इराकमधील टँकर हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ

पश्चिम आशियातील तणावामुळे जागतिक तेलपुरवठ्याबाबत भीती

इराकमधील टँकर हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ

पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये पुन्हा एकदा मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. इराकच्या पाण्यात दोन तेलवाहू टँकरवर झालेल्या हल्ल्यानंतर जागतिक बाजारात तेलपुरवठा खंडित होण्याची भीती निर्माण झाली असून त्याचा थेट परिणाम तेलाच्या दरांवर दिसून आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इराकजवळील समुद्री मार्गावर दोन इंधनवाहू जहाजांवर स्फोटकांनी भरलेल्या नौकांद्वारे हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर दोन्ही जहाजांना आग लागली आणि काही कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या हल्ल्यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा:
भारताची रशियन तेल आयात ५०% ने वाढली

फारूक अब्दुल्लांवर गोळी झाडण्याचा प्रयत्न

अराजकाच्या प्रतीक्षेतला कावळा…

होर्मुझ सामुद्रधुनी संकटाच्या पार्श्वभूमीवर IEA चा ऐतिहासिक निर्णय

या घटनेनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडच्या किंमतीत मोठी वाढ झाली. ब्रेंट क्रूड सुमारे ९७.६७ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले, तर अमेरिकेचे WTI क्रूड ९२.३६ डॉलर प्रति बॅरलपर्यंत वाढले. तेलाच्या दरांमध्ये एका दिवसात जवळपास ५ ते ७ टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली गेली.

विश्लेषकांच्या मते, हा हल्ला केवळ एका जहाजावर झालेला अपघात नसून पश्चिम आशियातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचे द्योतक आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे आधीच या भागातील तेलपुरवठा आणि जहाजवाहतुकीवर मोठा ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे बाजारातील गुंतवणूकदार आणि व्यापारी भविष्यातील पुरवठ्याबाबत अधिक सावध झाले आहेत.

याच पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था (IEA) ने जगभरातील तेलसाठ्यातून तब्बल ४० कोटी बॅरल तेल सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा उद्देश जागतिक बाजारातील अस्थिरता कमी करणे हा असला तरी, सध्याच्या संघर्षामुळे हा उपाय केवळ तात्पुरता दिलासा देऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. पश्चिम आशियातील हॉर्मुझ सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाची तेल वाहतूक मार्गांपैकी एक मानली जाते. जगातील जवळपास २० टक्के तेलपुरवठा या मार्गातून होतो, त्यामुळे येथे कोणताही तणाव निर्माण झाल्यास जागतिक बाजारात तेलाच्या किंमती झपाट्याने वाढतात.

विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांत तेलाच्या किंमतींमध्ये मोठी चढउतार पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच कच्च्या तेलाने १०० डॉलर प्रति बॅरलचा टप्पा पार केला होता. त्यामुळे ऊर्जा बाजारात अस्थिरता कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तज्ज्ञांच्या मते, जर पश्चिम आशियातील संघर्ष आणखी तीव्र झाला किंवा तेलवाहतुकीचे मार्ग बाधित झाले, तर जागतिक ऊर्जा बाजारासोबतच महागाई आणि आर्थिक वाढीवरही त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. विशेषतः भारत, चीन आणि जपानसारख्या तेल आयात करणाऱ्या देशांसाठी ही परिस्थिती मोठे आव्हान ठरू शकते.

Exit mobile version