भारतामध्ये पाणी ही मूलभूत गरज असली तरी आता श्रीमंत वर्गासाठी ते लक्झरी आणि प्रतिष्ठेचे प्रतीक बनत चालले आहे. अनेक शहरांमध्ये नळाचे पाणी थेट पिण्यायोग्य नसल्यामुळे, सुरक्षित आणि दर्जेदार पाण्यासाठी श्रीमंत लोक महागड्या प्रीमियम पाण्याकडे वळत आहेत. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था Reuters च्या अहवालानुसार, भारतात प्रीमियम मिनरल वॉटरचा बाजार वेगाने विस्तारत आहे.
सध्या भारतातील प्रीमियम पाण्याचा बाजार सुमारे ४०० दशलक्ष डॉलर (अंदाजे ३३ हजार कोटी रुपये) इतका मोठा झाला आहे. हा बाजार दरवर्षी सुमारे २४ टक्के दराने वाढत आहे. जगातील वेगाने वाढणाऱ्या प्रीमियम वॉटर बाजारांमध्ये भारताचा समावेश होत आहे.
हे ही वाचा:
कर कपात, ‘कार’ वेगात
Su-57 कराराची रशियासोबतची चर्चा निर्णायक टप्प्यावर!
उद्योगपतींनी भारत- अमेरिका व्यापार कराराचे केले स्वागत! काय दिल्या प्रतिक्रिया?
मथुरेतल्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाने मुलांना लावले नमाज पढायला!
मुंबई, दिल्ली आणि बेंगळुरू यांसारख्या महानगरांमध्ये आता वॉटर टेस्टिंग म्हणजेच पाणी चाखण्याचे कार्यक्रमही आयोजित केले जात आहेत. जसे वाईन किंवा कॉफी टेस्टिंग होते, तसेच वेगवेगळ्या ब्रँडच्या पाण्यांची तुलना केली जाते. या पाण्यांमधील खनिजांचे प्रमाण, चव आणि कार्बोनेशन यामध्ये फरक असतो, असे तज्ज्ञ सांगतात.
भारतामध्ये स्वच्छ पाण्याची समस्या अजूनही गंभीर आहे. उपलब्ध माहितीनुसार देशातील सुमारे ७० टक्के भूजल प्रदूषित आहे. अनेक भागांमध्ये नळाचे पाणी थेट पिण्यास सुरक्षित नाही. त्यामुळे ज्यांची आर्थिक क्षमता आहे, ते लोक बाटलीबंद आणि प्रीमियम पाण्यावर अवलंबून राहतात.
किमतींच्या बाबतीत प्रीमियम पाणी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. भारतीय प्रीमियम मिनरल वॉटरची किंमत साधारणपणे ८० ते १०० रुपये प्रति लिटर इतकी आहे. तर आयात केलेल्या पाण्याची किंमत ३०० रुपये प्रति लिटर किंवा त्याहून अधिक असू शकते. याउलट, स्वस्त पाण्याच्या पिशव्या अजूनही २० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. म्हणजेच प्रीमियम पाणी हे सर्वसामान्यांसाठी नव्हे, तर मुख्यतः उच्च उत्पन्न गटापुरते मर्यादित आहे.
या वाढत्या मागणीचा फायदा कंपन्यांना होत आहे. मोठ्या कंपन्या आता प्रीमियम पाण्याच्या विभागात अधिक गुंतवणूक करत आहेत. काही खास रिटेल स्टोअर्समध्ये गेल्या एका वर्षात प्रीमियम पाण्याच्या विक्रीत तीनपट वाढ नोंदवली गेली आहे.
मात्र, एका बाजूला महागड्या पाण्याची वाढती विक्री सुरू असताना, दुसऱ्या बाजूला देशातील कोट्यवधी लोकांना अजूनही सुरक्षित पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे पाणी हे लक्झरी बनणे ही बाब केवळ जीवनशैलीतील बदल दाखवत नाही, तर सामाजिक आणि आर्थिक विषमतेचे वास्तवही अधोरेखित करते, असे तज्ज्ञांचे मत आहे.







