मुंबई महानगर प्रदेशातील महत्त्वाकांक्षी कांजूरमार्ग-घणसोली-बदलापूर मेट्रो-१४ प्रकल्पाला पुन्हा एकदा मोठा विलंब होण्याची चिन्हे दिसत आहेत. या प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालात (डीपीआर) गंभीर त्रुटी आढळल्याने संपूर्ण प्रकल्प पुन्हा नव्याने तपासला जाणार आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईने डीपीआरचे परीक्षण करताना अनेक तांत्रिक, आर्थिक आणि नियोजनाशी संबंधित त्रुटी निदर्शनास आणून दिल्या असून, त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) या प्रकल्पासाठी नव्याने सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू करावी लागली आहे.
सुमारे ४३.६९ किलोमीटर लांबीचा प्रस्तावित मेट्रो-१४ मार्ग कांजूरमार्ग, घणसोली, महापे, शिळफाटा, निळजे, अंबरनाथ आणि बदलापूर या वेगाने विकसित होत असलेल्या भागांना जोडणार आहे. हा मार्ग मध्य रेल्वेवरील वाढता प्रवासी भार कमी करण्यासोबतच पूर्व उपनगर आणि विस्तारित मुंबई महानगर प्रदेशाला जलद आणि पर्यायी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
हे ही वाचा:
खासदार संजय दिना पाटलांकडून पत्रकारांना शिवीगाळ
चीनच्या भूमीत भारताचा सुवर्ण पराक्रम! महिला रिले संघाचे यश
RBI चा निर्णय; टाटा सन्सचा IPO चा मार्ग मोकळा
मात्र, आयआयटी मुंबईच्या परीक्षणात डीपीआरमध्ये आर्थिक व्यवहार्यता, प्रवासी संख्येचा अंदाज, अभियांत्रिकी आराखडा, पर्यावरणीय परिणाम, भौगोलिक अडचणी तसेच अंमलबजावणीच्या पद्धतीबाबत अनेक त्रुटी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे एमएमआरडीए आता नव्या सल्लागारामार्फत संपूर्ण डीपीआरची फेरतपासणी करून आवश्यक सुधारणा करणार आहे. यामध्ये खर्चाचा पुनर्विचार, तांत्रिक रचना, पर्यावरणीय मंजुरी आणि निधी उभारणीची पद्धत यांचाही सखोल अभ्यास केला जाणार आहे.
यापूर्वी हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर राबविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, खासगी कंपन्यांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने तो प्रस्ताव मागे घ्यावा लागला. त्यानंतर प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी नव्या आर्थिक मॉडेलचा विचार सुरू करण्यात आला असून, त्यासाठी सुधारित डीपीआर तयार करण्यावर भर दिला जात आहे.
मेट्रो-१४ हा मुंबई महानगर प्रदेशातील सर्वात महत्त्वाच्या भावी मेट्रो मार्गांपैकी एक मानला जात असला तरी, डीपीआरमधील त्रुटींमुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यास आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे बदलापूर, अंबरनाथ, घणसोली आणि कांजूरमार्ग परिसरातील लाखो प्रवाशांना या मेट्रोची प्रतीक्षा आणखी वाढणार आहे. मात्र, तज्ज्ञांचे मत आहे की घाईघाईने काम सुरू करण्यापेक्षा अचूक आणि सर्वंकष डीपीआर तयार करूनच प्रकल्पाची अंमलबजावणी झाल्यास भविष्यातील अडचणी टाळता येतील आणि प्रकल्प अधिक परिणामकारक ठरेल.







