मुंबई : चोरीच्या मोटारसायकलींवर गर्लफ्रेंडला फिरवण्याचा छंद एका सराईत चोराला चांगलाच महागात पडला आहे. दिंडोशी पोलिसांनी मोठी कारवाई करत वाहनचोरी प्रकरणातील आरोपीला अटक करून त्याच्याकडून सुमारे १ लाख १० हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. या अटकेमुळे परिमंडळ-१२ अंतर्गत दिंडोशी व कुरार पोलिस ठाण्यांत दाखल तीन वाहनचोरी प्रकरणांचा उलगडा झाला आहे.
या प्रकरणाची सुरुवात ९ फेब्रुवारी २०२६ रोजी झाली. गोरेगाव पूर्वेकडील फिल्मसिटी रोड परिसरात राहणारे मजूर सुनील शिवाजी जाधव (३७) यांनी दिंडोशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या होंडा अॅक्टिव्हा दुचाकीची अज्ञात व्यक्तीने चोरी केल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले होते. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
हे ही वाचा:
डिजिटल दहशतीचे नवे रूप; बिश्नोई गँगचे पोलिसांसमोर आव्हान
पेंग्विन प्रकाशन म्हणते की, माजी लष्करप्रमुख नरवणे यांचे पुस्तक अप्रकाशितच!
रशियन तेलावरून भारताला मोठा दिलासा!
अफगाणिस्तानातून डाळींबही येत नाहीत, पण दहशतवादी येतात!
तपासादरम्यान आरोपीला फिरण्याचा विशेष छंद असल्याचे उघड झाले. तो चोरी केलेल्या दुचाकीवर गर्लफ्रेंडला बसवून शहरात फिरत असे. पेट्रोल संपल्यानंतर तो ती दुचाकी रस्त्याच्या कडेला सोडून देत असे आणि पुन्हा दुसरी चोरीची दुचाकी वापरत असे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोशी पोलिस पथकाने सीसीटीव्ही फुटेज, गुप्त बातमीदारांची माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची दिशा ठरवली.
या तपासात सादिक खुर्शीद शेख (२६) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने वाहनचोरीची कबुली दिली. आरोपीकडून तीन चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. यामध्ये दिंडोशी पोलिस ठाण्यातील दोन तर कुरार पोलिस ठाण्यातील एका चोरीच्या गुन्ह्याचा समावेश आहे.
सध्या दिंडोशी पोलीस आरोपीची कसून चौकशी करत असून त्याने यापूर्वी आणखी किती वाहनचोरी केल्या आहेत, याचा तपास सुरू आहे.







