प्रशांत कारुळकर
जगभरात योग विद्येचा प्रसार करणारा एक भगवाधारी व्यवसायात उडी घेतो. त्या उद्योगाचा चेहरा बनतो. बाजाराची नस ओळखत, अल्पावधीत देशात एका मोठ्या ब्रँडची निर्मिती करतो. अनेक वर्षे बाजारात तळ ठोकून बसलेल्या, बाजारात मक्तेदारी असलेल्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांना धडकी भरावी अशी स्पर्धा निर्माण करतो. हा प्रवास थक्क करणारा आहे. देशात स्वदेशी अर्थक्रांती घडवणाऱ्या त्या ब्रँडचे नाव पातंजली आणि ती व्यक्ति म्हणजे रामदेव बाबा, हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही.

भारताच्या उद्योजकीय इतिहासात जेव्हा योगगुरु एखादा FMCG बाजारावर हुकूमत गाजवतो, तेव्हा ही घटना केवळ व्यापारी यश नसते, तर ती स्वदेशी आणि सांस्कृतिक क्रांती असते. बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखाली उभा राहिलेला पातंजली उद्योगसमूह ही निर्विवादपणे एक क्रांती आहे – जिचा पाया आहे आयुर्वेद, स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेवर.
आमचे एक दिल्लीकर उद्योजक मित्र आदेश त्यागी हे बाबाजींचे शिष्य. त्यांच्यामुळे रामदेव बाबांचा अनुग्रह माझ्यावरही झाला. मुंबईत, दिल्लीत नंतर भेटी होत गेल्या. बाबाजींशी जवळीक वाढत गेली. राहणी एखाद्या संन्याशासारखी असली तरी माणूस अत्यंत तल्लख. सतत कशात तरी गुंतलेला. मराठीत ज्याला उद्योगी म्हणतात, तसा. एखादे काम सुरू करायचे आणि त्याला भव्य-दिव्य असे रुप मिळेपर्यंत राबायचे हा त्यांचा स्वभाव. योगविद्या त्यांनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली तेच आय़ुर्वेदाबाबतही म्हणता येईल.
पातंजलिची स्थापना: सुरुवातीचा प्रवास
पातंजली आयुर्वेद लिमिटेडची स्थापना ५ जानेवारी २००६ रोजी हरिद्वार, उत्तराखंड येथे झाली. आयुर्वेद आणि स्वदेशी उत्पादनांना चांगले दिवस आणणे हे कंपनीचे संस्थापक बाबा रामदेव व आचार्य बालकृष्ण यांचे प्रमुख उद्दिष्ट होते.
सुरुवातीला पातंजलि फक्त आयुर्वेदिक औषधे आणि घरगुती वापराच्या मर्यादित वस्तू बनवत होती. परंतु लोकांचा विश्वास आणि रामदेव बाबांची लोकप्रियता यामुळे व्यवसायाचा झपाट्याने विस्तार होत गेला. लोक स्वदेशी उत्पादनांच्या प्रेमात पडले. जिथे तिथे पातंजलीचे स्टोअर्स दिसू लागले. आज एफएमसीजी उत्पादनांच्या क्षेत्रात पातंजली मांड ठोकून उभी आहे.
आयुर्वेदिक गोळ्या, सिरप, लेप, वटी, चूर्णे. अन्नपदार्थात आटा, बिस्किट, तूप, तेल, मसाले, चहा, नूडल्स. सौंदर्यप्रसाधनात फेसवॉश, शाम्पू, साबण, टूथपेस्ट (दंतकांती). दैनंदिन वापराच्या वस्तूंमध्ये डिटर्जंट, डिश वॉश, फिनाईल, घरगुती क्लिनर. वस्त्र निर्मितीच्या क्षेत्रातही त्यांनी २०१८ पासून मुसंडी मारली. हा प्रवास वेगवान आहे, थक्क करणारा आहे. वितरणासाठी पातंजलीने इतके मोठे जाळे इतक्या कमी काळात कसे उभे केले, हा तर अभ्यासाचा विषय आहे. दहा हजारांच्यावर पातंजली चिकित्सालये, ५२ डिस्ट्रीब्यूशन सेंटर्स, १ लाखाहून अधिक रिटेल स्टोअर्स आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म (Amazon, Flipkart, 1mg इ.) द्वारे पातंजलीच्या उत्पादनांची दणक्यात विक्री सुरू आहे.
हे ही वाचा:
पोलीस उपयुक्ताच्या हत्येचा प्रयत्न, रिक्षा चालकाला अटक
इस्रायलची मुत्सदी, जगभरातले दूतावास करणार बंद!
कीवीची कमाल! आरोग्याची खास काळजी घेणारा फळ
डाव्या विचारधारेतील आणखी एक ‘माफीवीर’
कंपनीची वाढती उलाढाल
टर्नओव्हरचे आकडे वर्षागणिक फुगत चालले आहेत. २०२३-२४ या आर्थिक वर्षांत पातंजली आयुर्वेद लि.ची उलाढाल ९३३५.३२ कोटी होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत ती २३.१५ टक्क्यांनी वाढली होती. पातंजली फूड्सची उलाढाल ३१९६१ कोटी रुपये होती. येत्या पाच वर्षांत पातंजली समुहाने एक लाख कोटींचे लक्ष्य ठेवले आहे.
पातंजलीच्या यशाचा आलेख चढता आहे. त्याची अनेक कारणे आहेत. बाबा रामदेव हे स्वत: एक जागतिक ब्रँड आहेत. योगगुरू म्हणून त्यांच्या प्रतिमेचा पातंजलीच्या वाढीसाठी प्रचंड उपयोग झाला. फिल्मी तारे असो, खेळाडू असो वा राजकीय नेते सगळेच त्यांच्या प्रेमात आहेत. मात्र आपल्या उत्पादनांची जाहीर करताना ना ते कधी अभिनेत्यांची मदत घेतात, न खेळाडूंची. ते स्वत:च ही जाहीरात करतात. कधी कोणासोबत धावण्याची स्पर्धा लावून, तर कधी जोर बैठकांचा चॅलेंज देऊन.
गेल्या काही वर्षात देशात राष्ट्रवादाची भावना प्रबळ झालेली दिसते. त्यामुळे स्वदेशीच्या वापरालाल बळ आलेले आहे. ही बाब पांतजलीच्या पथ्यावर पडली आहे. सुरूवाती पासून घाऊक उत्पादनाचे सूत्र पातंजलीने ठेवले. त्यासाठी जो कच्चा माल आहे तो थेट उत्पादकांकडून उचलण्यात येतो. मधली साखळी गाळल्यामुळे किंमतही किफायतशीर असते, कंपनीला नफाही भरभक्कम मिळतो. ग्रामीण भारत हा सुरूवातीपासून पातंजलीचा फोकस राहीला. तिथे शिरकाव करणे सोपे होते. बस्तान ठोकणेही सोपे होते. ग्रामीण भारता फिरताना तुम्हाला दुकानात दंतकांती किंवा पातंजलीची बिस्कीटे हमखास दिसतात.
हरिद्वारस्थित दिव्य फार्मसीत आयुर्वेदिक औषधनिर्मितीचा प्रमुख विभाग असून तिथे १०००+ औषधे तयार होतात.
रुचि सोया ही खाद्य तेल क्षेत्रातील मोठी कंपनी होती, जी बाबा रामदेव यांच्या पतंजली ग्रुपने २०१९ मध्ये विकत घेतली. २०२३ मध्ये रुचि सोया चे नाव बदलून पतंजली फूड्स लिमिटेड ठेवण्यात आले. आज या कंपनीचा टर्नओव्हर ३० हजार कोटींहून अधिक आहे आणि ती NSE/BSE वर लिस्टेड आहे. उत्तराखंड, नागपूर, तेलंगणा इ. राज्यांमध्ये पातंजलीचे फूड पार्क आहेत.
आज पातंजलीची स्पर्धा HUL, Dabur, Colgate, Nestle यासारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी आहे. एक ब्रँड अचानक उसळी मारून या कंपन्यांच्या समोर उभा ठाकल्यामुळे त्यांचेही दात आंबट झाले आहेत. त्यातून पातंजलीला दाबण्याचा प्रयत्न अनेकदा झाला. काही वेळा आयुर्वेदिक उत्पादनांची गुणवत्ता व वैज्ञानिक प्रमाणपत्रांवरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. कंपनीने R&D युनिट्स व प्रमाणित ISO प्रयोगशाळा सुरू करून त्याला चोख उत्तर दिले.
पतंजलीने अनेक वेळा कमी मार्जिनमध्ये वस्तू विकल्या, ज्यामुळे बाजारात मजबूत पकड निर्माण झाली, परंतु नफा मर्यादित राहिला. बाबा रामदेव यांनी पतंजलीच्या माध्यमातून एक वेगळे बिझनेस मॉडेल भारताला दिले, जिथे अध्यात्म, आरोग्य, राष्ट्रवाद आणि व्यवसाय एकत्र नांदतात. त्यांनी फक्त एक ब्रँड नाही उभा केला, तर ‘स्वदेशी अर्थव्यवस्था’ या कल्पनेला पुन्हा प्रतिष्ठा दिली. आज पतंजली केवळ उत्पादक कंपनी नसून, ती जनआंदोलन, संस्कृती, आणि उद्योजकीय चळवळ बनली आहे. ही वाटचाल अनेक उभरत्या भारतीय कंपन्यांसाठी प्रेरणादायी आहे. एक भारतीय उद्योजक म्हणून जेव्हा मी पातंजलीकडे पाहातो, तेव्हा त्यात व्यक्तिगतरित्या मला बरेच काही शिकायला मिळते. बाबाजींशी माझी मोकळी ढाकळी चर्चा अनेकदा झाली आहे. त्यांच्या जवळ बसून यशाचे काही मंत्र शिकण्याची इच्छा आहे. पातंजलीचा हा वटवृक्ष असाच बहरत राहो, या आमच्या मनापासून शुभेच्छा आहेत.







