पंजाबचे माजी डीजीपी मोहम्मद मुस्तफा यांचा मुलगा अकील अख्तर यांच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. अकील अख्तरच्या उजव्या हाताच्या कोपराखाली सुमारे ७ सेंटीमीटर अंतरावर सिरिंजचा ठसा आढळल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून समोर आले आहे. अकील अख्तरच्या सुरुवातीच्या पोस्टमॉर्टेम अहवालात तो अंमली पदार्थांचा (ड्रग्सचा) आहारी गेलेला होता, असे नमूद करण्यात आले होते। मात्र, तो कोणत्या प्रकारचा ड्रग घेत होता आणि ते इंजेक्शनद्वारे घेतले जात होते का, याबद्दल त्यावेळी काहीही स्पष्ट झाले नव्हते। तथापि, आता अकीलच्या हातांवर सिरिंज टोचल्याचे अनेक ठसे आढळले आहेत, जे एखाद्या ड्रग्सच्या आहारी गेलेल्या व्यक्तीच्या हातांवर सामान्यतः दिसतात.
शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालाच्या आधारे हरियाणा पोलिसांच्या एसआयटीने एसीपी विक्रम नेहरा यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू केला आहे. अकील अख्तरचा मृत्यू १६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री पंचकुलातील एमडीसी परिसरातील निवासस्थानी झाला होता. सुरुवातीला कुटुंबीयांनी त्याचा मृत्यू औषधांच्या ओव्हरडोजमुळे झाल्याचे सांगितले होते. या प्रकरणात २१ ऑक्टोबर रोजी माजी डीजीपी मोहम्मद मुस्तफा, त्यांची पत्नी व पंजाबच्या माजी कॅबिनेट मंत्री रजिया सुल्ताना यांच्यावर त्यांच्या मुलगा अकील अख्तरच्या संशयास्पद मृत्यूबाबत एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
हेही वाचा…
जोगेश्वरीच्या JMS बिझनेस सेंटरमध्ये आग; चार मजले भक्ष्यस्थानी
“मर्द असाल तर स्वतः समोर येऊन सामना करा!” पाक लष्करप्रमुखांना खुले आव्हान
ऑनलाइन कंटेंटवरील नियंत्रणासाठी आता नवीन मार्गदर्शक तत्त्वे!
मलेशियामध्ये मोदी-ट्रम्प भेट नाही: आसियान शिखर परिषदेला व्हर्च्युअल पद्धतीने उपस्थिती!
यापूर्वी २७ ऑगस्टला अकील अख्तरचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यात त्याने आपल्या वडिल आणि पत्नीमध्ये अवैध संबंध असल्याचा उल्लेख करत, कुटुंबातील सदस्यांनी त्याच्या हत्येचा कट रचल्याचे गंभीर आरोप केले होते. त्या व्हिडिओमध्ये त्याने आपल्या आई रजिया सुल्ताना आणि बहिणीवरही गंभीर आरोप केले होते.
या व्हिडिओ आणि आरोपांच्या आधारे मलेरकोटला येथे राहणारे त्यांचे शेजारी शमसुद्दीन चौधरी यांनी पंचकुलाचे पोलिस आयुक्त यांच्याकडे तक्रार दिली होती. त्या तक्रारीवर कारवाई करत पंचकुलाच्या माता मनसा देवी पोलीस ठाण्यात माजी डीजीपी मोहम्मद मुस्तफा, त्यांची पत्नी रजिया सुल्ताना, सून आणि मुलगी अशा चार जणांविरुद्ध कलम १०३ (१ ), ६१ बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे. पंजाबचे माजी पोलीस महासंचालक (डीजीपी) मोहम्मद मुस्तफा यांचा मुलगा ३५ वर्षीय अकील अख्तर याला १६ ऑक्टोबरच्या रात्री साडेनऊच्या सुमारास रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी प्रकरण नोंदवून तपास सुरू केला.







