अहिल्यानगरच्या कोटला गावातील मुल्सिम समाजावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना समोर आली होती. या घटनेचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले आहेत. धार्मिक भावना दुखवल्याचा आरोप करत अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजी नगर इथल्या मार्गावरती मुस्लीम समाजाने रास्तारोको आंदोलन केलं होतं. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ३९ जणांना ताब्यात घेतले आहे तर २०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दगडफेकीत सात पोलीस जखमी झाले आहेत.
खरेतर, अहिल्यानगर शहरात दुर्गामाता दौडच्या स्वागतासाठी रस्त्यावर ‘आय लव्ह मोहम्मद’ नामक रांगोळी काढून त्यावरून दुर्गा माता दौड काढण्याचा प्रयत्न केला गेला होता. माळीवाडा परिसरातील बारा तोटी कारंजा येथे ही घटना घडली. मुस्लीम धर्मगुरुचे नाव रस्त्यावर लिहिल्यामुळे किंवा तशी रांगोळी काढल्यामुळे मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे त्यांनी रास्तारोको आंदोलन केलं. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणावर माहिती देताना पोलीस म्हणाले, काल (२९ सप्टेंबर) सकाळी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रोडवरती रांगोळी काढण्यात आली होती. या रांगोळीवर मुस्लीम समाजाच्या लोकांनी आक्षेप घेतला. या प्रकरणी गुन्हा दाखल करत एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, काही मुस्लीम लोक एकत्रित जमले आणि त्यांनी रास्तारोको आंदोलन केलं. यानंतर पोलिसांनी त्यांना रस्ता रिकामा करण्याचे आवाहन केले. परंतु, त्यांनी माघार घेतली नाही उलट पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला आणि अनेकांना अटक केले. या प्रकरणात पुढील कारवाई सुरु आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हे ही वाचा :
सेबीने फ्युचर अँड ऑप्शन्स ट्रेडिंगसाठी नियम कडक
तालिबानचा निर्णय: इंटरनेट सेवा अनिश्चित काळासाठी बंद!
अंधश्रद्धेतून मित्राची धारदार शस्त्राने हत्या
भुसावळमध्ये कॉनव्हेंट शाळेत हिंदू मुलांना हिजाब, स्कार्फ घालून मशिदीची सहल कशाला?
या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. अलीकडच्या काळामध्ये असा काहीतरी प्रयत्न केला जातोय, राज्यामध्ये अशा प्रकारची वेगवेगळी बोर्ड लावायची. आणि इथलं सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न करायचं. याच्या पाठीमागे कोण आहे? हे शोधू आणि त्याच्यावर कारवाई करू, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.







