घाटकोपर पश्चिम लाल बहाद्दूर शास्त्री मार्गावर भरधाव वेगात असलेली कार फुटपाथवर चढल्याने भीषण अपघात झाला, या अपघातात एक जण गंभीररीत्या जखमी झाला असून त्याला उपचारासाठी राजावाडी रुगणालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान घाटकोपर पोलिसांनी दोन तरुणींना ताब्यात घेतले असून दोघींनी मद्यपान केले होते असे चौकशीत समोर आले आहे. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी कार चालक तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
भाविका भानुशाली असे कार चालक तरुणीचे नाव आहे. भाविका ही घाटकोपर पूर्व भानुशाली वाडी येथे राहण्यास आहे. शनिवारी सकाळी ७ वाजता ती मैत्रिणीला घाटकोपर पश्चिम येथे सोडण्यासाठी स्वतःच्या ‘किया’ या मोटारकारने निघाली होती. घाटकोपर पश्चिम लाल बहादूर शास्त्री रोड वरून विद्याविहारच्या दिशेने भरधाव वेगाने जात असताना भाविकाचे मोटारीवरील नियंत्रण सुटले आणि मोटार कार बॅरिकेट तोडत थेट फुटपाथवर चढून फुटपाथवर झोपलेल्या एका व्यक्तीला चिरडून एका दुकानाला धडकली.
हे ही वाचा :
डोक्यावर एक कोटींचे बक्षीस असलेल्या नक्षलवादी सुजाताचे आत्मसमर्पण
मुख्यमंत्री यादव थोडक्यात बचावले
‘जेन-झेड’ आंदोलनाचा परिणाम, उत्तराखंडातील बनबसा बाजार ठप्प
नेपाळमधील अस्थिरतेचा दुर्गापूजेला फटका; “यंदा मंडप नाही, मंदिरातच पूजा”
या भीषण अपघातानंतर स्थानिकाकांनी धाव घेऊन जखमीला तात्काळ राजवाडी रुग्णालयात हलविण्यात आले आहे, घटनास्थळी दाखल झालेल्या घाटकोपर पोलिसांनी मोटार कार आणि चालक तरुणीसह दोघींना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असता दोघींनी मद्यप्राशन केले असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या दोन्ही तरुणी मद्यपान केलेल्या अवस्थेत होत्या, तसेच पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेल्या त्यांच्या मोटारीत मद्याचा बॉटल होत्या. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी भाविका विरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. जखमी व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.







