जगप्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क यांनी आर्थिक क्षेत्रात इतिहास घडवला आहे. एलन मस्क हे आता जगातील पहिले असे व्यक्ती ठरले आहेत ज्यांची एकूण संपत्ती ८०० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक झाली आहे. भारतीय चलनात ही संपत्ती सुमारे ७२ लाख कोटी रुपयांहून अधिक आहे.
एलन मस्क यांच्या संपत्तीत ही मोठी वाढ त्यांच्या दोन महत्त्वाच्या कंपन्यांमधील मोठ्या करारामुळे झाली आहे. अंतराळ संशोधन क्षेत्रातील त्यांची कंपनी स्पेसएक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील कंपनी एक्सएआय यांचा मोठा करार झाला आहे. या करारानंतर या दोन्ही कंपन्या एकत्र आल्या असून नव्या कंपनीचे एकूण मूल्य सुमारे १ ट्रिलियन २५० अब्ज डॉलर्स इतके झाले आहे.
हे ही वाचा:
डॉलर कमकुवत, सोनं मजबूत
बलूचिस्तानवरुन पाकिस्तानचा ताबा सुटतोय?
मुंबई पुणे संथगती मार्ग; टँकर उलटल्याने १८ तास वाहतूक रखडली
क्रिकेटचा हा बदल उशिरा आला; नाहीतर वर्ल्डकप हातचा गेला असता!
या नव्या एकत्रित कंपनीत एलन मस्क यांची सुमारे ४३ टक्के हिस्सेदारी आहे. केवळ या हिस्सेदारीची किंमतच अंदाजे ५४० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे त्यांच्या एकूण संपत्तीत मोठी भर पडली आहे.
याशिवाय, एलन मस्क यांची इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी टेस्ला मध्येही मोठी हिस्सेदारी आहे. टेस्लामधील त्यांचे शेअर्स आणि शेअर पर्याय (स्टॉक ऑप्शन्स) मिळून त्यांची किंमतही शेकडो अब्ज डॉलर्समध्ये आहे.
गेल्या काही काळात एलन मस्क यांच्या संपत्तीत सातत्याने मोठी वाढ होताना दिसत आहे. २०२५ साली त्यांनी ५०० अब्ज डॉलर्सचा टप्पा पार केला. त्यानंतर काही महिन्यांतच त्यांची संपत्ती ६०० अब्ज आणि ७०० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली.
आता २०२६ साली त्यांनी थेट ८०० अब्ज डॉलर्सचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे.
तज्ज्ञांच्या मते, भविष्यात स्पेसएक्स कंपनी शेअर बाजारात उतरल्यास एलन मस्क यांच्या संपत्तीत आणखी मोठी वाढ होऊ शकते. त्यामुळे येत्या काळात ते १ ट्रिलियन डॉलर्सची संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती ठरतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
एकूणच, अंतराळ संशोधन, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रातील यशस्वी गुंतवणुकीमुळे एलन मस्क यांनी संपत्तीच्या बाबतीत एक नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे.







