल्याने उत्पादन खर्च आणखी वाढल्याचे उद्योग संघटनांनी सांगितले आहे.
नॅशनल एग कोऑर्डिनेशन कमिटी (NECC) च्या आकडेवारीनुसार, हैदराबादमध्ये अंड्याचा एक्स-फार्म दर एका महिन्यात सुमारे १५ टक्क्यांनी वाढला असून गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास ४० टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे. पोल्ट्री उत्पादकांचे म्हणणे आहे की, शेतकऱ्यांना उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी किमान सात रुपये प्रति अंडा इतका एक्स-फार्म दर आवश्यक आहे.
दरम्यान, जुलैच्या अखेरीस काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता उद्योगाने व्यक्त केली आहे. उत्तर भारतात श्रावण महिन्यात धार्मिक कारणांमुळे अंडी आणि मांसाचा वापर कमी होतो. त्यामुळे मागणी घटल्यास किमतींमध्ये काहीशी नरमाई येऊ शकते. मात्र मान्सून अपेक्षेप्रमाणे झाला नाही आणि मका व सोयाबीनच्या किमती उच्च पातळीवरच राहिल्या, तर आगामी महिन्यांत अंडी आणि चिकनचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता पोल्ट्री उद्योगाने व्यक्त केली आहे.







