दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि विद्यार्थी आंदोलनासंदर्भात दिल्ली पोलिसांनी धक्कादायक दावा केला आहे. पोलिसांच्या अंतर्गत तपासानुसार, आंदोलनस्थळी ओळख पटलेल्या ९८९ व्यक्तींवर यापूर्वी गुन्हे दाखल असून, त्यापैकी १०१ जणांवर खुनाचे, तर ६१ जणांवर बलात्काराचे गुन्हे नोंद असल्याचा दावा करण्यात आला आहे.
दिल्ली पोलिसांनी चेहरा ओळख प्रणाली (Face Recognition System – FRS), सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक साधनांच्या मदतीने आंदोलनात सहभागी झालेल्या व्यक्तींची पडताळणी केली. या तपासात आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या अनेक व्यक्तींविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असल्याचे समोर आल्याचा पोलिसांचा दावा आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १०१ जणांवर खुनाचे, ६१ जणांवर बलात्काराचे, तर मोठ्या संख्येने व्यक्तींवर दरोडा, लूटमार, अपहरण, शस्त्रास्त्र कायदा, अमली पदार्थविरोधी कायदा (NDPS) आणि महिलांवरील अत्याचाराशी संबंधित गुन्हे दाखल आहेत. यापैकी काही जणांवर एकापेक्षा अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.
दिल्ली पोलिसांच्या मते, या तपासाचा उद्देश आंदोलनात सहभागी झालेल्या व्यक्तींची पार्श्वभूमी तपासणे आणि २० जुलै रोजी संसद मोर्चादरम्यान झालेल्या हिंसाचारात त्यांचा सहभाग होता का, याचा शोध घेणे हा आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून सीसीटीव्ही, व्हिडिओ फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जात आहे.
हे ही वाचा:
विरोधकांच्या गदारोळात ‘सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक २०२६’ संसदेत सादर
जपानमध्ये ७.१ रिश्टर तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा इशारा
बेबी पावडर वादावर जॉन्सन अँड जॉन्सनचा ५.५ अब्ज डॉलरच्या तडजोडीचा प्रस्ताव
हॉटेलातील पार्टीवरून वांगचुक यांनी कोक्रॉचना सुनावले
दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या या दाव्यामुळे आंदोलनाच्या स्वरूपावर आणि त्यामध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींच्या पार्श्वभूमीवर नवी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, पोलिसांनी दिलेली आकडेवारी ही तपासादरम्यान समोर आलेल्या नोंदींवर आधारित असल्याचे सांगितले असून, संबंधित प्रकरणांबाबत तपास सुरू असल्याचेही स्पष्ट केले आहे.







