दिल्लीतील शाहदरा जिल्ह्यात एका २२ वर्षीय सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानाने खेळण्यातील पिस्तूलचा वापर करून दागिन्यांच्या दुकानात लुटमार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १९ जून रोजी एका पीसीआर कॉलवरून एका व्यक्तीने छोटा बाजार, फरश बाजार येथील एका ज्वेलर्सदुकानातून चार सोन्याच्या बांगड्या लुटल्याची तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि पळून जाण्याचा मार्ग शोधण्यासाठी गुन्ह्याच्या ठिकाणाहून आणि आजूबाजूच्या परिसरातील अनेक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.
पथकाने आरोपीची ओळख गौरव यादव अशी केली, जो मध्य प्रदेशातील शिवपुरी येथील रहिवासी आहे. तो बीएसएफ कॉन्स्टेबल असल्याचे सांगण्यात आले. शिवपुरी येथील त्याच्या निवासस्थानी छापा टाकण्यात आला, जिथे त्याला पकडण्यात आले. चौकशीनंतर त्याने दरोडा टाकल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या निवासस्थानातून चोरीच्या दोन सोन्याच्या बांगड्या जप्त केल्या.
चौकशीदरम्यान यादवने खुलासा केला की तो २०२३ मध्ये बीएसएफमध्ये सामील झाला होता आणि मे २०२५ मध्ये त्याचे प्रशिक्षण पूर्ण केले होते. तो पंजाबमधील फाजिल्का येथे तैनात होता. त्याच्या कारकिर्दीत त्याला ऑनलाइन जुगार प्लॅटफॉर्मचे व्यसन लागले, ज्यामुळे त्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
हे ही वाचा :
राहुल गांधींच्या वक्तव्याने पाकमधील दहशदवादी आनंदित
सांगली ड्रग्स फॅक्टरी प्रकरण : केमिकल पुरवठादाराला गुजरातमधून केली अटक
पाकिस्तानी पासपोर्ट अजूनही सर्वात दुर्बल
जो लालचामुळं धर्मांतर करतो, तो देशही विकू शकतो
१८ जून रोजी त्याला सुट्टी देण्यात आली आणि तो त्याच्या मूळ गावी गेला. दिल्लीत ट्रेन बदलत असताना, त्याने एका दुकानातून एक खेळण्यांची बंदूक खरेदी केली आणि दरोडा टाकण्याचा निर्णय घेतला. दरोड्यानंतर, तो मेरठ, नंतर लखनऊला गेला आणि शेवटी शिवपुरी येथील त्याच्या घरी पोहोचला. त्याने चोरी केलेल्या दोन बांगड्या आधीच २ लाख रुपयांना विकल्या होत्या, मिळालेली रक्कम त्याने बँक खात्यात जमा केली. दरम्यान, पोलिसांनी जवानाला अटक केली असून पुढील तपास आणि कारवाई सुरु आहे.







