पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाची शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने स्वीकारली आहे. यानंतर या हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) करत आहे. पहलगाम हल्ल्यातील पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांना मदत करण्यात लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर फारुख अहमद याच्या नेटवर्कने महत्त्वाची भूमिका बजावली होती, असे वृत्त ‘इंडिया टुडे’ने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
दहशतवादी विरोधी कारवाईचा भाग म्हणून सुरक्षा दलांनी कुपवाडा येथील अहमदचे घर नुकतेच जमीनदोस्त केले आहे. अहमद, हा सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) असल्याचे बोलले जात असून त्याने गेल्या दोन वर्षांत त्याच्या स्लीपर सेल नेटवर्कद्वारे काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यापैकी पहलगाम हल्ला, ज्यामध्ये २५ पर्यटक आणि एका काश्मिरी व्यक्तीचा मृत्यू झाला होता. हा सर्वात भीषण हल्ला मानला जात आहे.
माहितीनुसार, अहमद १९९० ते २०१६ पर्यंत पाकिस्तान आणि भारतादरम्यान फिरत होता. पहलगाम हल्ल्यानंतर, त्याच्या अनेक साथीदारांना ताब्यात घेण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून, अहमद पाकिस्तानमधून काम करत असताना काश्मीरमधील त्याच्या नेटवर्कशी संपर्क साधण्यासाठी सुरक्षित कम्युनिकेशन ऍप्सचा वापर करत आहे.
हे ही वाचा:
कोलकाता येथील हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू
पंतप्रधान मोदींचा ‘तो’ निर्णय आणि पाकिस्तानची उडाली झोप; मध्यरात्री मंत्र्याची पत्रकार परिषद
विशाखापट्टणममध्ये भाविकांच्या अंगावर भिंत कोसळून आठ जणांचा मृत्यू
मुख्यमंत्री महोदय, ही घ्या शांतीदूत पवारांचे ऋण फेडण्याची संधी…
दरम्यान, पोलिसांनी पहलगाम हल्ल्यामागील तीन दहशतवाद्यांची चित्रे जारी केली असून त्यांच्यासंबंधी माहिती देणाऱ्याला २० लाखांचे बक्षीसही जाहीर केले आहे. दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांची ओळख अली भाई उर्फ तल्हा आणि हाशिम मुसा उर्फ सुलेमान अशी झाली आहे. स्थानिक लष्कर-ए-तोयबाचा भरती झालेला दहशतवादी आदिल हुसेन ठोकर म्हणून ओळखला गेला आहे, जो पहलगाममधील तिसरा हल्लेखोर असल्याचे मानले जात आहे. ठोकरने २०१८ मध्ये पाकिस्तानला प्रवास केला आणि गेल्या वर्षी जम्मू आणि काश्मीरमध्ये पुन्हा घुसखोरी करण्यापूर्वी दहशतवादी छावण्यांमध्ये प्रशिक्षण घेतले.